जयदेव ठाकरे यांनी बिबटे, माकड आणि दुर्मिळ पक्षी पाळले होते हे तुम्हाला माहिती आहे का?

  • नामदेव काटकर
  • बीबीसी मराठी
नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरांसोबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली. कुणी कौतुक केलं, तर कुणी टीका केली.

दोन वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी दोन मोर पाळले होते, तेव्हा भाजपनं त्यांच्यावर टीका केली आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अन्वये कारवाईची मागणीही केली होती. आता राजदचे नेते श्याम रजाक यांनी भाजपला "दुटप्पी" म्हटलं आहे.

मोदींच्या मोरांनी निवडणुका लागलेल्या बिहारमध्ये राजकीय वाद निर्माण केला तर महाराष्ट्रात गतकाळातल्या घटनांना उजळा दिला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याच्या आवारातही अनेक जंगली प्राणी-पक्षी पाळण्यात आले होते, हे ऐकून आज अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो.

पण तिथे अनेक जंगली प्राणी पाळले होते आणि त्यावरून वादही निर्माण झाला होता.

'मातोश्री'तलं प्राणी संग्रहालय

हा प्रसंग 1970च्या दशकातला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले पुत्र जयदेव यांना प्राण्या-पक्षांची आवड होती.

बीबीसी मराठीशी बोलताना जयदेव ठाकरे सांगतात, "मला लहानपणापासूनच पक्ष्यांची आणि प्राण्यांची आवड होती. माझ्या आजोबांना आणि वडिलांना (बाळासाहेबांना) आवड होती. एक पांढरं घुबड आमच्या हॉलमध्ये असायचं. मी बाळासाहेबांसोबत दौऱ्यावर जायचो, तेव्हा पक्षी शोधायचो आणि त्यांना घेऊन यायचो. मग घरी पाळायचो."

फोटो स्रोत, Getty Images

पण असं वन्य पक्ष्यांना पाळणं बेकायदेशीर नाही का, असं विचारल्यावर ते सांगतात, "हा कायदा तर 1972 साली आला. आणि मी नंतरही मी रीतसर परवानगी काढूनच गोष्टी केल्या. लोकांना कळलं की मला आवड आहे की ते स्वतःहून जखमी प्राणी आणून द्यायचे.

"एकदा एक गावठी भाषेत बोलणारा माणूस भेकराचं पिलू घेऊन आला. भेकर ही हरणाची एक जात. साहेब म्हणाले घ्यायचं नाही. मी म्हटलं घ्यायला तर पाहिजेच. तिचं नाव आम्ही स्विटी ठेवलं. मी तिला बाटलीने दूध पाजलं. ती घरात आणि पाठीमागे ग्राउंडमध्ये फिरायची."

पुढे जयदेव यांनी पक्षी आणि हरणासोबत इतरही प्राणी पाळले आणि त्यांच्यासाठी मातोश्री बंगल्याच्या मागच्या जागेत पिंजरे बांधले.

याला वांद्र्यातल्या कलानगर वसाहतीतल्या सदस्यांनी आक्षेप घेतला.

कलानगरमध्ये जंगली प्राण्यांवरून वाद

अनेक वर्षं शिवसेना आणि मनसेचं वृत्तांकन करणारे पत्रकार दिनेश दुखंडे यांनी झी चोवीस तासच्या वेबसाईटवर ब्लॉगमध्ये लिहिलंय की 'जयदेव ठाकरे यांनी विविध जातीचे साप, सरडे, हरणं, अगदी सुसरीचं पिल्लूही पाळलं होतं. दुर्मिळ जातीचं मार्मोसेट माकडही जयदेव यांच्याकडे होतं. त्यांनी त्याला 'मिकी' असं नाव ठेवलं होतं.'

जयदेव ठाकरे यांनी 'मातोश्री'च्या मागच्या बाजूला रिकाम्या जागेत हे प्राणी-पक्षी संग्रहालय तयार केलं होतं. लहान-मोठे पिंजरेही आणले होते.

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते सांगतात, "मातोश्री बंगल्याच्या मागच्या बाजूला मोठ-मोठे पिंजरे आणून ठेवले होते. त्यात जयदेव यांनी पक्षी-प्राणी ठेवले होते. या पाळलेल्या पक्ष्यांमध्ये बरेचशे पक्षी परदेशी होते. त्यामुळेच मुळात वाद झाला होता."

दामू केंकरे यांनी त्यावेळी या सर्व प्रकाराला विरोध केला होता आणि त्यानंतर सर्व माध्यमांनीही लावून धरलं, असं युवराज मोहिते सांगतात.

मोरे, पोपट असे पक्षी होतेच, मात्र एकदा मी स्वत: तिथे माकडही पाहिलं होतं, असं युवराज मोहिते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मार्मासेट जातीचं माकड ( संग्रहित छायाचित्र)

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सांगतात, "जयदेव ठाकरे यांना प्राणी-पक्ष्यांची आवड होती. मातोश्री बंगल्याच्या बाजूला कलानगर सोसायटीचा एक प्लॉट होता. त्या प्लॉटवर जयदेव ठाकरे यांनी प्राणी-पक्षी पाळले होते. अगदी माकड वगैरे होते आणि हे सर्व पिंजऱ्यात ठेवलेले होते.

"कलानगर सोसायटीचे अध्यक्ष नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे होते. त्यांनी या कलानगरच्या जागेवर प्राणी-पक्ष्यांचे पिंजरे ठेवण्यास आक्षेप घेतला आणि माध्यमांमधूनही आवाज उठवला.

फोटो स्रोत, Getty Images

"दामू केंकरे स्वत: कलानगर सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारात पिंजऱ्यांसाठी बांधलेले प्लॅटफॉर्म तोडून टाकले. त्यानंतर हे प्रकरण फारच गाजलं, त्यामुळे प्रशासनानंही कारवाई केली."

दामू केंकरे यांचे पुत्र विजय केंकरे सांगतात, "पक्षी-प्राणी पाळण्याचा वाद नव्हता, तर कलानगर सोसायटीच्या मालकीच्या प्लॉटवर ते मोठ-मोठे पिंजरे ठेवण्यात आले होते. त्यामुळे विरोध करण्यात आला होता."

पुढे काय झालं?

ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत हे जयदेव ठाकरे यांचे शालेय जीवनापासूनच मित्र होत. ते सांगतात, "स्वत: बाळासाहेब जयदेव यांना या छंदासाठी प्रोत्साहन द्यायचेच, पण प्रबोधनकारही कौतुक करायचे. प्रबोधनकारांना त्यांच्या या नातवाचं (जयदेव यांचं) अफाट कौतुक होतं.

"जयदेव ठाकरेंकडे बरेच प्राणी-पक्षी होते. अगदी सरपटणारे प्राणी होते. त्यांना प्राणी-पक्षी पाळण्याची आधीही आवड होती आणि आजही आहे," असंही भारतकुमार राऊत सांगतात.

पण या सगळ्या प्राण्यांचं पुढे काय झालं?

जयदेव ठाकरे सांगतात, "प्राण्यांना लोक त्रास देऊ लागले. मी त्यांना म्हटलं तुम्ही या आणि पाहा. एंजॉय करा. नंतर मी कंपाउंड टाकलं. आमच्या स्विटीला (हरीण) कुणी जळ्या माणसाने विषारी टोमॅटो खाऊ घातला. तिने साहेबांच्या मांडीवर प्राण सोडले. आम्ही पोलिसात तक्रार केली, पण ते काय करणार."

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

संग्रहित छायाचित्र

जयदेव म्हणतात की पुढे नव्या मातोश्रीचं बांधकाम होणार होतं तेव्हा ते कलीनात राहायला गेले. तिथे त्यांनी राजा आणि जुई नावाचे बिबटे पाळले. एक पट्टेरी वाघाचा बछडाही त्यांना कुणी आणून दिला होता, असं ते सांगतात. पण तो वाचू शकला नाही.

जयदेव सांगतात की त्यांनी नंतर सगळे प्राणी आणि पक्षी बोरिवली पार्कमध्ये सोडले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)