रिया चक्रवर्तीला जामीन, तिच्या भावाचा जामीन कोर्टाने फेटाळला

सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रिया चक्रवर्ती

रियाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली रियाची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरला संपली. त्यानंतर कोर्टाने तिला जामीन दिला आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

मुंबई हायकोर्टाने रियाला जामीन दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर रिया चक्रवर्तीला जामीन देण्यात आला आहे. पुढील 10 दिवस तिला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे लागणार आहे. तसेच तिला आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. या काळात ती विदेश दौरा करू शकणार नाही.

याआधी, रिया चक्रवर्ती 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच राहील असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं होतं.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 22 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी झाली. दोघांनाही 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

त्याआधी, रियाच्या जामीन अर्जावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी रिया आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले होते.

रियाच्या जामिनासाठी तिचे वकील सतीश मानेशिंदे सत्र न्यायालयात गेले. सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्ती, अब्दुल बासित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचे जामीन अर्ज आज विशेष न्यायालयाने फेटाळले आहेत.

रविवारपासून सलग तीन दिवस रियाची चौकशी करण्यात आली. रियाला कलम 37 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ड्रग्स तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा गुन्हाही तिच्यावर दाखल करण्यात आला आहे.

आरोप सिद्ध झाल्यास 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात सामान्यत: जामीन देण्यात येत नाही. रियाच्या आधी तिच्या भावाला शौविकलाही अटक करण्यात आली होती. त्याच्यासोबत सॅम्यु्लल मिरांडालाही अटक करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images

NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांच्या माहितीनुसार, "दीपेश सावंत यांना ड्रग्स खरेदी आणि देवाण-घेवाणप्रकरणी अटक करण्यात आलीय. डिजिटल पुरावे आणि जबाबांच्या आधारे दीपेश सावंत यांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे."

कोण आहे रिया चक्रवर्ती?

रिया चक्रवर्ती हे नाव सध्या चर्चेत आहे. पण अनेक लोकांची पहिली प्रतिक्रिया हीच होती की, रिया चक्रवर्ती हे नाव आम्ही सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतरच पहिल्यांदा ऐकलं. त्याआधी ती कोण होती, काय करत होती याबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती होतं.

फोटो स्रोत, facebook

रिया चक्रवर्ती पहिल्यांदा स्क्रीनवर दिसली ती 2009 साली MTV च्या 'मिस टीन' या स्पर्धेत. त्यानंतर MTV ची सगळ्यात तरूण व्हीजे (व्हीडिओ जॉकी) बनण्याचा मानही तिला मिळाला.

2012 साली तिने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिचा पहिला पिक्चर होता 'तुनीगा तुनीगा.' त्याच्या पुढच्याच वर्षी तिने बॉलिवूडमध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाव्दारे पदार्पण केलं.

त्यानंतर तिने 'सोनाली केबल', 'बँकचोर' अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर 'हाफ गर्लफ्रेंड', 'दोबारा' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)