संजय राऊत : गांधी घराणं हेच काँग्रेसचं आधारकार्ड #5मोठ्याबातम्या

संजय राऊत

आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईसट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. गांधी घराणं हेच काँग्रेसचं आधारकार्ड - संजय राऊत

"बिगर गांधी व्यक्तीने काँग्रेसचं नेतृत्व करावं, ही मागणी कुणी करत असेल तर ती संयुक्तिक वाटत नाही. राहुल गांधी यांच्यात नेतृत्व क्षमता आहे आणि गांधी घराणं हेच काँग्रेसचं आधारकार्ड आहे," असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

मंगळवारी (25 ऑगस्ट) आयोजित एका पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

"गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कुणी पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. राहुल गांधी यांच्या उत्तम नेतृत्वामुळेच राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. गावागावत कार्यकर्ते असलेला हा पक्ष आहे. सध्या काँग्रेसची ताकद कमी झाली आहे, त्यांनी स्वतःला सावरायला हवं," असं राऊत यांनी म्हटलं.

2. राज्यातील ई-पास बंद करण्याचा विचार सध्या तरी नाही- विजय वडेट्टीवार

"राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र सरकारचा राज्यातील ई-पास बंद करण्याचा कुठलाच विचार नाही," असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवार नागपूरमध्ये बोलत होते. "राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना ई-पास बंद केला तर संसर्ग वेगाने वाढू शकतो. त्यामुळे आणखी काही काळ ई-पास सुरू ठेवणं आवश्यक आहे," असं वडेट्टीवार म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली जिल्हाबंदी हटवून कोणत्याही राज्यात वाहतुकीसाठी ई-पासची गरज नसल्याचं केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर राज्यातील ई-पासची अट रद्द करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

राज्यातील एसटी बससेवा 20 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली. एसटीमधून प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही. पण खासगी गाडीतून प्रवास करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

पण अद्यापही सरकारचा ई-पास बंद करण्याचा विचार नसल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

दरम्यान, कर्नाटक या शेजारी राज्यात प्रवासी वाहतुकीसंबंधित सर्व नियम हटवण्यात आले आहे. त्यामुळे इथं आता ई-पास किंवा प्रवासानंतर क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या परिपत्रकानंतर कर्नाटक राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

3. अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त काळ टिकत नाही - फडणवीस

महाविकास आघाडी सरकार ही अनैसर्गिक युतीची सत्ता आहे. ती जास्त काळ टिकत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

विधिमंडळ अधिवेशनाची तारीख ठरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

"महाविकास आघाडी सरकारमध्येच अनेक विसंगती आहेत. हे सरकार अंतर्विरोधाने भरलेलं आहे. कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नाही," असं फडणवीस म्हणाले.

4. इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचं आधुनिकीकरण

देशातील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली खासगी गाड्यांची संख्या यासाठी कारणीभूत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा चांगल्या प्रकारे देणं आवश्यक आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या माध्यमातून वाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरातून वाहतुकीच्या खर्चात बचत करता येईल. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीतही घट होईल, असं सांगत रिन्यूएबल एनर्जी आणि इलेक्ट्रीक कार या विषयांवर गडकरी यांनी जोर दिला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

5. सिंगल स्क्रीन थिएटर सुरू करण्याबाबत विचार करावा - सुप्रिया सुळे

राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सिनेमा थिएटर बंद आहेत. त्यामुळे थिएटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. यामध्ये सिंगल स्क्रीन थिएटरचालकांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

थिएटर सुरू करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन सिनेमा अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले होते, त्याबाबत ट्वीट करून सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)