पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, पण...

  • मयुरेश कोण्णूर
  • बीबीसी प्रतिनिधी
पृथ्वीराज चव्हाण

फोटो स्रोत, facebook

काँग्रेसमध्ये नुकतंच एक नवीन वादळ उठलं आहे. काँग्रेसमधल्याच 23 महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहलं आहे. या पत्रावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही स्वाक्षरी आहे. या सर्व वादासंदर्भात बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली आहे.

काँग्रेस पक्षाला वादळाचं नाविन्य नाही. असंच एक वादळ म्हणजे 'लेटर बॉम्ब'. या पत्राकडे बघून एक प्रश्न उपस्थित होतो की काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासंदर्भातलं हे पत्र होतं. यातला पहिलाच मुद्दा अध्यक्ष निवडीचा होता. ही राहुल गांधीवर केलेली टीका होती का?

वादळ, लेटर बॉम्ब असे शब्द उचित नाहीत, असं मला वाटतं. हे काँग्रेसमधल्या 23 ज्येष्ठ लोकांनी, ज्यात माजी केंद्रीय मंत्री, कार्यकारिणी समितीचे माजी सदस्य आणि माजी मुख्यमंत्री यांचा समावेश आहे, अशा 23 जणांनी हे पत्र खाजगीरितीने काँग्रेस अध्यक्षांना पाठवलं होतं.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक या पत्रावर चर्चा करण्यासाठी होती. ती बैठक आधी ठरली होती. मग पत्र देण्यात आलं, असं नाही. नेमकं बैठकीच्या 2-3 दिवस आधी हे पत्र सार्वजनिक झालं. पण, पूर्ण पत्र आलं नाही. त्या पत्रातले काही अंश एका पत्रकाराला दिले गेले. एकाच वर्तमानपत्रामध्ये, इंग्रजी दैनिकामध्ये काही तुटक-तुटक भाग आले.

फोटो स्रोत, Alamy

मला मुळात हे सांगायचं आहे की पत्र सार्वजनिक करायचं असतं तर आम्ही 7 ऑगस्टलाच पत्रकार परिषद घेऊन पत्र सार्वजनिक केलं असतं. मात्र, आम्ही हे ठरवलेलं होतं की काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना चर्चेकरिता काही मुद्दे मांडलेले आहेत.

ते स्वीकारावे किंवा न स्वीकारावे, हा त्यांचा अधिकार आहे आणि ही पक्षांतर्गत चर्चा खुलेआम होऊ नये, असा आमचा सर्वांचाच आग्रह होता. मात्र, कार्यकारिणी बैठकीतले काही मुद्दे मिळावे, असा काहीतरी उद्देश असेल. पण, ते नेमकं 2-3 दिवसांपूर्वी प्रकट झालं.

फोटो स्रोत, facebook

तुम्ही म्हणताय की हे पत्र 23 जणांपैकी कुणीही फोडलं नाही. मग पत्र लिक कसं झालं?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हे बघा, इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकाराला कुणी पत्र दिलं, याची चौकशी करावी लागेल. काँग्रेसच्या अस्थाई आणि अंतिम स्वरुपाच्या व्यवस्थेला 1 वर्ष होऊन गेलं होतं. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नसल्याचं वारंवार लोकांना सांगत. ज्या-ज्या वेळी कुणी वेळ मागितली त्यावेळी ते म्हणायचे की मी काही अध्यक्ष नाही. तुम्ही अध्यक्षांना म्हणजे सोनिया गांधी यांना भेटा.

मात्र, त्यांच्या भेटण्यामध्ये थोड्या मर्यादा होत्या. कारण तुम्हाला माहिती आहे की कोव्हिड सुरू आहे. पण, नेट रिझल्ट काय होता तर काँग्रेस पक्ष एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जे काम केलं पाहिजे किंवा लोकांची तशी अपेक्षा आहे, ते होत नव्हतं. एकापाठोपाठ एक निर्णय काही होत होते, काही होत नव्हते. त्यामुळे मणिपूर, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा एक-एक घटना घडत गेल्या. लोकांनी काँग्रेसवर विश्वास टाकला.

काँग्रेसला निवडून दिलं. पण, आम्हाला ते यश टिकवता आलं नाही. मग हे कशामुळे होत आहे. योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे किंवा योग्यवेळी निर्णय घ्यायला कुणी तिथे उपलब्ध नव्हतं किंवा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये जी व्यवस्था होती ती कदाचित कमी पडत असेल. याची जाणीव सगळ्यांना झाली.

त्या पत्रात असं म्हटलं आहे की - Full time, effective, available and visible - हे चार शब्द जास्त महत्त्वाचे आहेत. हा रोख कुणाकडे आहे?

रोख असायचा प्रश्न नाहीय. आमची साधी मागणी अध्यक्षांकडे होती. म्हणजे आपण आपल्या अध्यक्षांकडे मागणी मागतो की पक्षाला प्रभावीपणे भाजपचा विरोध करायचा असेल तर आपल्याला पूर्ण वेळ उपलब्ध असणारा आणि लोकांच्या भेटीगाठी घेणारा अध्यक्ष पाहिजे.

फोटो स्रोत, facebook

मी तेच विचारतोय की राहुल गांधी अध्यक्ष असताना त्यांच्याबाबतीत अनेकदा हेच आक्षेप घेतले जायचे. त्यामुळे पत्रामधला रोख राहुल गांधींकडेच आहे का?

नाही. राहुल गांधी यांनी उघडपणे राजीनामाच दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यावर आणि मी त्या पदावर राहणार नाही, असं सांगितल्यावर त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रश्नच नाही.

आमचा उद्देश असा होता की एकतर राहुल गांधींनी आपला राजीनामा परत घ्यावा आणि मी पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहे आणि मी माझ्या क्षमतेप्रमाणे लोकांना भेटेन आणि मी पूर्णवेळ राहीन. पण आता काय होत होतं. कुणी राहुल गांधी यांना भेटायला गेल्यावर ते सरळ सांगायचे की मी काही अध्यक्ष नाही. मी भेटणार नाही. तुम्ही काँग्रेस अध्यक्षांना भेटा.

पत्रामध्ये जी काही माहिती फोडण्याचा प्रयत्न केला गेला, हे सांगण्यात आलं की गांधी कुटुंबातलं कुणी नको, हे साफ चुकीचं आहे. शेवटी आपल्याला टक्कर द्यायची आहे ती अमित शहा, नड्डा आणि मोदींना. ही माणसं पूर्णवेळ काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे यांना टक्कर देताना आपण जर कमी पडलो तर त्याचा परिणाम असा होतो की लोकांची इच्छा असूनही मोदींना यश मिळतं.

असं एक म्हटलं जातं की काँग्रेसमध्ये सरळ सरळ दोन गट पडलेले आहेत. एक तरुण नेत्यांचा गट जो राहुल गांधी यांच्यासोबत आहे आणि दुसरा तुमच्यासारख्या जुन्या नेत्यांचा गट ज्यातल्या अनेकांनी सहीसुद्धा केली ते राहुल गांधी यांना वारंवार येणारं अपयश हे बघात काहींनी यापूर्वी असमाधानही व्यक्त केली आहे.

फोटो स्रोत, facebook

ही अगदी चुकीची माहिती आहे. उलट एक वर्ष झाल्यामुळे आणि अजूनही अंतरिम व्यवस्था सुरू आहे म्हणून पत्र लिहिण्याचा उपक्रम आम्ही केला. राहुल गांधी जर आज राजीनामा परत घेऊन पूर्णवेळ पक्षाचे अध्यक्ष झाले तर आम्हाला अतिशय आनंद आहे. कारण आज राहुल गांधी तुम्हाला आवडो किंवा न आवडो आज एक व्हिजिबल फेस आहे. काँग्रेसकडे अजून दुसरा असा चेहरा नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे दोनच चेहरे आहेत. फक्त त्यांनी वेळ दिला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे.

मग तुमचं म्हणणं असं आहे का की राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावं?

ते झाले तर आम्हाला अजिबात अडचण नाही. त्यांनी अध्यक्ष जरूर व्हावं. पण, त्यासाठी मी माझा राजीनामा परत घेतोय. मी पूर्णवेळ अध्यक्षाची जबाबदारी घ्यायला तयार आहे, असं सांगितलं पाहिजे. मग वर्किंग कमिटीत तो निर्णय होऊ शकतो. ते स्वतः एकटे मोदींशी लढा देत आहेत. पण आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही अध्यक्ष म्हणून जबाबदारी घ्या. संघटनेची पण जबाबदारी घ्या. किंवा समजा त्यांना संघटनेची जबाबदारी खरोखरीच नको असेल तर पार्लमेंटची जबाबदारी घेऊन लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होता येईल.

तुम्हाला असं वाटतंय की काँग्रेसचा अध्यक्षसुद्धा आता निवडणूक घेऊन निवडून आणला पाहिजे?

98-99 च्या काळात सोनिया गांधी जेव्हा पक्षाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा त्या निवडून आलेल्या अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतःच्या निवडणुकीपासून कधीही पाठ फिरवली नाही. पण, त्यावेळला काय झालं की अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या.

पण त्याबरोबर कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीची प्रथा कुठेतरी थांबली. काँग्रेसच्या घटनेनुसार 135 वर्षांपैकी जवळजवळ 115 वर्षं काँग्रेसच्या निवडणुका होत होत्या. अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. पण वर्किंग कमिटीच्या सदस्यांचं काय?

का होत नाहीय ते? संघटनेच्या पातळीवर अशी परिस्थिती का आली आहे?

हाच प्रश्न आहे ना. शेवटी पक्षांतर्गत चर्चा करायची झाली तर पक्ष बळकट करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, यासाठीच्या सूचनांमधली ही एक सूचना आहे. शेवटी काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी आहेत. त्यांनी चर्चा करून सांगितलं असतं की हे शक्य नाही. चालेल ना.

पण दुर्दैवाने झालं काय तर पत्र लिहिणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकारिणीची बैठक झाली. पत्र लिहिणाऱ्यांपैकी केवळ चार जण कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि जीतिन प्रसाद. पण, यावेळी एक्सटेंडेड कार्यकारिणी बोलावण्यात आली. विशेष निमंत्रित होते. एकूण 48 जण होते. म्हणजे 44 लोक हे सही न करणारे होते आणि सही करणारे फक्त चार. त्यामुळे या चर्चेमध्ये काय होणार आहे, हे आपण लक्षात घेऊ शकतो.

मात्र, माझी अपेक्षा अशी होती की ती चर्चा होण्यापूर्वी 5 पानांच्या त्या पत्राची एक प्रत प्रत्येक सदस्याला दिली असती, त्यांना पत्र वाचायला 10 मिनिटांचा वेळ दिला असता आणि त्यानंतर त्या मुद्द्यांवर चर्चा झाली असती तर अधिक चांगलं झालं असंत. ते काही झालं नाही. उलट एका वर्तमानपत्रामध्ये जी काही लिक केलेली बातमी आली त्याच्यावर चर्चा झाली. हे दुर्दैवी आहे.

कार्यकारिणी बैठकीच्या ज्या बातम्या आल्या. त्यात म्हटलं होतं की पत्रावर चर्चा होत असताना राहुल गांधी असं म्हणाले की ज्या लोकांनी पत्र लिहिलं आहे ते भाजप सोबत आहेत. याबद्दल काय सांगाल?

एखाद्या अनऑथराईज्ड माणसाला त्या बैठकीचा अक्सेस मिळाला होता, असं दिसतंय. तो कोण होता, माहिती नाही. त्या व्यक्तीने राहुल गांधींच्या तोंडात ते वाक्य घातलं. काय टाकलं - They are in collusion with BJP. म्हणजे भाजचपे हस्तक असल्यासारखे लोक आहे, असं राहुल गांधी म्हणाले, असं वाक्य टीव्हीवर आलं.

जेव्हा हे बैठकीत कळलं तेव्हा खूप नाराजी झाली आणि कपिल सिब्बल यांनी ट्वीट केलं की मला कोण भाजपचं हस्तक म्हणतंय? त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः कपिल सिब्बल यांना फोन करून सांगितलं की मी हे म्हटलेलं नाही. चुकून माहिती बाहेर गेली. ती का गेली, याची चौकशी झाली पाहिजे.

एक प्रश्न कायम विचारला जातो की गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसकडे असावा का?

हा प्रश्नच चुकीचा आहे. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे. पहिलं प्राधान्य आमचं राहुल गांधी, सोनिया गांधी यांना आहे.

याला पर्याय काय आहे?

हाच प्रश्न आम्ही त्या पत्रात उपस्थित केला होता. पर्याय एक आहे की समजा काही दिवसांनंतर राहुल गांधी तयार झाले तर चांगली गोष्ट आहे. पण झाले नाही तर निवडणुका घेऊन काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. निवडणुकीत कुणीतरी उभं राहील. त्या माणसाला 51% मतं पडतील. त्याला लोकमान्यता मिळेल.

निवडणुका घ्या म्हणताय. पण वर्षभराचा काळ लोटून गेला. चर्चा फक्त राहुल गांधी, मग सोनिया गांधी, मग पुन्हा राहुल गांधी, मग प्रियंका गांधी, याभोवतीच फिरत राहिली. निवडणुका घेतल्या नाही. पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नाही. त्यामुळे याच तीन नावांभोवती घुटमळत राहणं, ही काँग्रेसची चूक झाली का?

आता जे झालं ते झालं. यापुढे काय, यासाठी आम्ही काँग्रेस अध्यक्षांना एक सूचनावजा पत्र लिहिलं होतं. त्या अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी मार्ग काढायचा. त्यावर चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघेल, अशी आमची अपेक्षा होती.

काँग्रेसमध्ये नाराजांचा गट आहे, असं गेल्या काही घटनांवरून दिसतं.

मला एक कळत नाही की वयाचा जर मुद्दा आपण धरला तर अलिकडे दिग्विजय सिंह यांना तिकीट मिळालं, खरगे यांना तिकीट मिळालं, तिकडे राजस्थानात सचिन पायलट ऐवजी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. मग हा जुन्या-नव्याचा वाद आहे का?

काल जीडीपीचे आकेड आले. कित्येक दशकात पहिल्यांदा अर्थव्यवस्था आकुंचली आहे. कोरोनाचं संकट निवळलेलं नाही. युपीए एकत्रिपणे विरोधक म्हणून दिसत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना काँग्रेससारखा मोठा पक्ष अंतर्गत वादामध्ये अडकणं, यामुळे नुकसान होत आहे का? राहुल गांधी व्हीडियो करतात, कधी अर्थतज्ज्ञांशी बोलतात. पण त्यात सातत्य नाही. कुणी एक व्यक्ती किंवा एकत्रितपणे यावर बोलत नाही. असं का घडतंय?

पूर्णवेळ आणि उपलब्ध हे शब्द महत्त्वाचे आहेत. भाजपसमोर एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून आपली कामगिरी कमी पडते. का कमी पडते, याचं विश्लेषण झालं पाहिजे. त्यासाठीचा आमचा प्रयत्न होता. काय होतं बघायला पाहिजे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. काँग्रेसला बळकट करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)