राज ठाकरे डब्बेवाल्यांना म्हणतात 'सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या'

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईतल्या डबेवाल्यांनी आज (24 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि डबेवाल्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यासाठी सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली. यावर राज ठाकरे यांनी आपण सरकारशी चर्चा करून तुम्हाला कळवू असं आश्वासन दिलंय.

कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने मुंबईतल्या डबेवाल्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. सरकारने आर्थिक मदतीचं आश्वासन देऊनही ते अजून पूर्ण झालेलं नाही. याबाबतही राज ठाकरेंनी चर्चा करावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली.

"यावर सरकार त्यांच्या हातात द्या आणि प्रश्न माझ्याकडे घेऊन या," अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी त्यांना लगावली आहे.

दोनच दिवसांपूर्वी 21 सप्टेंबर रोजी मनसेने सामान्यांसाठी लोकल सुरू करा, ही मागणी करत सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं.

या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर इथल्या लोकल स्टेशनवरून लोकलने प्रवास केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

सध्या अनेक कार्यालयं आणि आस्थापनं सुरू झालेली आहेत. मात्र, सार्वजनिक प्रवासासाठीचा केवळ बस एवढाच मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे सामान्य चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. हे लक्षात घेता सामान्य माणसासाठी लोकल सुरू करा, अशी मागणी करत मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जवळपास 3 ते 4 महिने राज ठाकरेही स्वतः घराबाहेर पडले नव्हते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी कार्यकर्ते आणि इतरांच्याही गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

त्यानंतर तर अनेकजण त्यांच्याकडे मागण्यांची पत्रकं घेऊन आली आहेत. एकट्या सप्टेंबर महिन्यात बेस्ट कर्मचारी, डॉक्टर्स, रिक्षाचालक असे अनेक जण राज ठाकरेंना भेटले आहेत.

शिवाय, राज ठाकरेंनीही वीज बिल, जिम उघडण्याचा प्रश्न, मंदिरं खुली करण्याचा मुद्दा, अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनीही आपल्या विविध मागण्यांसाठी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली होती. सरकारने 6 महिन्यांपूर्वी कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं. सहा महिने उलटूनही या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही, असं म्हणत या कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंसमोर आपली तक्रार सादर केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

दरम्यान काही दिवस आधीच मुंबईतल्या डॉक्टरांच्याही एका शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेत सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. सहकारी डॉक्टरचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबाला विम्याचे पैसे द्यायला नकार दिला होता. यामुळे हे डॉक्टर नाराज होते.

इतकंच नाही तर अनलॉकमध्ये बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या असल्या तरी राज्यभरात जिम बंद आहे. त्यामुळे जिम चालकांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे जिम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यावेळी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिम सुरू करा, असं सांगत राज ठाकरेंनी थेट सरकारलाच आव्हान दिलं होतं.

वाढीव वीजबिलाविरोधातही मनसेने राज्यभर खळ्ळखट्याक आंदोलनही सुरू केलं होतं. त्यामुळे अदानी समुहाच्या सीईओंनी कृष्णकुंजवर जात राज ठाकरेंची भेटही घेतली होती.

मंदिरं खुली करण्याबाबतही राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला पत्र पाठवलं आहे. अनलॉकमध्ये मॉल उघडू शकता मग मंदिरं का नाही, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. मंदिरं सर्वात शेवटी उघडून उगाच पुरोगामी असल्याचा आव आणू नये, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)