कानपूर : मुलींचं धर्मपरिवर्तन करुन लग्न केल्याच्या कथित प्रकरणांवरून तणाव

  • समीरात्मज मिश्र
  • बीबीसी हिंदीसाठी
कानपूर लव्ह जिहाद

फोटो स्रोत, SAMIRATMAJ MISHRA

कानपूरमध्ये मुलींचे धर्म परिवर्तन करून लग्न केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमणार आहेत. ही प्रकरणं 'लव्ह-जिहाद'ची असल्याचा आरोप बजरंग दलसह इतर काही संघटनांनी केला आहे.

या प्रकरणातील काही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी सोमवारी (24 ऑगस्ट) कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांची भेट घेतली.

अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी टीम तयार केली जाणार आहे. यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन या भेटीनंतर महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिले.

अधिकारी सांगतात, कानपूरमधील बर्रा परिसरातील शालिनी यादव या तरुणीने गेल्या महिन्यात कानपूरच्या मोहम्मद फैजल नावाच्या मुलासोबत लग्न केले.

लग्नानंतर शालिनीच्या कुटुंबीयांनी फैजलविरोधात मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली. पण आपण एकमेकांच्या सहमतीने लग्न केले आहे हे सांगणारा व्हीडिओ शालिनी आणि फैजल यांनी तयार केला.

हे लग्न माझ्या सहमतीनेच- मुलीचा दावा

कुटुंबीयांनी आम्हाला त्रास देऊ नये असंही त्यांनी पोलिसांना सांगितलं.

मी माझ्या इच्छेने धर्म बदलला असून माझे नाव फातिमा ठेवण्यात आल्याची माहिती शालिनीने व्हीडिओमधून दिली आहे. पण शालिनीची फसवणूक केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय.

शालिनी यादवचे भाऊ विकास यादव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, " माझ्या बहिणीला पळवून नेण्यात आले. ती घरातून जाताना दहा लाख रूपये घेऊन गेली आहे. तिला धमकावून हा व्हीडिओ बनवण्यात आला. तिने तिच्या इच्छेने लग्न केले असल्यास न्यायालयात येऊन तिने साक्ष द्यायला हवी. बहिणीने आईला फोन करून सर्व काही सांगितले आहे."

शालिनी यादवने आईला फोन करून तिची मदत करण्याची मागणी केली, असे विकास यादव यांचे म्हणणे आहे. व्हीडिओमध्ये शालिनीने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवल्याची माहिती दिली आहे.

फोटो स्रोत, SAMIRATMAJ MISHRA

कानपूरमध्ये पनकी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनेही असाच आरोप केला आहे. त्यांच्या मुलीचे कथित ब्रेनवॉश करून तिचा धर्म बदलून लग्न करण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी ठरला.

अशाच पाच मुलींच्या कुटुंबीयांनी सोमवारी कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांची भेट घेतली. या सर्व कुटुंबीयांचे म्हणणे एकच आहे.

महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितलं, " पाच मुलींच्या कुटुंबीयांनी सोमवारी (24 ऑगस्ट) माझी भेट घेतली. तरुण मुलांनी यांच्या मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बदलून त्यांच्याशी लग्न केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.

ही सर्व मुलं कानपूरच्या एकाच परिसरातील असून त्यांची एक गँग कार्यरत असल्याचाही आरोप आहे. तेव्हा याच्या तपासासाठी एसआयटी बनवली जात आहे."

या घटानांविरोधात बजरंग दलाने किदवई नगर पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन करत पोलीस ठाण्याला घेराव घातला.

कानपूरच्या बजरंग दलाचे दिलीप सिंह बजरंगी यांच्यानुसार ही प्रकरणं 'लव्ह जिहाद'ची असून पूर्वनियोजित कट कारस्थान आहे. "ही मुलं हिंदूसारखी नावं ठेऊन मुलींना भेटून त्यांचे ब्रेनवॉश करतात. कानपूरमध्ये सतत अशा घटना समोर येत आहेत. ही प्रेम प्रकरणं नसून लव्ह जिहाद आहे," असे सिंह यांना वाटते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनीही या प्रकरणी ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. हे 'लव्ह जिहाद' नाही तर मग काय आहे ? असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

फोटो स्रोत, @SHALABHMANI

ते सांगतात, "परीक्षा देण्यासाठी निघालेल्या शालिनीने आपला धर्म बदलला आणि फैजलशी लग्न केले. पण प्रश्न हा आहे की, शालिनीला धर्म बदलण्याची गरज का वाटली. फैजलने धर्म का नाही बदलला? म्हणूनच आम्हाला वाटते हे प्रेम नसून 'लव्ह जिहाद' आहे. तथाकथिक बुद्धिजिवींना माझं वक्तव्य झोंबलं तर झोंबू दे."

बर्रा येथे राहणारी शालिनी 29 जूनला परीक्षा देण्याच्या नावाखाली घरातून पळून गेली. ही गोष्ट तिने स्वत: व्हीडिओमध्ये सांगितली आहे.

फैजलला गेल्या सहा वर्षांपासून ओळखत आहे असा दावा शालिनीने केला आहे. गाजियाबादमध्ये त्यांनी लग्न केले. पण कुटुंबीयांना शालिनीचा दावा मान्य नाही.

फैजलच्या कुटुंबाकडून मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. ते आपल्या घरी नसल्याचंही सांगितलं जात आहे.

मी अल्पवयीन नसून प्रौढ आहे. मी माझ्या इच्छेने लग्न केले. पण तरीही लोक याला धर्माशी जोडून आक्षेप घेत आहेत. असंही शालिनीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)