आदर पुनावाला: कोरोना लसीसाठी प्रयत्नशील असलेल्या पुनावालांचा 'फॉर्च्युन 40' मध्ये समावेश

आदर

फोटो स्रोत, @twitter

फॉर्च्युन मॅगझिनने यावेळी फायनान्स, टेक्नॉलॉजी, आरोग्य, राजकारण आणि प्रसार माध्यमं अशा पाच प्रकारात '40 Under 40' यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला यांचा आरोग्य क्षेत्रातल्या 40 प्रभावी व्यक्तींमध्ये समावेश करण्यात आला आहे.

जगातल्या 40 वर्षांखालील 40 प्रभावी व्यक्तींचा पाच वेगवेगळ्या विभागांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यादी तयार करण्याच्या पद्धतीत फॉर्च्युनने यंदा पहिल्यांदाच हा बदल केला आहे.

आदर पूनावालांविषयी सुरुवात करतानाच फॉर्च्युनने म्हटलं आहे की 'आज आपल्या संपूर्ण ग्रहावर आदर पूनावाला यांच्यापेक्षा जास्त मागणी खचितच कुणाला असेल.'

याचं कारणही तसंच आहे. आदर पूनावाला जगातल्या सर्वांत मोठ्या लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातल्या 'सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' या कंपनीचे प्रमुख आहेत आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या कोरोना विषाणूवरच्या लसीच्या उत्पादनासाठी जगातल्या मोठमोठ्या फार्मा कंपन्या त्यांच्यासोबत करार करू इच्छित आहेत. यापैकी अॅस्ट्राझेनका आणि नोव्हाव्हॅक्स या दोन कंपन्यांनी सिरम इन्स्टिट्युटसोबत करार केले आहेत.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनका ही फार्मा कंपनी मिळून कोव्हिड-19 आजारावरील लस विकसित करत आहेत. या लसीच्या उत्पादनासाठी त्यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटशी करार केला आहे. तसंच नोव्हाव्हॅक्स इंका ही अमेरिकी फार्मा कंपनीसुद्धा कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीवर संशोधन करत आहे.

या कंपनीनेदेखील लसीचं संशोधन आणि उत्पादन यासाठी सिरमशी करार केला आहे. या करारानुसार उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असणारे देश वगळता इतर देशांसाठी सिरमला या लसीचं उत्पादन करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images

स्वस्त दरात लस उपलब्ध करून देणारी कंपनी अशी सिरमची आधीपासूनची ओळख आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी आदर पूनावाला यांच्या वडिलांनी या कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी दरवर्षी 1 अब्ज 50 लाख लसींचे डोस तयार करते.

यात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या पोलियोपासून ते गोवरपर्यंतच्या लसींचा समावेश आहे. युनिसेफ आणि गावी यांच्या कार्यक्रमाअंतर्गत जगभरातल्या अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमधल्या लहान मुलांसाठी या लस उपलब्ध करून देण्यात येतात.

यावर्षी सिरम इन्स्टिट्युट कोव्हिड प्रतिबंधक लसीच्या उत्पादनातही हात आजमावत आहे. सिरम इन्स्टिट्युट अॅस्ट्राझेनका आणि नोव्हाव्हॅक्स या दोन्ही लसीचे 2 अब्ज डोज तयार करणार आहे. तसंच या लसीच्या एका डोसची किंमत जवळपास 3 डॉलर्स इतकी असेल. लस कमीत कमी किंमतीत उपलब्ध व्हावी, यासाठी गेट्स फाउंडेशन आणि GAVI प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, फॉर्च्युनच्या या यादीत उद्योगपती मुकेश अंबानी यांची जुळी मुलं इशा अंबानी आणि आकाश अंबानी आणि Byju's या शिक्षणविषयक लोकप्रिय अॅपचे संस्थापक बायजू रवींद्रन यांचा टेक्नॉलॉजी कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओच्या प्रगतीत इशा आणि आकाश अंबानी यांनी मोलाचा वाटा उचलल्याचं फॉर्च्युनने म्हटलेलं आहे. फेसबुकसोबत 9.99% भागीदारीसाठी 5.7 अब्ज डॉलर्सची मोठी डील फायनल करण्यात या दोघांचा मोठा हातभार होता.

शिवाय, गुगल, क्वॉलकॉम आणि इंटेल यासारख्या कंपन्यांना रिलायन्ससोबत आणण्यात आणि त्यांच्याकडून गुंतवणूक मिळवण्याचं कामही या दोघांच्या नेतृत्त्वातच पार पडलं, असं फॉर्च्युनने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

तर बायजूजबद्दल लिहिताना फॉर्च्युनने म्हटलं आहे की मोठ्या प्रमाणावर एक यशस्वी ऑनलाईन एज्युकेशन कंपनी स्थापन करणं शक्य असल्याचं त्यांनी जगाला दाखवून दिलं आहे. Byju's भारतातली सर्वात मोठी एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी बनली आहे. देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांना ही कंपनी ऑनलाईन शिक्षण देण्याचं काम करते. 2011 साली सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त फंडिंग मिळवलं आहे आणि आज ही 10 अब्ज डॉलर्सपेक्षाही मोठी कंपनी बनली आहे.

याशिवाय, सॉफ्टबँक ग्रुपचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट इनव्हेस्टमेंट अक्षय नाहेता यांचा फायनान्स कॅटेगरी, आरोग्य विभागातच मार्व्हिक व्हेंचर्सचे एमडी अंबर भट्टाचार्य आणि फार्मइझीचे सहसंस्थापक धवल शहा आणि धर्मिल शेठ यांचाही समावेश करण्यात आला आहे.

तर शाओमी इंडियाचे मनु कुमार जैन यांचंही नाव यावर्षीच्या फॉर्च्युनच्या यादीत आहे. फॉर्च्युनने लिहिलं आहे की 2014 मध्ये मनु कुमार जैन यांची शाओमीच्या भारतीय व्यवसायाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांना स्मार्टफोनविषयी फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते आपल्या बॅगेत 30-40 स्मार्टफोन ठेवायचे. जेणेकरून त्यांना मोबाईल फोनच्या फिचर्सची तुलना करता यावी. शाओमीपूर्वी मनु कुमार जैन यांनी फॅशन ई-कॉमर्स जबॉन्गची स्थापना केली होती.

यावर्षीची यादी तयार करण्याबद्दल लिहिताना फॉर्च्युनने म्हटलं आहे की कोरोना विषाणूच्या संकटामुळे काम करण्याची पद्धत आणि सोशलायझेशन यात बदल झाला आहे.

याकाळात अनेकांनी व्यवसाय सुरू ठेवण्याच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांचा सामना करत कर्मचाऱ्यांना सहकार्य करणं आणि त्यांना सशक्त करण्यासाठी तात्काळ पावलं उचलली. हाच बदल दर्शवण्यासाठी मॅगझिनने यावर्षी '40 Under 40' यादीत बदल करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)