IPL 2020: मुंबईचं रो'हिट' अभियान

मुंबई, कोलकाता

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन,

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह

कर्णधार रोहित शर्माचं अर्धशतक, फास्ट बॉलर्सनी केलेली शिस्तबद्ध बॉलिंग आणि त्यांना फिल्डिंगची मिळालेली उत्तम साथ या त्रिसुत्रीच्या बळावर मुंबईने आयपीएल स्पर्धेत कोलकातावरचं वर्चस्व कायम राखत विजय मिळवला. मुंबईने 195 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाताने 146 रन्स केल्या.

चेन्नईविरुद्धच्या लढतीत रोहितला मोठी खेळी करता आली नव्हती. त्याची कसर त्याने कोलकाताविरुद्ध भरून काढली. रोहितने 54 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्ससह 80 रन्सची दिमाखदार खेळी केली. रोहित आणि सूर्यकुमार यादव जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 90 रन्सची केलेली भागीदारी मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरली. सूर्यकुमारने 28 बॉलमध्ये 47 रन्सची खेळी केली. सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या आणि कायरेन पोलार्ड यांनी छोट्या उपयुक्त खेळी केल्या. 15.5 कोटी रुपये खर्चून ताफ्यात घेतलेल्या पॅट कमिन्सने 3 ओव्हरमध्ये 49 रन्स केल्या. मात्र त्याचवेळी सुनील नरिनने 22 रन्सच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना कोलकाताने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. पॅट कमिन्सने 12 बॉलमध्ये 33 रन्स करत थोडा प्रतिकार केला. जसप्रीत बुमराहने 16व्या ओव्हरमध्ये आयोन मॉर्गन आणि आंद्रे रसेल यांना आऊट करत मुंबईचा विजय पक्का केला. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रोहित शर्मालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)