राजीव त्यागी : न्यूज चॅनेल्सवरील डिबेट शो म्हणजे कोंबड्यांच्या झुंजी झाल्या आहेत का?

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी मराठी
आज तक

फोटो स्रोत, AAJTAK GRAB

हा विषय गेली अनेक वर्षं चर्चेत आहे आणि असं मोजकेच कोणी असतील ज्यांनी कधी यावर प्रतिक्रिया दिली नसेल. प्रत्येकाला याबद्दल मत आहे, पाहणाऱ्यालाही आणि न पाहणाऱ्यालाही. असे विषय थोडकेच असतात. त्यापैकीच एक, 'आपल्याकडे न्यूज टेलिव्हिजन चर्चांचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे का?' 'आपल्याकडे भारतात न्यूज डिबेट्स, प्राईम टाईम चर्चा या कोंबड्यांच्या झुंजीसारख्या लढवल्या जातात का?'

समाजमाध्यमांवर अनेकजण या विषयावर आक्रमकतेनं व्यक्त होतात. पण पुन्हा एकदा हा विषय 'चर्चेला' येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं झालेलं आकस्मिक निधन.

त्यांच्या निधनापूर्वी काहीच काळ ते एका न्यूज चॅनेलवर चर्चेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानिमित्तानं या चर्चांच्या आक्रमक स्वरुपावर जोरदार चर्चा सुरू झाली. टीका सुरू झाली.

या टीकेमध्ये अनेक वर्षं या चर्चांचा अनुभव असलेले पत्रकारही होते. भारतात अशा प्रकारच्या टेलिव्हिजन चर्चांचा मोठा दर्शकवर्ग तयार करण्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या राजदीप सरदेसाईंनी ट्विटरवर आपलं मत व्यक्त केलं आणि या चर्चांच्या सध्याच्या स्वरुपाला 'कोंबड्यांच्या झुंजी'ची उपमा दिली.

फोटो स्रोत, Twitter

राजदीप सरदेसाई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, "साधारण दशकभरापूर्वी राजीव त्यागी माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'भैय्या हमे भी कभी टीव्ही डिबेट पे लाया करो.' जेव्हा ते खरंच येऊ लागले तेव्हा त्यांना कर्णकर्शक आणि कोंबड्यांच्या झुंजीच्या स्वरुपातल्या चर्चांमध्ये यावं लागलं ज्यामध्ये महत्त्व उरल नव्हतं. त्यांचं जाणं हे आमच्या व्यवसायाच्या झालेल्या अवस्थेची आठवण करुन देणारं आहे."

सरदेसाई पुढे या टीव्ही चर्चांत सहभागी होणाऱ्यांच्या मानसिक आरोग्याबद्दलही बोलतात. "हे यापूर्वीही बऱ्याचदा बोललो आहे. रोजरोजचे वैयक्तिक हल्ले होणारे, प्रचंड ध्रुवीकरण करणारे हे शोज खूप विखारी झाले आहेत आणि अँकर आणि सहभागी होणाऱ्यांच्या शरीरालाही अपायकारक ठरताहेत," असं ट्वीट सरदेसाई यांनी केलं आहे.

भारतीय न्यूज टेलिव्हिजनवर होणाऱ्या या चर्चांचं स्वरुप दिवसागणिक बदलत गेलं आणि ते आक्रमकही होत गेलं. सुरुवातीला साधकबाधक चर्चांचा तोंडावळा असणाऱ्या, आठवड्यातून एकदा असणाऱ्या या चर्चा हळूहळू रोजच्या होत गेल्या आणि न्यूज चॅनेलचं मुख्य कार्यक्रमही बनल्या.

एकापेक्षा अधिक चर्चा रोज चॅनेल्सवर होऊ लागल्या. त्याचं स्वरुप अतिरेकाचं होत गेलं. आरडाओरड्यापासून ते हमरीतुमरीपर्यंत अनेक वाद भारतीय न्यूज चैनल्सच्या स्टुडिओमध्ये घडले आहेत.

आक्रमकतेच्याही पुढे जाऊन भाषा असंसदीय होत गेली आहे. सोशय मीडियावर अशा चर्चा व्हायरल कंटेंटचं खाद्य बनतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक भारतीय टीव्हीवरच्या अशा चर्चा टीकेच्या आणि विनोदाच्या धनी बनल्या आहेत. पण त्यांचं दिवसागणिक होत गेलेलं आक्रमक रुप पत्रकारितेसाठी, दर्शकांसाठी किती योग्य आहे यावरही चर्चा सतत होत राहते.

फोटो स्रोत, Twitter

कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयात वकील असणारे जयवीर शेरगील यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे आणि माध्यमांसाठी आचारसंहिता आणण्याची मागणी केली आहे.

त्यांच्या मागणीनुसार या आचारसंहितेमुळे 'सनसनाटी, हेटाळणीखोर आणि विषारी' अशा टीव्हीवरच्या चर्चात्मक कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवता येईल आणि कोणी अँकरही 'लक्ष्मणरेषा' ओलांडू शकणार नाही.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अर्थात माध्यमांबद्दल आचारसंहिता असावी ही मागणी काही नवी नव्हे. याअगोदरही ही चर्चा अनेकदा झाली आहे.

नव्वदच्या दशकात जेव्हा भारतात खाजगी वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली, तसं त्यातली गुंतवणूकही वाढत गेली. त्यांवर सरकारी आचारसंहितेची चर्चा तेव्हापासून होते.

पण माध्यम व्यावसायिकांनी आणि पत्रकारांनीही कोणत्याही सरकारी सेन्सरशिपपेक्षा 'सेल्फ' सेन्सरशिप, म्हणजे स्वनियंत्रणाची बाजू कायम लावून धरली.

त्यामुळे या वाहिन्यांच्या 'कंटेंट'ला स्वनियंत्रण करण्यासारी 2011 मध्ये अशी व्यवस्था उभारली गेली आणि 'इंडियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशन'ने 'ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स काऊन्सिल'ची स्थापना केली. याची 'प्रेस काऊन्सिल' प्रमाणे रचना केली गेली आणि निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेतलं गेलं.

पण ही व्यवस्था असतांनाही वृत्तवाहिन्यांच्या चर्चांवरून, त्यांच्यावरील आक्षेपांवरून वाद सुरु आहेत. बहुतांशानं या वादाचा रोख वृत्तवाहिन्यांवरील टीकेकडे आहे.

"काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाचा संबंध वृत्तवाहिनीवरील त्या चर्चेतील त्यांच्या सहभागाशी इतक्या थेटपणे लावणे चुकीचे ठरेल. त्यामागे गुंतागुंतीची वैद्यकिय कारणं असू शकतील. मात्र, त्यानिमित्ताने वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधील वाढता विखार आणि उन्मादी उत्तेजना हा मुद्दा चर्चेत येणे स्वाभाविक आहे," असं माध्यम अभ्यासक विश्राम ढोले म्हणतात. त्यांच्या मते या चर्चांचं स्वरुप हे उद्बोधनापेक्षा एका प्रकारच्या परफॉर्मन्ससारखं झालं आहे.

फोटो स्रोत, Twitter

"एकतर मुळातच वृत्तवाहिन्यांमधील स्पर्धेची तीव्रता आणि राजकीय चर्चेची क्षणभंगूरता यामुळे वाहिन्यांवरील चर्चा या खऱ्या अर्थाने चर्चा राहिलेल्या नाहीत. त्या परफॉर्मन्स झाल्या आहेत.

"अँकरप्रमाणेच प्रवक्त्यांचाही परफॉर्मन्स. आणि दोघांचंही उद्दिष्ट एकच. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणं आणि खिळवून ठेवणं. ते कठीण असल्याची जाणीव असल्याने मग मुद्द्यांपेक्षा नाट्यावर आणि वादापेक्षा उत्तेजनेवर भर असं होत जातं. या कार्यक्रमाचा तो एक फॉर्मेटच बनून गेला आहे. मुळात तो तसा व्हावा अशी वाहिन्यांचीच इच्छा असते. कार्यक्रमाच्या नावातील बॅटल, संग्राम, झुंज या नावातूनच त्यामागचा उद्देश स्पष्ट होतो," असं ढोले म्हणतात.

"परफॉर्मन्सच्या अशा दडपणाखाली या कार्मक्रमांमध्ये सहभागी होणं, त्यात आपली बाजू मांडणं, प्रतिपक्षाला आणि अँकरला पुरून उरणं हे सोपं नसतं. त्यासाठी मिळणारा वेळही कमी, तयारीही बेताचीच. कधीही, केव्हाही तलवारी परजून स्टुडिओच्या रणांगणात उतरा अशी ही स्थिती प्रवक्ते हरघडी अनुभवत असतात.

"ते त्यांचं पक्षीय आणि व्यावसायिक काम असतं हे खरंच. पण त्याचं सततचं एक दडपण, त्यातून सतत होणारा विविध प्रकारचा मनस्ताप हे प्रवक्ते दाखवत नसले तरी अनुभवत असतात. याचा मनावर आणि शरिरावर परिणाम होऊ शकतो.

"अँकरसह प्रवक्त्यांनी थोडा संयम बाळगला तर हे सगळं खरतर प्रेक्षकांसह त्यांच्यासाठीही सुसह्य होऊ शकतं. पण अशा संयम आणि विवेकाची फार अपेक्षा ठेवता येणार नाही असंच चित्र आज बऱ्याच वाहिन्यांवर दिसतं. तार्किक खंडन-मंडणातून वाद करण्याची एक दीर्घ परंपरा लाभलेल्या आपल्या देशात स्टुडिओतील वाद इतके कंठाळी आणि विखारी व्हावं हे दुर्दैवी आहे.

"हा घसरलेल्या राजकारणाचा जसा परिणाम आहे तसा माध्यमांच्या फॉरमॅटचा आणि स्पर्धात्मकतेचाही आहे. सध्याच्या परिस्थितीत भाबडे वाटले तरी तरी स्वनियमन हाच त्यावर उपाय आहे. नपेक्षा असे चर्चेचे कार्यमक्रम प्रेक्षकांसाठी करमणुकीचे आणि हास्यास्पद बनतील. आणि त्यात सहभागी होणाऱ्यांसाठी ते गंभीर ठरतील," असं स्पष्ट निरिक्षण ढोले नोंदवतात.

पण जे अनेक वर्षं या प्रकारच्या चर्चांमध्ये सहभागी होत आहेत, ज्यांनी या चर्चांचं स्वरुप बदलतांना पाहिलं आहे, त्यांना आता काय वाटतं?

मराठी 24 तास वृत्तवाहिन्यांवरही चर्चेचे अनेक कार्यक्रम, त्याचे सादरकर्ते आता प्रस्थापित झाले आहेत. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चात्मक कार्यक्रमांइतके नाही, पण त्यांनाही टीकेला आणि समीक्षेला सामोरे जावं लागतं.

विश्वंभर चौधरी सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या स्पष्ट भूमिकांबद्दलही ते माहीत आहेत. ते अनेक वर्षं विविध वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होत असतात. पण त्यांनाही आता वाटतं की चर्चा आता केवळ आक्रमक न राहता हिंसक होताहेत.

फोटो स्रोत, Getty Images

"मी अजूनही चर्चांमध्ये जातो, पण माझा सहभाग आता मी खूप कमी केला आहे. जेव्हा राजकीय पक्षांचे प्रवक्ते चर्चेत एकमेकांवर तुटून पडतात तेव्हा चर्चा बदलून जाते. तेव्हा जे राजकीय पक्षांचे लोक नाहीत, त्यांच्या वाट्याला स्पेस कमी येते. रुप बदलत गेलं आहे.

"मी 2010 पासून या चर्चांमध्ये जातो आहे. लवासा प्रकरण, मग अण्णा हजारेंचं आंदोलन, तिथपासून. तोपर्यंत चर्चांमधली स्थिती बरी होती. पण नंतर चर्चा बदलत गेली. आता चर्चांचा हिंसकपणा वाढत गेला आहे. आक्रमक होता होता आता ते हिंसक झालं आहे.

मला तर असे अनुभव आले आहेत की कारण नसतांना वैयक्तिक कोट्या केल्या जातात. एक प्रवक्त्या असं म्हणाल्या की चौधरी हे स्वत: नैराश्यग्रस्त आहेत. सहिष्णुता आता संपलेली आहे. निर्वैर प्रतिकाराची भूमिकाही संपलेली आहे. लोक आता वैर धरायला लागलेले आहेत," विश्वंभर चौधरी स्वत: अनुभव सांगतात.

अर्थात या चर्चांशी रोजचा संबंध राजकीय प्रवक्त्यांचा येतो. हे प्रवक्ते रोज अनेक वाहिन्यांवर अनेक चर्चांमध्ये सहभागी होतात. पण या वाढलेल्या आक्रमकतेचा, चर्चेच्या सूराचा त्यांच्यावर परिणाम होतो का?

केशव उपाध्ये महाराष्ट्रात भाजपाचा वाहिन्यांवरचा चेहरा आहेत. त्यांच्यामते या चर्चांचा जो ताण आहे तो हाताळता येणं आता प्रवक्त्यांच्या कौशल्याचा एक भाग आहे.

"प्रवक्तेपद हे सतत अपडेट राहणं, वाचन करणं, चिंतन करणं अशा स्वरुपाचं आहे. त्यामुळे हे निश्चित आहे की त्यात अधिक वेळ आणि मन गुंतवावं लागतं. सहाजिक आहे की त्यात विरोधी पक्षातले लोक वेगळी भूमिका वेगळ्या पद्धतीनं मांडणार.

"प्रवक्ते म्हणून तयारी करतांना तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे व्यग्र राहण्याचा जो ताण येऊ शकतो त्याचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण तो तुमच्या कामाचा भागच आहे. वैयक्तिक बोलायचं तर मी स्वत:ची एक शैली तयार केली आहे.

"आपण मुद्द्यावर रहायचं. आपण मुद्द्याच्या पलिकडे सरकायचं नाही. हे माझ्यापुरतं ठरवून घेतलं आहे. अपवाद वगळता मी चर्चेत चिडल्याचं तुम्हाला दिसणार नाही. पण प्रत्येकाची शैली असते, प्रत्येकाचा स्वभाव असतो. ज्याला ताणाचा व्यवस्थापन करता येत नाही तो भांडणार. मुळात या चर्चांचा हेतू हा आहे की मुद्द्यांचं आदानप्रदान झालं पाहिजे. मुद्दे मांडले गेले पाहिजेत. पण शेवटी प्रत्येक चॅनेलची गरज ही वेगळी असते," उपाध्ये म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images

सचिन सावंत काँग्रेसची बाजू अनेक वर्षं वाहिन्यांच्या चर्चांत मांडत आले आहेत. या चर्चांचा तणाव येत असल्याचं ते मान्य करतात.

"राष्ट्रीय चॅनेल्सपेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी चॅनेल्सची स्थिती या मुद्द्यावर थोडी बरी आहे. दोन्ही बाजूचे दृष्टिकोन मांडले जावेत कोणत्याही विषयाचे, त्याबद्दलची भूमिका मांडली गेली पाहिजे हा खरा महत्त्वाचा भाग असतो. पण या डिबेटचा उपयोग जनतेचं मत एकाच बाजूला नेण्याचा जर प्रयत्न झाला तर चर्चेचा उद्देश सफल होणार नाही.

"त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे हातखंडे वापरले जातात. काही ठिकाणी अँकर्स हे विशिष्ट पद्धतीची भूमिकाच लोकांना पटावी यासाठी कार्यरत असतात. जाणीवपूर्वक एखाद्या पक्षाच्या व्यक्तीला जास्त बोलू दिलं जातं. जे अगोदर नव्हतं. शांतपणे एखाद्या प्रश्नाचा आढावा घेणं, त्यावर विविधांगी चर्चा घडवून आणणं असं व्हायचं. मला जाणीवपूर्वक असं सांगावसं वाटतं की मराठी चॅनेल्सवर अशी स्थिती नव्हती,

"मात्र हिंदी चॅनेल्सवर गेल्यावर मात्र निश्चितपणे तो मानसिक त्रास जाणवतो. याचं कारण हे आहे की प्रतिवाद करतांना तुम्हाला दाबलं जातं. असह्य होतं. तसं झाल्यावर रक्तदाब वाढतो. तुम्ही मूळचे नसाल पण यामुळं तुमचा स्वभाव रागीट होतो. डिबेटमधून निघाल्यावर प्रचंड तणाव आहे असं तुम्हाला जाणवतं," सावंत सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)