कंगना राणावत, तुमच्या फायद्यासाठी काश्मिरी पंडितांचं नाव घेऊ नका: राहुल पंडिता #5मोठ्याबातम्या

कंगना राणावत

फोटो स्रोत, Kangana Ranaut/FACEBOOK

फोटो कॅप्शन,

कंगना राणावत

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. कंगना राणावत आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका - काश्मिरी पंडितावरील चित्रपटाचे लेखक

केवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दुःख समजू शकत नाही, असं 'शिकारा' या काश्मिरी पंडितांवर आधारित हिंदी चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी म्हटलं आहे.

काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवण्याची घोषणा अभिनेत्री कंगना राणावतनं 9 सप्टेंबरला मुंबईत दाखल झाल्यानंतर केली आहे. तिच्या या घोषणेनंतर पंडिता यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

पंडिता यांनी म्हटलं, "मला माफ करा, पण घराची भिंत पाडली म्हणून तुम्हाला काश्मिरी पंडितांची वेदना समजू शकत नाही. तीन दिवसांत आपले केस पांढरे झाले की काय? वृद्ध लोक वनवासात मरतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला घर पाहण्यास न मिळाल्याबद्दल रडतात."

ट्वीट

फोटो स्रोत, TWITTER

"आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका. आम्हाला तुमच्या अहंकाराच्या लढाईतील प्याद व्हायचं नाही. उद्या तुमच्या बोटाला काही दुखापत झाली आणि तुम्ही म्हणाल मला काश्मिरी पंडितांची वेदना समजली?" पण असं होतं नाही," असंही ते म्हणाले आहेत.

2. कंगनाच्या वक्तव्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही - शरद पवार

"कंगनाच्या या अशा वक्तव्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही. या वक्तव्यांमुळे नागरिकांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. शहाणी माणसं अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करतात. या वक्तव्यांना गांभीर्यानं घ्यायची अजिबात गरज नाही. अशा बातम्यांना मीडिया जास्त महत्त्व का देत आहे, असा मला पडलेला प्रश्न आहे," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी न्यूजनं ही बातमी दिली आहे.

शरद पवा

फोटो स्रोत, Getty Images

कंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्याविषयी पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

कंगना राणावतच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

याविषयी पवार म्हणाले, "मला त्यांच्या ऑफिसविषयी काही माहिती नाही. पण, तिथं अनधिकृत बांधकाम झाल्याचं बातम्यांमध्ये वाचलं होतं. तसं पाहिलं तर मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही. मुंबई महापालिका नियमाप्रमाणे काम करत असेल तर ते योग्य असेल."

3. परराज्यातून मुंबईत 25 लाख जणांचा परतीचा प्रवास

लॉकडाऊन शिथिल होताच आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेने परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात जवळपास 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

यामध्ये उत्तर व दक्षिणेकडून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मध्य रेल्वेवरून सर्वाधिक 16 लाख प्रवासी आल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी 15 विशेष गाड्या सोडल्या. तेवढ्याच गाड्या मुंबईत येत आहेत.

मजूर

फोटो स्रोत, Getty Images

4. आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणार - बाळासाहेब थोरात

2019 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये 26 जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती, पण 8 जिल्ह्यांतील भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती. मात्र, आता सामान्य प्रशासन विभागानं मान्यता दिल्यानं अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

ते म्हणाले, "यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पण, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागानं कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे निर्देश दिले होते.

"त्यास अनुसरून 31 जुलै 2020 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या जिल्ह्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा जिल्हाधिकारी कार्यालयानं निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांना देण्यात आले होते. पण आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील भरती प्रक्रिया आता तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे."

5. कोरोना सोडून नको त्या विषयांवर चर्चा सुरू आहेत- उर्मिला मातोंडकर

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं 42 लाखांचा टप्पा ओलांडलाय पण आपण करोना सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालतोय, असं मत अभिनेत्री आणि काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलं आहे. NDTVनं ही बातमी दिली आहे.

उर्मिला मातोंडकर

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी म्हटलं, "देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं 42 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत आपण ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषणामध्ये कोणालाही रस नाही. आपण नको त्या विषयांवर चर्चा करत बसलोय."

दरम्यान, देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता 43 लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)