हैदराबाद : 9 वर्षांत 139 जणांकडून बलात्कार झाल्याची तक्रार

बलात्कार

हैदराबादमध्ये एका 25 वर्षीय महिलेने 9 वर्षात तब्बल 139 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. पंजागुट्टा पोलिसांमध्ये गेल्या शुक्रवारी (22 ऑगस्ट) ही तक्रार दाखल करण्यात आली.

मूळच्या नलगोंडा जिल्ह्यातल्या असलेल्या या महिलेने गॉडपॉवर फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ही तक्रार दाखल केली आहे.

बीबीसी तेलगुच्या दीप्ती बथिनी यांनी पीडित महिला आणि गॉडपॉवर फाउंडेशनचे राजशेखर रेड्डी यांच्याशी बातचीत केली.

फोनवरून साधलेल्या संवादात पीडितेने सांगितलं की, 15 व्या वर्षीच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. दहावीची परीक्षा दिल्यावर लगेच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. त्या म्हणाल्या, "माझे आई-वडील रोजंदारीवर काम करायचे. मला लहान भाऊ आहे. मुलाच्या कुटुंबाने माझ्या वडिलांवर लग्नासाठी दबाव आणला. त्यावेळी मला फार बोलता येत नव्हतं."

"मला वाटलं होतं की, लग्नानंतर मला माझं शिक्षण पूर्ण करता येईल. पण, तसं काहीच झालं नाही. मला मोलकरणीसारखी वागणूक मिळाली. लग्नानंतर त्यांनी आणखी हुंडा मागितला. माझ्या वडिलांकडे होतं ते सर्व त्यांनी दिलं."

मात्र, त्यांची व्यथा केवळ हुंडा आणि घरगुती हिंसाचार इथवरच मर्यादित नव्हती. सासरच्या मंडळींनीच आपल्याला देहव्यापाऱ्यात ढकलल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मला इतर पुरुषांबरोबर झोपवून हुंड्याची रक्कम भरून काढू, असं ते म्हणाले. आई-वडिलांना याबाबत काहीही सांगितलं तर त्यांनाही ठार करू, अशी धमकी द्यायचे. मी घाबरले होते. मी गप्प बसले आणि वर्षभराहूनही अधिक काळ माझ्यावर होणारा अत्याचार, लैंगिक हिंसाचार मी निमूटपणे सहन केला."

अखेर सर्व हिम्मत एकवटून त्यांनी 2010 साली घटस्फोट घेतला.

त्या माहेरी परतल्या आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केला. आता आपल्या अडचणी संपल्या, असं त्यांना वाटलं. "माझी एका महिलेशी मैत्री झाली. माझ्याबाबत काय-काय घडलं, ते सारं तिला ठाऊक होतं. तिने माझी तिच्या भावाशी भेट घालून दिली. एम. सुमन असं त्याचं नाव. आपण विद्यार्थी नेता असल्याचं त्याने मला सांगितलं. त्यांनी मला मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण, त्यांनी माझे नग्न फोटो आणि व्हीडिओ काढले आणि मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली."

शिक्षणाच्या बहाण्यानं सेक्स रॅकेटमध्ये ढकललं

पीडितेने आपल्या तक्रारीत एम. सुमन यालाच मुख्य आरोपी म्हटलं आहे. मला पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला पाठवण्यासाठी सुमन आणि त्याच्या बहिणीनेच माझ्या आई-वडिलांना तयार केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे.

त्यांनी सांगितलं, "माझ्या शिक्षणाची काळजी आम्ही घेऊ, असं त्यांनी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. मला नग्न फोटो आणि व्हिडिओचा धाक दाखवत ब्लॅकमेल करून ते हैदराबादला घेऊन गेले. तिथून पुढे मला एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे पाठवलं जायचं. मला कुठल्याच एका घरात फार काळ राहू देत नव्हते."

सुमन आणि त्याचे साथीदार सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. अनेक पुरूषांबरोबर झोपण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी तेलुगू चित्रपट क्षेत्र, प्रसारमाध्यमं, राजकारणी, राजकारण्यांचे पीए अशा काही लोकांची नावं सांगितली आहेत.

त्या म्हणाल्या, "मला न्यूड डान्स करायला सांगितलं जाई. बळजबरीने मद्य आणि अंमलीपदार्थ दिले जायचे. काही वेळा मला दिवसही गेले. ते अबॉर्शन करायचे. पण, मी एकटी नव्हते. इतरही काही मुलींना या कामात ढकलण्यात आलं होतं."

स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सुटका

गॉडपॉवर फाउंडेशन या संस्थेशी कसा संपर्क झाला, हेदेखील त्यांनी सांगितलं. जवळपास दीड वर्षांपूर्वी सुमन आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना 9 लाख रुपयांच्या बदल्यात नग्न फोटो आणि व्हीडिओ परत करू, असं सांगितलं.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मला सरकारी नोकरीची खोटी कागदपत्रं देण्यात आली. ओळखीतल्या कुणाकडून तरी पैसे माग, असं मला सांगण्यात आलं. मी राजशेखर रेड्डींकडे गेले. ते एनजीओ चालवायचे हे मला माहिती होतं. मी खूप विनवण्या केल्या. अखेर ते पैसे द्यायला तयार झाले."

प्रयत्न करूनही सुमनने पीडितेचे फोटो आणि व्हीडिओ परत केले नाही. उलट अत्याचार सुरूच होते. "त्यांनी माझ्या नावाने एक बँक खातं आधीच उघडलं होतं. ते माझे फोटो आणि डिटेल्स डेटिंग साईट्स आणि सेक्स चॅट साईट्सवर टाकायचे. त्यानंतर ते मला न्यूड व्हिडियो कॉल करण्यास सांगत आणि माझ्या बँक खात्यात जमा होणारे पैसे ते काढायचे."

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

योगायोगाने लॉकडाऊनच्या काळात राजशेखर यांनी पीडितेला त्यांच्या एनजीओमध्ये एक जॉब ऑफर दिली. राजशेखर रेड्डी म्हणाले की, दोन महिन्यांनंतर त्या आल्या आणि त्यांनी नोकरी सुरू केली. बीबीसी तेलुगुशी बोलताना राजशेखर रेड्डी म्हणाले, "एक दिवस त्या ऑफिसमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप ब्लिडिंग सुरू होतं. त्या बेशुद्ध झाल्या. आम्ही काही प्रथमोपचार केले आणि जाग आल्यावर त्यांनी सर्व हकीगत सांगितली. आम्ही एनजीओमध्येच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. आम्ही त्यांना ज्या-ज्या ठिकाणी नेण्यात आलं ते आठवायला सांगितलं. त्यानंतर आम्ही पुरावे गोळा करायला सुरुवात केली."

9 वर्ष शारीरिक आणि मानसिक छळ सहन करूनही तक्रार नोंदवणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. तक्रार नोंदवतनाही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या म्हणाल्या, "त्यांनी मला जातीवरून शिव्या दिल्या. मात्र, अखेर त्यांनी माझी तक्रार नोंदवली."

बीबीसी तेलुगुशी बोलताना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक निरंजन रेड्डी म्हणाले, "आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तसंच त्यांच्यासाठी काउन्सिलिंगची व्यवस्थाही केली आहे. आम्ही आता पीडितेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय. तिच्याकडून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न आहे. काही दिवसांत अधिक तपशील देता येतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)