आदित्य ठाकरे: मुंबईकरांनो घाबरू नका, हा लॉकडाऊन नाही

@AUThackeray

फोटो स्रोत, @AUThackeray

31 ऑगस्टला काढलेल्या आदेशानुसार कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलेली मुंबईमधील जमावबंदी आज संपणार होती. पण मुंबई पोलिसांनी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

नवे आदेश निघाल्यानंतर मुंबईत घबराहट निर्माण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना घाबरू नका असं आवाहन केलं आहे.

"हा लॉकडाऊन नाही," असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. "नवा आदेश हा जुन्याच आदेशाची मुदतवाढ झाली असं सांगणारा आहे. कोणतेही नियम किंवा बंधने नव्याने लादण्यात आलेली नाहीत," असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

"हा लॉकडाऊन नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका," असं आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 90,123 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे भारताल्या आतापर्यंतच्या एकूण कोव्हिड रुग्णांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा पार केलाय.

भारतामध्ये सध्या 9,95,933 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

कोरोनाग्रस्तांच्या जगभरातल्या आकडेवारीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

काय आहे या आदेशात?

31 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या सुधारित नियमावलीनुसार (मिशन बिगिन अंतर्गत) हा आदेश लागू करण्यात आला होता. या आदेशाची मुदत 16 सप्टेंबरला मध्यरात्री संपणार होती. त्यात मुदतवाढ करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

नव्याने कोणताही आदेश लागू करण्यात आलेला नसल्याचं डीसीपी ऑपरेशन्सतर्फे सांगण्यात आलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बहुतांश जनजीवन सुरू झालं. वाहतूकही सुरू झाली.

यामुळे लोकांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं प्रमाणही वाढलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 10,97,856 एवढी झाली आहे.

मुंबईत 16 सप्टेंबरला कोरोना रुग्णांची संख्या 1,75,974 इतकी आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 8280 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना आकडेवारी कमी होत नसल्यामुळे जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

काय आहे कलम 144?

  • कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
  • एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.
  • या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.
  • जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
  • कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.
  • वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
  • कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
  • या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)