IPL 2020: आयपीएलमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढतोय

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
तुषार देशपांडे

फोटो स्रोत, Delhi Capitals

फोटो कॅप्शन,

तुषार देशपांडे

दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थानविरुद्धच्या लढतीसाठी तुषार देशपांडेला पदार्पणाची संधी दिली आहे.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा अविभाज्य भाग असलेल्या तुषारची आयपीएल स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे.

अचूक टप्प्यावर चांगल्या वेगाने बॉलिंग करू शकणारा बॉलर अशी ओळख तुषारने मुंबईकरता खेळताना तयार केली आहे. बॉलिंग चांगली करत असला तरी नोबॉलच्या समस्येने तुषारला आणि मुंबईला सतवलं होतं. मात्र कोचच्या मार्गदर्शनाखाली तुषारने नोबॉल पडणार नाहीत यासाठी काळजी घ्यायला सुरुवात केली.

दिल्ली कॅपिटल्स संघात ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग आणि बॉलिंग कोच अनुभवी बॉलर रायन हॅरिस यांच्या मार्गदर्शनातून शिकण्याची संधी तुषारला मिळाली आहे.

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भचे 20 खेळाडू सहभागी होत आहेत. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड यांच्यापाठोपाठ तुषार देशपांडेला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

दर्शन नालकांडे, दिग्विजय देशमुख हे दोघेही यंदाच्या आयपीएलमध्ये आहेत. एकूणच आयपीएल स्पर्धेत महाराष्ट्राचा टक्का वाढतोय. यंदाच्या हंगामातील मुंबई, महाराष्ट्र तसंच विदर्भसाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा आढावा.

1.रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत नियमितपणे धावांची टांकसाळ उघडणारा बॅट्समन. रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवल्यानंतरच मुंबई इंडियन्सचं नशीब उघडलं आणि त्यांनी तब्बल चारवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

सुरुवातीच्या हंगामात रोहित डेक्कन चार्जर्सकडून खेळायचा. बॅटिंगबरोबरंच तो बॉलिंगही करायचा. डेक्कनकडून खेळताना त्याच्या नावावर हॅट्रिक आहे. मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर रोहितवरची जबाबदारी वाढली.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

देशी, विदेशी, यंग-सीनियर्स अशा सगळ्या खेळाडूंची मोट बांधण्याचं काम रोहितनं केलं. म्हणूनच आयपीएलच्या यशस्वी कॅप्टन्समध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी आहे. यावरून त्याच्या सातत्यपूर्ण बॅटिंगची कल्पना यावी. दडपणाच्या क्षणी शांत राहून डावपेचांची अंमलबजावणी करण्यात रोहित निष्णात आहे.

2.अजिंक्य रहाणे (दिल्ली कॅपिटल्स)

भारताच्या टेस्ट टीमचा आधारस्तंभ असलेला अजिंक्य ट्वेन्टी-२० प्रकारातही आपलं वजन राखून आहे. मुंबई इंडियन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि आता दिल्ली कॅपिटल्स असा अजिंक्यचा आयपीएल प्रवास आहे. तंत्रशुद्ध संयमी बॅटिंग आणि कणखर नेतृत्व हे अजिंक्यच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे.

सीनियर प्लेयर असूनही अजिंक्यला दिल्लीच्या अंतिम अकरात स्थान मिळेल का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. युएईतल्या फिरकीला अनुकूल पिचेसवर अजिंक्यचं तंत्र उजवं ठरू शकतं. बॅटिंगच्या बरोबरीने अफलातून फिल्डिंग ही टीमसाठी जमेची बाजू आहे. स्ट्राईकरेटवरून अजिंक्यच्या खेळावर टीका झाली आहे. यंदाच्या हंगामात संधी मिळाल्यानंतर अजिंक्य टीकाकारांना बॅटने उत्तर देईल.

3.धवल कुलकर्णी (मुंबई इंडियन्स)

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA

फोटो कॅप्शन,

धवल कुलकर्णी

आयपीएलचे बाराच्या बाराही हंगामात खेळलेला एकमेव भारतीय फास्ट बॉलर अशी धवल कुलकर्णीची ओळख आहे. मुंबई-राजस्थान-गुजरात-मुंबई असा धवलचा आयपीएल प्रवास आहे.

ट्वेन्टी-२० प्रकारात धवलने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. विकेट्स काढण्याबरोबरीने रन्स रोखण्यात धवल वाकबगार आहे. फास्ट बॉलर असूनही धवलची फिल्डिंग उत्तम आहे. विविध संघांविरुद्ध आणि विविध संघांसाठी खेळण्याचा धवलचा प्रदीर्घ अनुभव मुंबईच्या कामी येईल यात शंकाच नाही.

4. शार्दूल ठाकूर (चेन्नई सुपर किंग्स)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शार्दूल ठाकूर (केंद्रस्थानी)

किंग्ज इलेव्हनपासून आयपीएल पदार्पण करणारा शार्दूल आता धोनीच्या चेन्नई टीमचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी धोनी शार्दूलकडे बॉल सोपवतो हे क्रिकेटचाहत्यांनी पाहिलं आहे.

गेल्या वर्षीच्या फायनलमध्ये शार्दूलने 2 विकेट्स घेतल्या. मात्र बॅटिंग करताना लसिथ मलिंगाच्या वेगवान यॉर्करवर तो एलबीडब्ल्यू झाला आणि चेन्नई अवघ्या एका रनने जेतेपद गमावलं. फिरकीला पोषक पिचेसवर शार्दूलला संधी मिळते का हे पाहणं रंजक ठरेल.

5. दर्शन नालकांडे (किंग्ज इलेव्हन पंजाब)

विदर्भचा दर्शन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग आहे. दमदार वेगाने बॉलिंग करणे, चांगली फटकेबाजी करणे आणि उत्तम फिल्डिंग करणे अशा तिन्ही आघाड्या दर्शन सांभाळू शकतो.

पंजाबचे हाय परफॉर्मन्स कोच प्रसन्न अगोराम यांनी दर्शनमधली गुणवत्ता हेरली. तेराव्या वर्षी विदर्भचे माजी कर्णधार प्रीतम गंधे यांनी दर्शनला व्हीसीए अकादमीत आणलं.

विदर्भसाठी वयोगट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याचा फायदा दर्शनला झाला. दर्शनचं आयपीएल पदार्पण अजून झालेलं नाही मात्र 22वर्षीय दर्शनला ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, लोकेश राहुल, मोहम्मद शमी अशा मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळतो आहे.

6. निखिल नाईक (कोलकाता नाईट रायडर्स)

एका टीव्ही सीरियलमधलं अण्णा नाईकांचं पात्र लोकप्रिय आहे. आयपीएलमधले नाईकबुवा तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघात वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल आहे.

चांगला बॉलवरही सिक्सर लगावण्याची रसेलची क्षमता आहे. निखिलला इंडियन रसेल असं म्हटलं जातं. मूळचा सावंतवाडीचा असणारा निखिल महाराष्ट्र संघाकडून खेळतो. ताकदीच्या बळावर पल्लेदार फटके लगावणं त्याची खासियत आहे. किंग्ज इलेव्हनकडून खेळणारा निखिल आता कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात आहे.

7. केदार जाधव (चेन्नई सुपर किंग्स)

टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव कमावून व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वत:ची छाप उमटवणारा मराठमोळा खेळाडू. आक्रमक बॅटिंग, बॅट्समनला चक्रावून टाकणाऱ्या अक्शनसह बॉलिंग हे केदारचं वैशिष्ट्य आहे.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघासाठी धावांच्या राशी ओतणारा केदार आयपीएलमध्ये दिल्ली, बेंगळुरू, कोची आणि आता चेन्नई संघासाठी खेळतो. धोनीचा विश्वासू साथीदार अशी त्याची ओळख आहे. धोनीच्या वाढदिवशी 7 जुलैला केदारने बीबीसी मराठीला खास मुलाखत दिली होती.

8. ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)

महाराष्ट्र आणि त्यानंतर इंडिया ए साठी चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराजच्या खेळाने खुद्द धोनी प्रभावित झाला. 23वर्षीय ऋतुराज भरपूर रन्स करण्यासाठी ओळखला जातो.

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. सुरेश रैना मायदेशी परतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळू शकते अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र नियमांनुसार ठराविक अंतरात घेतल्या गेलेल्या कोरोना चाचणीत ऋतुराज पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला क्वारंटीन व्हावं लागलं आहे. त्याची दुसरी चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह आल्याने तो पहिले काही सामने तरी खेळू शकणार नाही.

धोनी, वॉटसन, ब्राव्हो, ताहीर, डू प्लेसिस अशा दिग्गजांबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा अनुभव ऋतुराजला नक्कीच उपयोगी ठरेल.

9. श्रेयस अय्यर (दिल्ली कॅपिटल्स)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

श्रेयस अय्यर

मुंबईसाठी खोऱ्याने धावा करणारा तरुणतुर्क श्रेयसकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व आहे. गौतम गंभीरसारख्या अनुभवी खेळाडूने दिल्लीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर श्रेयसकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने या जबाबदारीला न्याय दिला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाचा फायदा श्रेयसला होतो आहे. संघात शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन असे आयपीएल कर्णधार असतानाही श्रेयसच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवण्यात आला आहे. पक्का मुंबईकर मात्र आयपीएलमध्ये श्रेयस सगळे हंगाम दिल्लीकडूनच खेळला आहे.

दिल्लीसाठी वेळोवेळी त्याने निर्णायक खेळी केल्या आहेत. कॅप्टन आणि बॅट्समन अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेयसला यंदा सिद्ध करायचं आहे.

10. तुषार देशपांडे (दिल्ली कॅपिटल्स)

मुंबईकर तुषार देशपांडेसाठी आयपीएल पदार्पण वर्ष असणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चांगली बॉलिंग करून तुषारने कष्टाने हे स्थान पटकावलं आहे.

जगातल्या सर्वोत्तम युवा फास्ट बॉलर्सच्या यादीत नाव घेतलं जाणाऱ्या कागिसो रबाडाच्या तसंच भारताचा अनुभवी इशांत शर्माच्या बरोबरीने तुषारला वावरायला मिळतं आहे. हा अनुभव 25 वर्षीय तुषारसाठी मोलाचा ठरेल.

11. पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स)

फोटो स्रोत, Robert Cianflone

फोटो कॅप्शन,

पृथ्वी शॉ

विसाव्या वर्षीच सेलिब्रेटी झालेला पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सच्या योजनांचा अविभाज्य घटक आहे. जराही दबावाखाली न येता तुफान फटकेबाजी ही पृथ्वीची ओळख आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने 546 रन्सची मॅरेथॉन खेळी करत क्रिकेटरसिकांना दखल घ्यायला भाग पाडलं.

रणजी आणि दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणात शतक झळकावण्याचा मान पृथ्वीच्या नावावर आहे. पृथ्वीच्याच नेतृत्वाखाली भारताच्या U19 टीमने वर्ल्डकप जिंकला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावत सगळ्यात लहान वयाचा कसोटी पदार्पणवीर ठरला.

गेल्यावर्षी डोपिंगप्रकरणी बीसीसीआयने पृथ्वीवर आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई केली. पृथ्वीचा दिल्लीकडून खेळण्याचं हे तिसरं वर्ष आहे. ऋषभ पंत, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर अशा खेळाडूंबरोबर असल्याने पृथ्वीला अंतिम संघात स्थान टिकवण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

12. सिद्धेश लाड (कोलकाता नाईट रायडर्स)

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाचा रनमशीन असलेल्या सिद्धेश लाडला आयपीएल पदार्पणासाठी तब्बल पाच वर्ष प्रतीक्षा करावी लागली.

2015 ते 2019 या कालावधीत सिद्धेशला केवळ एक मॅच खेळण्याची संधी मिळाली तीही मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला म्हणून. भरपूर रन्स करण्याची क्षमता असूनही मुंबई इंडियन्सच्या पॉवरपॅक्ड संघात त्याला जागा मिळू शकत नाही. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर सिद्धेशला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ताफ्यात समाविष्ट केलं आहे.

अंतिम अकरात संधी मिळाल्यास सिद्धेशला आपलं कर्तृत्व सिद्ध करता येईल.

13. राहुल त्रिपाठी (कोलकाता नाईट रायडर्स)

डेक्कन जिमखान्यापासून क्रिकेटला सुरुवात करणारा राहुल महाराष्ट्रासाठी नियमितपणे रन्स करतो आहे. बेसबॉल स्टाईल बॅटिंगसाठी तो प्रसिद्ध आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्ससाठी राहुलने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर राहुलला राजस्थान रॉयल्सने संघात घेतलं. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

राजस्थानने रिलीज केल्यानंतर यंदा कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं आहे. त्रिपाठी कोलकातासाठी ट्रंप कार्ड ठरू शकतो.

14. दिग्विजय देशमुख (मुंबई इंडियन्स)

लिलावात मुंबई इंडियन्स संघाने दिग्विजयला संघात घेतलं आणि हा खेळाडू कोण याची चर्चा सुरू झाली. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या कई पो चे सिनेमात 14 वर्षीय अली हाशमी नावाचा क्रिकेटपटू होता.

अलीचं काम दिग्विजयने साकारलं होतं. दिग्विजय यंदा पडद्यावर दिसू शकतो ते कोणाच्या तरी भूमिकेत नव्हे तर मुंबई इंडियन्ससाठी बॉलिंग करताना. फास्ट बॉलर ही त्याची ओळख आहे. दिग्विजय मूळचा बीड जिल्ह्यातला आहे, महाराष्ट्र संघांसाठी खेळतो.

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हीडिओत दिग्विजय रोहित शर्माला बॉलिंग करताना दिसला होता.

ट्रेंट बोल्ट, नॅथन कोल्टिअर नील, जेम्स पॅटिन्सन, रोहित शर्मा, कीरेन पोलार्ड, क्विंटन डी कॉक या मोठ्या खेळाडूंबरोबर ड्रेसिंगरुम शेअर करण्याचा अनुभव दिग्विजयसाठी मौल्यवान असेल.

15. आदित्य तरे (मुंबई इंडियन्स)

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व करणारा विकेटकीपर बॅट्समन. मुंबई-हैदराबाद-दिल्ली आणि पुन्हा मुंबई असा आदित्यचा आयपीएल प्रवास आहे.

क्विंटन डी कॉक आणि इशान किशन संघात असल्यामुळे आदित्यला अंतिम अकरात मुसंडी मारणं नेहमीच आव्हानात्मक आहे. युएईतील पिचेस फिरकीला पोषक अशी आहेत. स्पिन बॉलिंग खेळण्याचा अनुभव लक्षात घेता आदित्यला अंतिम अकरात संधी मिळू शकते.

2014चा हंगाम सोडला तर आदित्यला नियमित संधी मिळालेली नाही परंतु मुंबई इंडियन्सच्या भरवशाच्या मानकऱ्यांमध्ये त्याचा समावेश होतो.

16. सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)

फोटो स्रोत, Robert Cianflone

फोटो कॅप्शन,

सूर्युकमार यादव

मुंबई-कोलकाता-मुंबई असा सूर्यकुमारचा आयपीएल प्रवास आहे. यंदाच्या डोमेस्टिक हंगामात सूर्यकुमारने खोऱ्याने रन्स केल्या आहेत. दशकभर डोमेस्टिक क्रिकेट खेळलेल्या सूर्यकुमारला टीम इंडियाची दारं उघडलेली नाहीत.

यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार प्रदर्शन करत टीम इंडियाच्या ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्या उत्सुक आहे. सूर्यकुमारसाठी हा आठवा आयपीएल हंगाम असणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार असणं आश्वासक आहे.

17.यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स)

परिस्थितीशी संघर्ष करत, प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुंबईची मैदानं गाजवणारा यशस्वी जैस्वालचं हे आयपीएल पदार्पण वर्ष असणार आहे. मैदानावरच्या तंबूत राहून, पाणीपुरी विकून यशस्वीने हा टप्पा गाठला आहे.

फोटो स्रोत, Jan Kruger-ICC

फोटो कॅप्शन,

यशस्वी जैस्वाल

प्रयोगशील संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी खेळतो आहे. गेल्या वर्षी झालेल्या U19 स्पर्धेत धावांची फॅक्टरी उघडणाऱ्या यशस्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सगळ्यात लहान वयाचा बॅट्समन आहे.

स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, जोस बटलर यासारख्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव 18वर्षीय यशस्वीसाठी आयुष्यभराचा ठेवा असेल.

18. उमेश यादव (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)

टीम इंडियाचा वेगवान शिलेदार. उमेशची लयबद्ध अक्शन आणि भन्नाट वेगाने बॅट्समनला जाळ्यात पकडणं पाहणं सुरेख अनुभव असतो.

विदर्भवीर उमेश आयपीएलमध्ये दिल्ली-कोलकाता-बेंगळुरू या संघाकडून खेळला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबाला पहिल्यावहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा आहे. विकेट्स पटकावण्यात माहीर असलेल्या उमेशला रन्स रोखण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पिळदार शरीरयष्टी आणि उत्तम फिल्डिंग ही उमेशची ओळख दुर्लक्षून चालणार नाही.

19. सर्फराझ खान (किंग्ज इलेव्हन पंजाब)

हॅरिस शिल्ड स्पर्धेत 439 धावांची मॅरेथॉन खेळी साकारत सर्फराझ पहिल्यांदा चमकला. सर्फराझने दोन U19 वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरूने प्रचंड रक्कम मोजून सर्फराझला संघात घेतलं. आक्रमक खेळी करत सर्फराझने विराट आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला. मात्र फिटनेसबाबतीत काही गोष्टी पाळू न शकल्याने खप्पा मर्जी झाली. बेंगळुरूने संघातून बाजूला केल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ताफ्यात घेतलं.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी उत्तर प्रदेशकडून खेळण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र एका हंगामानंतर तो मुंबईला परतला. यंदाच्या वर्षीच जानेवारी महिन्यात सर्फराझने त्रिशतकी खेळी साकारली. सर्फराझचा फॉर्म पाहता प्रतिस्पर्ध्यांसाठी तो डोकेदुखी ठरू शकतो.

20. शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)

खणखणीत फटके, मीडियम पेस बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग या त्रिसुत्रीमुळे शिवम दुबे हा कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावण्याचा विक्रम शिवमच्या नावावर आहे. फिटनेस सुधारत शिवमने व्यावसायिक क्रिकेटसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)