पुणे पाऊस: अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोल्हापुरात पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली

खडकवासला धरण

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

खडकवासला धरण

पुणे, सातारा, कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि सातारा परिसरात येत्या 24 तासांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पावसामुळे काही भागांमध्ये पूर येण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती ट्वीट करून दिली आहे.

पुणे शहरात आज पावसानं दमदार हजेरी लावलीय.

पुण्याजवळील खडकवासला आणि पानशेत धरणं 100 टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून 9 हजार तर पानशेत धरणातून 2 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली

कोल्हापूरमध्ये पंचगाग नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्याची पाणी पातळी 39.8 फूट आहे.

राधानगरी धरणाचे 2 दरवाजे सुरू आहेत त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 250000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापुरातील प्रयाग चिखली, वडणगे, आंबेवाडी या नदीकाठच्या गावातून लोकांनी स्थलांतर करावं असं आवाहन NDRF, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार गावकरी स्थलांतरित होत आहेत.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली आहे

सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवडे प्लॉट, साईनाथ कॉलनी, दत्तनगर, इनामदार प्लॉट या भागातल्या 200 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.

ब्रह्मणाळ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँडहून अत्याधुनिक 8 बोटी मागवण्यात आल्यात. यातील 6 बोटी पलूस तालुक्यातील पूर क्षेत्रात आहेत तर 2 बोटी सांगली शहरात आहेत.

88 बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 4,256 क्युसेक तर अलमट्टी धरणातून 2,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयनेतून 55958 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरणात सध्या 233.24 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे 4 आणि 5 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)