सोलापुरात कोरोना देवीची स्थापना, कोंबड्या-बोकडांचा बळी

कोरोना

फोटो स्रोत, Maharashtra dgipr

कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सोलापुरात उघडकीस आला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात पारधी वस्तीमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर संबंधित प्रशासनानेही तत्काळ याची दखल घेत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अंध श्रद्धा निर्मुलन समितीनं देखील लोकांना भावनेच्या आहारी न जाण्याचं आवाहन केलं आहे.

"बार्शीमध्ये काही व्यक्तींकडून 'कोरोना' नावाच्या देवीची स्थापना करण्यात आली आहे. एवढंच नाही तर स्थापन केलेल्या कोरोना देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी कोंबडा, बोकडाचा बळी देवून तिचं पूजन केलं जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना प्राप्त झाली," असं बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. डी. गिरीगोसावी यांनी सांगितलं.

पारधी वस्तीत एका घराबाहेर फरशीचा छोटासा कट्टा तयार करण्यात आला होता. त्यावर एक दगड ठेवून तर आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देऊळ बांधण्यात आलं. तसंच एका महिलेनं देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना केल्याची बातमी स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाली होती.

फोटो स्रोत, Alamy

कोरोनाच्या साथीमुळे कोरोना देवीची स्थापना आणि पूजन केल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं होतं. तसंच देवीच्या सेवेने आमचं वाईट होणार नसल्याचंही त्यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

कोरोना काळातही आपण कोणतीच काळजी घेत नसून कोरोना देवीमुळेच आपल्याला काही झालं नाही असं वक्तव्य एक महिला या व्हीडिओत करते.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमांनी याची दखल घेऊन सदर घटनेबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आक्षेप

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. समाजातील अंधश्रद्धेमुळेच अशा प्रकारची घटना घडल्याचं मत अंनिस कार्यकर्ते विनायक माळी यांनी व्यक्त केलं.

ते सांगतात, "माणसाचं मन भावनिकतेने विचार करतं. त्यातूनच हे लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. कोरोना या विषाणूजन्य रोगापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर हाच सध्या तरी उपाय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

"यापूर्वी देवी नावाच्या रोगाचे मोठ्या संख्येने रूग्ण होते त्यावर संशोधकांनी लस शोधून त्याचे निर्मूलन करण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळालं आहे. कोरोनाच्या नावाखाली कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, आरोग्यासाठी कोरोना रोगाचे मार्गदर्शन झालं पाहिजे," असंही माळी यांना वाटतं.

दरम्यान, बार्शी शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोलापूर रोडच्या पारधी वस्तीत जाऊन पाहणी केली. तिथं पूजा तसंच कोंबड्यांचा, बोकडांचा बळी देणं असे प्रकार होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

पोलिसांनी काही आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आपल्या सोबत नेलं होतं. सर्वांनी मिळून परिसरातील नागरिकांचं प्रबोधन केलं. त्यांना हात धुणं, मास्क वापरणं, स्वच्छता यांचं महत्त्व पटवून देण्यात आल्याची माहिती बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. डी. गिरीगोसावी यांनी दिली.

एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना काळातही मास्क वापरला नाही. देवीची पूजा करत असल्यामुळे आम्हाला सर्दी-खोकला काही नाही, असं वक्तव्य व्हीडिओतील महिला करताना दिसते. देवीची स्थापना करणाऱ्यांची माहिती घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ परशुराम पवार, ताराबाई भगवंत पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत. पोलीस कर्मचारी रविकांत लगदिवे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)