कोरोना व्हायरस : कोव्हिड 19 झालाय का हे तपासण्यासाठी कोणती टेस्ट करायची?

कोरोना चाचणी

फोटो स्रोत, Getty Images / SOPA Images

एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे शोधून काढण्यासाठी चाचणी हा एकमेव पर्याय आहे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या उपलब्धही आहेत. पण यातली कोणती चाचणी सर्वाधिक अचूक निदान करते आणि तुमच्यासाठी कोणती चाचणी योग्य ठरेल हे कसं ओळखायचं?

कोरोनाविरुद्धच्या युद्धात टेस्ट म्हणजे चाचणी हे एक मोठं शस्त्र असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं अगदी सुरुवातीपासूनच सांगितलंय. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेही सुरुवातीपासून कोव्हिडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिलेत.

कोरोना व्हायरस तुमच्या शरीरात शिरलाय की नाही हे तपासण्यासाठी तीन प्रकारच्या टेस्ट्स केल्या जाऊ शकतात.

  • RT-PCR Test
  • Rapid Antigen Detection Test
  • Rapid Antibody Test

पण या चाचण्यांमध्ये नेमके फरक काय आहेत आणि त्यांची अचूकता किती आहे हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

RT-PCR चाचणी म्हणजे काय?

RT-PCR म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction.

यालाच स्वॉब टेस्ट असंही म्हटलं जातंय. या टेस्टसाठी निर्जंतुक केलेला स्वॉब नाकात घालून सँपल घेतलं जातं आणि त्यावर चाचणी करण्यात येते.

प्रयोगशाळेतल्या या तपासणीसाठी 2 ते 5 तासांचा कालावधी लागू शकतो, पण एकूणच लॅब्सवरचा भार पाहता महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे एका दिवसांत याचे निकाल येतायत, सरकारी हॉस्पिटल्सच्या प्रयोगशाळांमध्ये यालाच 2 दिवस लागतायत.

RT-PCR Test ही कोरोनाचा संसर्ग झालाय की नाही हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते.

ICMR ने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असं म्हटलंय. तुमच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

कोरोना चाचणी

रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजे काय?

शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स असतात. आपलं शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच फॉरेन बॉडी म्हणून ओळखतं. हा घटक शरीरातला नसल्याचं आपल्याला कळतं.

या चाचण्यांमध्ये सुद्धा RT-PCR प्रमाणेच स्वॉब सँपल घेतलं जातं. पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचे निकाल साधारण अर्ध्या तासात मिळू शकतात. या स्वॉबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही हे या अँटीजेन टेस्टमध्ये कळतं. कारण, अँटीजेन्स हे विषाणूंचा एक भाग असतात.

या टेस्टचं सँपल तपासण्यासाठी प्रयोगशाळेत न्यावं लागत नाही. त्याची तिथल्या तिथे तपासणी करता येते. ही किट्स तुलनेने स्वस्त, लवकर निकाल देणारी आणि वापरायला सोपी असल्याने याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

टेस्ट किट

पण या टेस्ट्समधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Antigen Test मध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची RT-PCR चाचणी सुद्धा करवून घ्यावी असं खुद्द ICMR ने सांगितलंय.

पॉझिटिव्ह निकालांसाठी वेगळी RT-PCR टेस्ट करून घेण्याची गरज नाही असं ICMR चं म्हणणं आहे. पण वेगाने चाचण्या करण्यासाठी दुसरा खात्रीलायक पर्याय उपलब्ध नसल्याने त्यातल्या त्यात अचूक आणि विश्वासार्ह टेस्टिंग किट्सच्या मदतीने या चाचण्या केल्या जाव्या असं ICMR ने आपल्या सूचनांमध्ये म्हटलं होतं.

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट म्हणजे काय?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

एखाद्या विषाणूशी लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्लाझ्माद्वारे प्रोटीनच्या पेशी निर्माण करते. या पेशी शरीरात शिरलेल्या अँटीजेन्सवर जाऊन चिकटतात.या प्रक्रियेमुळे विषाणूची मोठ्या प्रमाणात एरव्ही होणारी निर्मिती थांबते आणि शरीरात जास्त संसर्ग होत नाही.

अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का, हे या टेस्टद्वारे तपासलं जातं. अँटीबॉडीज आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे, आणि त्याच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठीची यंत्रणा तयार झालेली आहे.

वेगवेगळ्या शहरांमध्ये सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत. लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यात जर कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडी दिसल्या तर त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय हे ओळखता येतं यासाठी या टेस्ट्सचा वापर केला जातो.

या टेस्ट्स हॉटस्पॉट्समध्ये किंवा अशाप्रकारच्या सर्वेक्षणासांठी वापरल्या जाव्या असं ICMR ने एप्रिल 2020मध्येच स्पष्ट केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)