गणितातला उसैन बोल्ट: 20 वर्षांचा भानू बनला जगातला वेगवान 'ह्युमन कॅलक्युलेटर'

  • मनीष पांडे
  • न्यूजबिट रिपोर्टर
नीळकंठ भानू प्रकाश

फोटो स्रोत, NEELAKANTHA BHANU PRAKASH / GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

नीळकंठ भानू प्रकाश

20 वर्षांचा नीलकंठ भानू प्रकाश गणितातला उसैन बोल्ट आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी नीलकंठने मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिलं स्थान पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

भानू म्हणूनच त्याला लोक ओळखतात. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर तो जगातला सर्वात वेगवान 'ह्युमन कॅलक्युलेटर' ठरला आहे.

भानूच्या डोक्यात सतत गणिताचे आकडे घोळत असतात. गणित म्हणजे एकप्रकारचा मोठा 'मानसिक खेळ' असल्याचं भानू म्हणतो. अनेकांना गणिताचा फोबिया असतो. हा फोबिया घालवणं, हेच भानूचं अंतिम ध्येय आहे.

भानू गणिताची तुलना धावण्याच्या शर्यतीशी करतो. लोकांना धावपटूचं कौतुक असतं. मात्र, मनातल्या मनात वेगात आकडेमोड करणाऱ्यांचं त्यांना कौतुक नसतं, असं भानूला वाटतं.

बीबीसी रेडिओ 1 न्यूजबीटशी बोलताना भानूनं म्हटलं, "9.8 सेकंदात 100 मीटर धावणाऱ्या उसैन बोल्टवर आपण कौतुकाचा वर्षाव करतो. कार आणि विमानांच्या या युगात वेगाने धावण्याचं काय कौतुक, असा प्रश्न आपण विचारत नाही. कारण यातून लोकांना प्रेरणा मिळते. आपलं शरीर किती अद्भूत गोष्टी करू शकतं, हे त्यातून दिसतं. गणित आणि आकडेमोडही तसंच आहे."

मेंदू व्यग्र ठेवतो

गणिताच्या जागतिक स्पर्धेत पहिलं पारितोषिक पटकावल्यामुळे गणिताची ही कला भानूला जन्मजातच मिळाली असेल, असा समज होऊ शकतो. मात्र, हे खरं नाही.

लाईन
लाईन

गणित प्रेमाची ही कहाणीही रंजक आहे. भानू पाच वर्षांचा असताना एका अपघातात भानूच्या मेंदुला जबर दुखापत झाली. त्यामुळे तो वर्षभर अंथरूणाला खिळून होता आणि इथूनच त्याच्या गणिताच्या जगातला त्याचा प्रवास सुरू झाला.

भानू सांगतो, "डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितलं होतं की, या अपघातामुळे माझ्या आकलनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मेंदू सतत व्यग्र ठेवण्यासाठी मी मनातल्या मनात आकडेमोड करायला सुरुवात केली. एकप्रकारे जिवंत रहाण्यासाठीच मी मेंटल कॅलक्युलेशन्स सुरू केले."

भारतात मध्यमवर्गीयांचं सर्वसाधारणपणे एकच उद्दिष्ट असतं, असं भानूला वाटतं. शिकून एखादी चांगली नोकरी मिळवायची किंवा स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा. गणितासारख्या एखाद्या वेगळ्या क्षेत्रात करियर करण्याचा विचार सहसा होत नाही.

मात्र, गणिताविषयीच्या प्रेमामुळे याच क्षेत्रात करिअर करण्याचा त्याचा विचार आहे. लवकरच तो गणित विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण करणार आहे.

मानसिक क्रीडा प्रकार

इतर अनेक मोठ्या खेळाडूंप्रमाणेच भानूसुद्धा स्वतःच्या यशाचं श्रेय तयारीला देतो. टेबलावर बसून अभ्यास करण्याएवढं हे सोपं नाही. हा एक प्रकारचा मानसिक खेळ आहे, असं भानूचं म्हणणं आहे.

नीळकंठ भानू प्रकाश

फोटो स्रोत, NEELAKANTHA BHANU PRAKASH

फोटो कॅप्शन,

नीलकंठ भानू प्रकाश

तो म्हणतो, "गणितच नाही तर विचारही तेवढ्याच वेगाने करता यावा, यादृष्टीने माझे प्रयत्न असतात."

लहानपणी भानू शाळेव्यतिरिक्त सहा ते सात तास गणिताचा सराव करायचा. मात्र, पुढे वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्यानंतर भानू एका ठिकाणी बसून गणिताचा सराव करण्याऐवजी दिवसभर कुठलंही काम करत असताना गणिताचा विचार करतो. याला भानू 'अनस्ट्रक्चर्ड प्रॅक्टिस' म्हणतो.

भानू सांगतो, "मोठ्या आवाजात गाणी सुरू असताना, लोकांशी बोलताना, क्रिकेट खेळताना मी सराव करतो. कारण अशाप्रकारे आपल्या मेंदूला एकावेळी अनेक गोष्टी करण्याची सवय होते."

भानूने याचं प्रात्यक्षिकही दाखवलं. मुलाखत सुरू असतानाच त्याने 48 चा पाढा म्हणून दाखवला.

भानू सांगतो, "मी जवळून जाणाऱ्या प्रत्येक टॅक्सीच्या नंबरची बेरीज करतो. कुणाशी बोलत असताना त्याने किती वेळा पापण्या लवल्या, हे मोजतो. हे सगळं ऐकायला जरा विचित्र वाटतं. पण, यामुळे माझा मेंदू सतत क्रियाशील राहतो."

लोकांना प्रेरणा मिळावी, हीच इच्छा

गणिताच्या आकडेमोडीचे इतरांचे विक्रम मोडणं, भानूला आवडतं. त्यात त्याला आनंद मिळतो. मात्र, इतरांनी केलेले विक्रम मोडणे, हे आपलं उद्दीष्ट नसल्याचं तो संगतो.

भानू म्हणतो, "गणित करताना गंमत वाटली तरच तो विषय आवडेल."

भानू म्हणतो की अनेकांना गणित आवडत नाही. लोकांमधला हा 'मॅथ्स फोबिया' आपल्याला काढायचा असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

"गणिताची भीती वाटल्याने एखाद्याच्या करिअरवरही परिणाम होऊ शकतो."

गणितज्ज्ञ कंटाळवाणे असल्याचा एक सर्वसामान्य समज आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन गणितही आनंददायी असू शकतं, हे दाखवण्याचा भानूचा प्रयत्न आहे.

भानूने आजवर अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकं पटकावली आहेत. चार जागतिक विक्रम त्याच्या नावावर आहे. अर्थातच, त्याच्या पालकांना त्याचा खूप अभिमान आहे.

आपल्या कुटुंबाने कायमच खंबीरपणे साथ दिल्याचं भानू सांगतो.

बीबीसीशी बोलताना भानू म्हणाला, "मी कधी विचारही केला नव्हता की एक दिवस मी सर्वात वेगवान 'ह्युमन कॅलक्युलेटर' म्हणून ओळखला जाईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)