एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर कुणाचा फायदा?

  • दीपाली जगताप
  • बीबीसी मराठी
एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी अद्याप कसलीही चर्चा झालेली नाही. सध्या तरी माझा पक्षांतराचा विचार नाही," असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सप्टेंबर महिन्यात बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केले होते. पण तरीही काही राजकीय हालचालींमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. आता पुन्हा त्यांच्या 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'मध्ये जाण्याच्या बातम्या येत आहेत.

एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.

2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसेंनी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर सातत्याने नाराजी जाहीर केली आहे. तर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आजही आरोप-प्रत्यारोप सुरूअसतात.

दुसऱ्या बाजूला, एकनाथ खडसे पक्षात आले तर त्यांचे स्वागतच आहे अशा प्रतिक्रिया काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते देत असतात. म्हणूनच एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार आणि पक्षांतर करणार अशी चर्चा होताना दिसते.

एकनाथ खडसे जवळपास चार दशकांपासून भाजपमध्ये आहेत. पण 2014 पासून असे काय घडले की खडसे पक्षापासून दुरावले ? याला फडणवीस सरकार जबाबदार आहे की ते स्वत: जबाबदार आहेत?

भाजपमध्ये कोंडी होत असल्याचं मान्य करणारे खडसे पक्षाला राम राम करणार का? पक्षांतराचा विचार करत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील की इतर कुठल्या पक्षात? या सर्व बाबींचा वेध घेण्याचा प्रयत्न आपणया लेखात करणार आहोत.

एकनाथ खडसे आणि भाजपमध्ये नेमके काय आणि कसे बिनसले?

2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. खरं तर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यासाठी सत्ता येणं ही जमेची बाब. पण खडसेंच्या बाबतीत विपरीत घडले असे म्हणावे लागेल.

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला येण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज होते असे समजले जाते.

फोटो स्रोत, Getty Images

खडसेंनी शपथविधीला हजेरी लावावी यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. ते महसूल मंत्री झाल्यानंतर अगदी दोनच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर जाहीर टीका केली होती. ते म्हणाले, "आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे," असा प्रश्न खडसेंनी विचारला होता.

फोटो स्रोत, Getty Images

या टीकेला उत्तर देताना पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर प्रतिक्रिया दिली. "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही." असं ते म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना मार्गदर्शक भूमिकेत येण्याचाही सल्ला दिला होता. या वक्तव्यावरही खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती.

2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून द्यावा लागणारा राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारणे, विधान परिषदेसाठीही डावलणे, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव अशा सर्वच कारणांमुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर कुणाचा फायदा ?

एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत.

फोटो स्रोत, TWITTER

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

शिवाय, उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही खडसेंचे चांगले संबंध आहेत. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अनेक नेते खडसेंना भेटण्यासाठीआवर्जून गेले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. जळगावचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील हे बैठकीला उपस्थित होते असे समजते.

साधारण 2009 पर्यंत उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते पण कालांतराने ही संख्या घटत गेली आणि आता खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे.

उत्तर महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव, धुळे, नंदूरबार या तिन्ही जिल्ह्यांवर एकनाथ खडसेंची पकड असल्याने भाजपला एवढे वर्ष त्याचा फायदा झाला. खान्देशचे पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे असं सांगतात, " एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला तर भाजपला डॅमेज करण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते."

फोटो स्रोत, Getty Images

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचेही वृत्त आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला.

ही बैठक जलसिंचन प्रकल्पाविषयी होते असं जयंत पाटलांनी स्पष्ट केले. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही ऑफर दिली नसल्याची माहिती प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावही नाही."

उत्तर महाराष्ट्राचे सकाळचे संपादक राहुल रनाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "एकनाथ खडसेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी त्या पक्षाचा फायदाच होईल. याचे कारण त्यांची संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर चांगली पकड आहे. महत्त्वाचे म्हणजे जुने आणि नवीन कार्यकर्ते त्यांनी बांधलेले आहेत."

खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर राजकीय कायापालट होण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादीसाठीही हे सोपे नसेल.

फोटो स्रोत, Getty Images

याविषयी बोलताना विकास भदाणे सांगतात, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचा खडसेंना पक्षात घेण्यासाठी विरोध आहे. एकनाथ खडसे आले तर आपले महत्त्व कमी होईल अशी भीती या नेत्यांना आहे. त्यासाठीच शरद पवार यात दखल घेऊन स्थानीक नेत्यांचे विचार जाणून घेत आहेत."

आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत असली तरी भूतकाळातली काही उदाहरणं पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस उद्या भाजपसोबत जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

2019 विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राजभवनावर जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे असे पुन्हा घडले तर एकनाथ खडसेंची अडचण होऊ शकते.

शिवसेना आणि काँग्रेसचीही खडसेंना ऑफर?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य केले होते. तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही त्यांचे शिवसेनेत स्वागत असेल असे मत मांडले.

भाजप आणि शिवसेनेची 30 वर्षांपासून युती होती. शिवसेना हा भाजपप्रमाणेच हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंसाठी शिवसेना हा भाजपला पर्याय असू शकतो. पण याची शक्यता कमी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपची युती तुटली हे खडसेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावेळी दोन्ही पक्षातले काही नेते त्यांच्यावर नाराज होते.

तसेच उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्त्व आणि खडसे एकमेकांचे विरोधक आहेत. शिवसेनेचे जळगावचे आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.

दुसऱ्या बाजूला आधीच संभ्रमात आणि गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत खडसे कितपत विचार करतील असाही प्रश्न आहे. तसेच भाजपमधून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करून विचारधारेशी पूर्णपणे तडजोड केली असा संदेश जाईल.

भाजपवर सतत उघड टीका करूनही खडसे पक्षाला सोडचिठ्ठी का देत नाहीत?

एकनाथ खडसेंनी महसूलमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांनी आरोप केलेत.

पण तरीही खडसे पक्ष सोडण्याची भूमिका घेत नाहीत किंवा पक्षाकडून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाकडून पक्षाची शिस्तभंग केल्यावर कोणत्याही राजकीय नेत्यावर पक्षाकडून कारवाई केली जाते. पण एकनाथ खडसे भाजपवर सतत उघडपणे आरोप आणि टीका करूनही आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

खडसे हे भाजपतल्या जुन्या फळीतले एक ज्येष्ठ नेते आहेत. आजही दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत खडसेंचा उल्लेख भाजप नेत्यांकडून आदरानेच केला जातो.

"एकनाथ खडसे ज्येष्ठ नसल्याने आणि बहुजन चेहरा असल्याने ते आजही भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे आजही त्यांना आशा असावी," असं विकास भदाणे सांगतात.

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत. तसेच खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांना विधानसभेसाठी तिकिटही देण्यात आले होते पण त्यांचा पराभव झाला. त्या जळगाव जिल्हा बँकेच्या संस्थापक आहे. तर खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे दुधविकास संघाच्या अध्यक्ष आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)