नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशीच 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' का ट्रेंड का होत आहे?

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, NARENDRA MODI/FACEBOOK

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi असे हॅशटॅग्स ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. यासोबत आणखी एक हॅशटॅग आहे जो ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.

#NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हे दोन हॅशटॅग नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त का ट्रेंड होत आहेत?

याचे कारण म्हणजे मोठ्या संख्येने देशातील विद्यार्थी आणि तरूण वर्ग रोजगारासाठी संघर्ष करत आहे. कोरोना संकटकाळात भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगारासंबंधी समस्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी असे विषय ट्रेंड होत आहेत.

फोटो स्रोत, TWITTER

बेरोजगारीमुळे तरूणांचे हाल

राष्ट्रिय सांख्यिकी कार्यालयाने (National statistics office/NSO) दिलेल्या माहितीनुसार, यंदा एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये उणे 23.9 टक्क्यांपर्यंत झाली आहे. गेल्या 40 वर्षातली ही मोठी घसरण आहे.

एवढेच नव्हे तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार भारताचा शहरी बेरोजगारीचा दर 6 सप्टेंबरच्या आठवड्यात 8.32 टक्क्यांवर आला.

लॉकडॉऊन आणि आर्थिक मंदीमुळे लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत आणि अनेकांचा रोजगार ठप्प झाला आहे.

फोटो स्रोत, SOPA IMAGES

सेंटर फॉर इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीनुसार, लॉकडॉऊन लागू झाल्यानंतर महिन्याभरातच सुमारे 12 कोटी लोकांनी आपले काम गमावले. यापैकी बहुसंख्य लोक हे असंघटित आणि ग्रामीण भागागातले आहेत.

CMIE नुसार, संघटित क्षेत्रातील वेतनावर काम करणाऱ्या 1.9 कोटी लोकांनी लॉकडॉऊन दरम्यान आपली नोकरी गमवली आहे.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि आशियाई विकास बँकेच्या आणखी एका अहवालानुसार, 30 वर्षांखालील 40 लाखांहून अधिक भारतीय तरुणांनी लॉकडॉऊनमध्ये नोकरी गमावली आहे. 15-24 वयोगटातील बालक आणि तरुणांना सर्वाधिक फटका बसल्याचेही अहवाल सांगतो.

विद्यार्थ्यांमध्ये वाढती नाराजी

आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने तरुण वर्ग सरकार विरोधात आपली नाराजी सातत्याने व्यक्त करत आहेत. याचेच एक उदाहरण सोशल मीडियावर विशेषत: ट्विटरवर विविध ट्रेंड्सच्या माध्यमातून दिसत आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय विद्यार्थी आणि तरुण सोशल मीडियावर सरकारविरोधात तीव्र मोहीम चालवत आहेत. बेरोजगारांसहित विद्यार्थी वर्गसुद्धा सरकारवर नाराज आहे.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

विविध स्पर्धा परीक्षा, पदवी आणि नीट-जेईई सारख्या प्रवेश परीक्षांच्या बाबतीत सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात येत आहे.

तसेच विविध शाखांमधली नोकरभरती निश्चित वेळेत न झाल्यानेही नाराजी आहे.

नोकरभरतीच्या जाहिराती काढून लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा घेतली जावी आणि त्याचे निकालही वेळेत जाहीर व्हावेत अशी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांची मागणी आहे. याशिवाय, शैक्षणिक संस्था वाढीव शुल्क आकारत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून करण्यात येत आहे. यात सरकारने लक्ष घालावे अशी अपेक्षा आहे.

याआधी 9 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी देशाच्या विविध भागांतील तरुणांनी मशाल हातात घेऊन, मोबाईल फ्लॅश आणि दिवे पेटवून आंदोलने केली आणि आपले म्हणणे सरकार दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला. याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर ट्रेंड केले गेले.

या मोहीमेचा पुढील टप्पा म्हणून विविध विद्यार्थी संघटना 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस असा ट्रेंड चालवून सरकारच्या कारभाराविरोधात निषेध नोंदवत आहेत. विविध संघटना आणि विरोधी पक्षाकडून या मोहिमेला समर्थन दिले जात आहे.

#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस आणि #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग चालवून तरुण वर्ग सरकारसमोर आपले मुद्दे मांडत आहे. यावरुन सोशल मीडियावर विविध प्रकारचे मीम्स व्हायरल होत आहेत.

अनेक विद्यार्थ्यांनी तर आपल्या ट्विटर हँडलच्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला आहे.

हंसराज मीना ट्विट करतात, "मोदीजी, तरुणांच्या भविष्याशी खेळू नका.

एका ट्विटर युजरने भोजपुरीत लिहिले, "SSC भुलाय ग़यिल बा, की आज CGL 220 का नोटिसवा निकाले का रहा. कोई बतावा उनका , नाही SSC सोयिते रहिल."

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम आणि भाजपच्या अनेक यूट्यूबवरील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने नापसंत (डिसलाईक) करण्यात आले. यालाविद्यार्थी आणि तरुणांची नाराजी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हे काँग्रेसचे षडयंत्र आणि तुर्की बॉट्सला जबाबदार धरले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )