कोरोना व्हायरस : धार्मिक स्थळांना उघडण्यास अद्याप परवानगी नाही - राजेश टोपे #5मोठ्याबातम्या

राजेश टोपे

फोटो स्रोत, Twitter/Rajesh Tope

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1) लोक भावनिक, धार्मिक स्थळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही - टोपे

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता गर्दी होणारी सर्वच ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. यात धार्मिक स्थळांचाही समावेश आहे. मात्र, विविध राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मागणी होत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे स्पष्ट केलं की, धार्मिक स्थळं पुन्हा खुली करण्यास राज्य सरकारने अद्याप परवानगी दिली नाहीय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Twitter/Rajesh Tope

"राज्यातील सर्व धार्मिक स्थळं लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. मात्र धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही," असं राजेश टोपे म्हणाले.

"जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही," असे राजेश टोपे म्हणालेत.

2) सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बाजार मांडला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या बदल्यांची CID चौकशी करण्याचीही मागणी केलीय. अन्यथा, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

करोनाच्या साथीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे धोरण बदलल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पत्रक जारी करत हे आरोप केले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारकडून चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावर अद्याप कुठलीच प्रतिक्रिया समोर आली नाहीय.

3) CAA विरोधातील शाहीन बागचं आंदोलन भाजपचा कट - आप

CAA कायद्याविरोधात नवी दिल्लीतल्या शाहीन बाग परिसरात झालेलं आंदोलन म्हणजे भाजपने रचलेला कट होता, असा आरोप आम आदमी पक्षानं केलाय. 'आप'चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतांसाठी शाहीन बागचं आंदोलन घडवून आणलं, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी केला.

शाहीन बागचं आंदोलन सुरू असताना आम आदमी पक्षानं स्वत:ला वेगळं ठेवलं होतं. 'आप'च्या कुणाही नेत्यानं शाहीन बाग आंदोलनावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.

याच आंदोलनातील काही लोक भाजपमध्ये सहभागी झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता 'आप'नं हे आरोप केले आहेत.

4) काँग्रेसमध्ये योग्यतेवर प्रश्न उपस्थित केलं जातं - ज्योतिरादित्य शिंदे

काही महिन्यांपूर्वीच भाजपवासी झालेल्या खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी थेट काँग्रेसच्या नेतृत्त्वावरच टीका केलीय. काँग्रेसमध्ये नेत्यांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले जातात, असा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

माझा सहकारी राहिलेल्या सचिन पायलट यांनीही याचा अनुभव घेतल्याचं ज्योतिरादित्य शिंदे म्हणालेत.

फोटो स्रोत, Twitter/@JM_Scindia

यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणं, राम मंदिराचं भूमिपूजन यावरून नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

चीनला 'ईंट का जवाब पत्थर से' अशा स्वरुपात उत्तर दिलं गेलंय, असंही ते यावेळी म्हणाले.

5) जगनमोहन रेड्डी फोन टॅप करत असल्याचा चंद्राबाबूंचा आरोप

तेलगु देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारकडून आपले फोन टॅप केले जात असल्याचा आरोप चंद्राबाबूंनी केलाय. लाईव्ह मिंटनं ही बातमी दिलीय.

चंद्राबाबू हे केवळ आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून याबाबत कळवलं आहे.

विरोधी पक्षातील नेते, वकील, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन टॅप केले जात असल्याचं नायडू यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशात 'जंगल राज' प्रस्थापित करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केलाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)