सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टः टाटा उद्योग समूह बांधणार नवी संसद #5मोठ्या बातम्या

संसद

फोटो स्रोत, MONTEY SHARMA

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. नव्या संसदेचं कंत्राट टाटा ग्रुप्सला

दिल्लीत बांधण्यात येणाऱ्या नव्या संसदेचं कंत्राट टाटा ग्रुपला मिळणार आहे. टाटा ग्रुपने हे कंत्राट 861.9 कोटी रुपयांना मिळवलं आहे.

हे कंत्राट मिळवण्यासाठी देशातील सात कंपन्यांची नावे आघाडीवर होती. पण, या स्पर्धेत टाटा ग्रुपने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट जिंकलं आहे.

सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत राजधानी दिल्लीतील जनपथ आणि परिसरात अनेक नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत.

भारताच्या जुन्या संसदेच्या बाजूलाच ही नवी संसद बांधण्यात येणार असून इमारतीच्या निर्मितीसाठी अंदाजे 21 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

2. मराठा आरक्षणाबाबत लवकर कायदेशीर बाबी तपासून घटनापीठाकडे जाणार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर याप्रकरणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुन्हा आंदोलनं होताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्यातील सर्वपक्षीय बैठक पार पडली. मराठा आरक्षण प्रकरणी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात एकमत झालं असून लोकांनी आता आंदोलन करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

तसंच मराठा आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबी तपासून राज्य सरकार घटनापीठाकडे जाणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली.

"सर्वोच्च न्यायलयातील याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

3. टेली आयसीयू योजना राज्यात सर्वत्र लागू होणार - राजेश टोपे

राज्यात कोरोनाचं संकट सुरू झालेलं असताना सहा जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू योजना सुरू करण्यात आली होती.

या योजनेचा फायदा रुग्णांना झाल्याचं दिसून आलं आहे, ही योजना आता राज्यात सर्वत्र लागू होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ही बातमी ईटीव्ही भारतने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

टेलीआयसीयू योजनेत तज्ज्ञ डॉक्टर कोणत्याही ठिकाणाहून रुग्णाला कॅमेऱ्याद्वारे तपासू शकतात. त्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा सर्व जिल्ह्यात उभी केली जाणार आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना याचा चांगला उपयोग होईल असं टोपे म्हणाले.

शिवाय, कोरोनाची दुसरी लाट अद्याप सुरू झालेली नाही, तसंच ऑक्सिजन तुटवडाही राज्यात नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

4. राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ

राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्या संसदेतील भाषणानंतर राजकीय गदारोळ माजला होता. त्यानंतर जया बच्चन यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने जया बच्चना आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

दिल्ली येथे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान अभिनेता व खासदार रवि किशन यांनी बॉलीवूडमधील ड्रग्स रॅकेटची चौकशी करावी, अशी मागणी लोकसभेत केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत बोलताना जया बच्चन यांनी रवि किशन यांच्यावर टीका केली होती.

रविकिशन हे बॉलीवूडची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला होता. त्यानंतर जया बच्चन यांच्यावर मोठ्या प्रमाणत टीका करण्यात येत आहे. खबरदारी म्हणून महाराष्ट्रात त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ही बातमी दैनिक सकाळने दिली आहे.

5. आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

शिक्षकांच्या मागण्यांसाठी एका शिक्षकाने आमदार निवासातील चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईतील मंत्रालय परिसरातील आकाशवाणी आमदार निवासात ही घटना घडल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व पोलिसांसह अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी जमले व त्यांनी शिक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता.

या शिक्षकाचे नाव गजानन खैरे असून ते नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक आहेत.

कोरोना काळात आम्हाला काम मिळाले नाही, शिवाय पगार देखील मिळालेला नाही. कोणीही आमच्याकडे लक्ष देत नाही. आता मी खूप थकलेलो आहे. जिवंत असताना मला न्याय मिळाला नाही, किमान मेल्यावर तरी मला न्याय मिळू द्या, असं शिक्षकाचं म्हणणं आहे, ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)