NEET 2020 निकाल : ओडिशाच्या शोएब आफताब, यूपीच्या आकांक्षा सिंहला 100 टक्के गुण

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी प्रतिनिधी
शोएब अफताब

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन,

शोएब अफताब

वेद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचा निकाल लागला आहे.

ओडिशाचा शोएब आफताब आणि उत्तर प्रदेशची आकांक्षा सिंह यांनी या परीक्षेत 100 टक्के गुण (720 पैकी 720) मिळवले आहेत.

पण, नॅशनल टायब्रेकर पॉलिसीअंतर्गत शोएब याला परीक्षेचा टॉपर घोषित करण्यात आलं आहे.

नीट परीक्षेची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच एखाद्या विद्यार्थ्याने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत, हे विशेष.

ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोएबच्या घरात कुणीच डॉक्टर नाही. त्यामुळे आपण पहिला क्रमांक मिळवू, अशी अपेक्षा त्याला नव्हती. मात्र, आपण पास होऊन टॉप 100 किंवा टॉप 50 विद्यार्थ्यांमध्ये नक्की येऊ, असा विश्वास शोएबला होता.

कोरोनामुळे परीक्षा सतत पुढे ढकलली जात होती. यामुळे थोडा तणाव येत होता. पण मी स्वतःला शांत ठेवून संयम बाळगला. मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करण्यावर मी भर दिला, असं शोएबने म्हटलं.

यावर्षी कोरोना संकटाच्या दरम्यान 13 सप्टेंबर रोजी NEET परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 14.37 लाख विद्यार्थी सहभागी झाले.

नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या माहितीनुसार, "दिल्ली आणि चंदीगढमधून सर्वाधिक विद्यार्थी (75 टक्क्यांहून जास्त) यशस्वी ठरले. याबाबत हरयाणा दुसऱ्या क्रमांकावर राहिलं.

यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच एम्ससारख्या नामवंत संस्थेतील प्रवेशसुद्धा NEET मध्ये प्राप्त गुणांच्या आधारेही मिळणार आहे.

NEET चा निकाल इथे पाहू शकता :

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (NEET) 16 ऑक्टोबर घोषित झाला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG-2020 ही परीक्षा दिली असेल, त्यांना आपला निकाल राष्ट्रीय चाचणी एजन्सीच्या ntaneet.nic.in आणि https://www.nta.ac.in/ या दोन वेबसाईट्सवर पाहता येईल.

जन्मतारीख आणि रोल नंबर निकाल पाहण्यासाठी आवश्यक असेल.

JEE आणि NEET परीक्षा काय आहेत?

JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. JEE-Mains आणि JEE-Advanced अशी दोन टप्प्यांत होणारी ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्येही या परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो.

तर NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. यंदा साधारण सोळा लाख विद्यार्थ्यांनी NEET साठी अर्ज केले असून, JEE-mains परीक्षेसाठी नऊ ते दहा लाख विद्यार्थांनी नाव नोंदवलं आहे. एप्रिल-मे महिन्यांत या परीक्षा होणार होत्या. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे दोनदा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या.

सध्याच्या वेळापत्रकानुसार JEE-mains परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार असून, JEE-Advanced परीक्षा 27 सप्टेंबरला होणार आहे. तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला घेतली जाईल.

परीक्षेविषयी विद्यार्थ्यांमध्ये दुमत

देशभरात अनेक ठिकाणी कोव्हिडच्या रुग्णांची संख्या वाढत असताना परीक्षा घेणं योग्य ठरणार नाही, असं अनेक विद्यार्थी आणि पालकांना वाटत होतं. तर अनेकजण आता ठरल्याप्रमाणे एकदाची परीक्षा घेऊन टाका, असंही म्हणत होते.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पुण्यात राहणारा आकाश सावंत, NEET साठी तयारी करतो आहे. त्यानं गेल्या वर्षी ड्रॉप घेतला होता, आणि आता परीक्षा झाली नाही, तर हेही वर्ष जाईल अशी शक्यता त्याला वाटते.

आकाश सांगतो, "माझ्यासारखी अनेक मुलं आहेत, काहीजण पहिल्यांदाच ही परीक्षा देणार आहेत. आम्हाला वाटतं जुलैतच परीक्षा झाली असती तर बरं असतं. आता किमान तेरा सप्टेंबरला तरी ती व्हावी असं मला वाटतं. कारण परीक्षा जितकी लांबेल तितका तणाव वाढतो आणि अभ्यासावरही परिणाम होतो."

श्रीरामपूरचे डॉ. भूषण देव हे बालरोगतज्ज्ञ असून त्यांचा मुलगा अथर्व NEET साठी तयारी करतोय. सरकारनं आता परीक्षा घ्यायलाच हव्यात असं त्यांना वाटतं. "एक पालक म्हणून मला वाटतं, की परीक्षेला फार उशीर झाला, तर पुढच्या प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होत जाईल. बालरोगतज्ज्ञ म्हणून मला मुलांच्या मानसिकतेचीही चिंता वाटते. मुलं आता कंटाळली आहेत. परीक्षा होणार, नाही होणार याविषयी जास्त काळ मुलांना धाकधूक वाटत राहणार नाही, याची काळजी सरकारनं घ्यायला हवी."

'कोव्हिडसह जगावं लागेल' असं सरकारनेच म्हटलं असल्याची आठवण ते करून देतात. "कोव्हिडचं संकट कधी संपेल याची खात्री नाही, आपल्याला त्याच्यासोबत जगायचं तर तशी तयारी सरकारनंही करायला हवी. आता एसटी बसेसही सुरू झाल्या आहेत, त्यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत कसं पोहोचायचं, हा प्रश्नही येऊ नये. व्यवस्थित काळजी घेतली, तर तीन तासांसाठी केंद्रांवर जाऊन परीक्षा देण्यात काही अडचण येणार नाही," असं ते म्हणतात.

उत्तर प्रदेशात राहणाऱ्या प्रशांत कुमार मिश्रा याला मात्र परीक्षा केंद्रापर्यंत आपण कसं पोहोचणार अशी काळजी वाटते.

प्रशांत सांगतो, "माझं परीक्षाकेंद्र प्रयागराज शहरात आहे आणि मी तिथून पन्नास किलोमीटरवर माझ्या गावी आलो आहे. मी सुरक्षित प्रवास करू शकेन, अशी कुठलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही, माझ्याकडे वाहनही नाही. असे अनेक विद्यार्थी आहेत. आम्ही परीक्षा कशी द्यायची? प्रयागराजच्या केंद्रात जास्त विद्यार्थी येतात, तिथे संसर्गाचा धोकाही मोठा आहे असं मला वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल डिस्टंसिंग पाळता यावं यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी परीक्षा केंद्र असायला हवीत, असं प्रशांत सांगतो.

तर बिहारच्या प्रियांशूला परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंग अशक्य आहे असं वाटतं. तो म्हणतो, "परीक्षेसाठी नियम तर केले आहेत, पण ते पाळले जातील का? मी काही दिवसांपूर्वीच COMEDK ही परीक्षा दिली होती, त्यावेळी परीक्षा केंद्रावर गर्दी उसळली होती. मास्क आणि ग्लव्ह्ज घालून, कोंदट हवेत तीन तास बसून लिहिणं हे कठीण जातं. त्याचा परिणाम आमच्या परीक्षेतील कामगिरीवरही होऊ शकतो."

परीक्षा घ्यायचीच असेल तर नियम पाळले जातील याची शासनानं ग्वाही द्यायला हवी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

राजकीय प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या या मागण्या समोर आल्यावर नेतेमंडळींनीही त्याविषयी आपली भूमिका समोर मांडली आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सर्वच परीक्षांवर विचार व्हायला हवा आणि पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.

"जगभरात जिथे जिथे शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तिथे कोरोनाचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं आहे. विविध परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. माझी नम्र विनंती आहे की, शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलावेत. आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावं, म्हणजे, कुणीही विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार नाही", असं आदित्य ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.

काँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, "आज लाखो विद्यार्थी काहीतरी सांगत आहेत. सरकारनं NEET, JEE परीक्षांविषयी विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकायला हवी आणि यातून मार्ग काढायला हवा."

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ही परीक्षा सुरक्षित वातावरण निर्माण होईपर्यंत पुढे ढकलली जावी असं म्हटलं आहे.

तर भाजपचेच खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामीही परीक्षा पुढे ढकलावी, या मताचे आहेत. "मी शिक्षण मंत्र्यांसी बोललो असून NEET आणि बाकीच्या परीक्षा दिवाळीनंतर घ्याव्यात असा सल्ला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा कधी घ्यावी हे सरकारवर सोपवलं आहे. मी आत्ताच पंतप्रधानांना पत्र पाठवत आहे," असं ते शुक्रवारी ट्विटरवर म्हणाले होते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मात्र यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)