रोहित पवार : राज्याच्या हितासाठी बोलण्याची वेळ येते तेव्हा भाजप नेते कुठे लपतात? - #5मोठ्याबातम्या

रोहित पवार

फोटो स्रोत, RoHIT PAWAR/FACEBOOKPAGE

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. राज्याच्या हितासाठी बोलण्याची वेळ येते तेव्हा भाजप नेते कुठे लपतात - रोहित पवार

"राज्य आर्थिक संकटात असताना आपल्या हक्कांच्या पैशांसाठी केंद्र सरकारसोबत भांडायची वेळ येते तेव्हा विरोधक राज्य सरकारची साथ देणे तर सोडून द्या पण कुठे जाऊन लपतात हेही कळत नाही," या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकमत वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्राला जीएसटीची नुकसान भरपाई येणं प्रलंबित आहे. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्याचं महसूली उत्पन्न घटल्यास पाच वर्षांसाठी नुकसान भरपाई देण्यात येईल अशी तरतूद आहे.

या विश्वासावरच राज्यांनी जीएसटी कायद्याला मंजूरी दिली. पण केंद्र सरकारने हा विश्वास पायदळी तुडवला, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय.

2. राज्याला अधिकार नसताना फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिलं - हरिभाऊ राठोड

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाकडून अंतरिम स्थगिती दिल्याने महाविकास आघाडीवर विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात येत आहे. पण मराठा आरक्षण मोदी आणि फडणवीस सरकारच्या घोडचुकीमुळे लटकलं, असा आरोप आता ओबीसी समाजाचे नेते खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

घटनात्मकदृष्ट्या मराठा आरक्षणासाठी असा वेगळा कायदा करण्याचा अधिकार मुळातच राज्यांना नाही. तरीही फडणवीस सरकारने असा कायदा आणला आणि म्हणून आता मराठा आरक्षण टिकवण्याचे आव्हान उभं राहिलं, असं मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केलं.

2018 मध्ये संविधान दुरुस्ती कायदा 102 अस्तित्वात आला. यामुळे कलम 342 (अ) या अंतर्गत राज्याला 16 (4) नुसार असलेलं आरक्षण देण्याचे अधिकार संपुष्टात आले. यानुसार कोणत्याही राज्याला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेत तो मंजूर करून घ्यावा लागेल हे स्पष्ट असतानाही फडणवीस सरकारने परस्पर कायदा कसा केला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

3. रफाल विमान खरेदी प्रकरणी केंद्र सरकारवर कॅगचे ताशेरे

फोटो स्रोत, IAF_MCC ON TWITTER

भारतीय वायू दलाच्या ताफ्यात पाच रफाल लढाऊ विमानांचा समावेश झाला. त्यावेळी या विमानांच्या खरेदीवरून भाजप सरकारवर आरोप करण्यात आले होते. आता कॅगनेही रफाल विमान खरेदी प्रकरणात केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

फ्रेंच कंपनीने करारानुसार त्यांचे काम पूर्ण केलं नसल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवला आहे. डसॉल्ट या फ्रेंच कंपनीसोबत 36 रफाल अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी 59 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता.

या करारानुसार सप्टेंबर 2015 पर्यंत संबंधित कंपनी DRDO ला 30 टक्के अत्याधुनिक ऑफसेट देईल असं ठरलं होतं. मात्र, अद्यापही याची पूर्तता झाली नसल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे.

रफालसहीत संरक्षण दलाच्या इतरही करारांवर कॅगने भाष्य केलं आहे.

4. गौतम गंभीरने धोनीला सुनावले

सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येणे म्हणजे समोरून लढणे होत नाही, असा टोला गौतम गंभीरने महेंद्र सिंह धोनीला लगावला आहे. महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिलीय.

फोटो स्रोत, Getty Images

राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा 16 धावांनी पराभव झाला. पण धोनी लवकर फलंदाजीसाठी उतरला असता तर निकाल वेगळा असता, असं मत अनेकांनी मांडलं. याच आधारावर गौतम गंभीरनेही धोनीला सुनावलं आहे.

ESPNCrickinfo शी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, "धोनीने किमान समोरून लढायला हवं होतं. सातव्या स्थानी खेळण्यासाठी येणे म्हणजे समोरून लढणे नव्हे. धोनीने त्याच्या आधी ऋतुराज गायकवाड आणि सॅम करनला पाठवलं यावर माझा विश्वास बसत नाही."

5. ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर (84) यांचं बुधवारी निधन झाले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे. सध्या सुरू असलेली मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मध्ये त्यांनी भूमिका साकारली. अलका कुबल यांच्यासोबत 'धनगरवाडा' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.

विविध नाटक, सिनेमा आणि टिव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 50 हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. 'नर्तकी' हे त्यांचे गाजलेलं नाटक होतं. राज्यभरात या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग पार पडले.

तर अनेक टिव्ही मालिका आणि सिनेमांमधल्याही त्यांच्या भूमिका गाजल्या. ज्योतिबाचा नवस, दे दणादण, लेक चालली सासरला, एकटा जीव सदाशिव हे त्यांचे गाजलेले सिनेमे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)