IPL 2020: राहुलचा शतकी तडाखा बेंगळुरूला पडला भारी

राहुल, पंजाब

फोटो स्रोत, kxip

फोटो कॅप्शन,

लोकेश राहुल

कॅप्टन, कीपर आणि ओपनर अशी तिहेरी भूमिका सांभाळणाऱ्या राहुलने बेंगळुरूविरुद्ध शानदार शतकी खेळी साकारली. या तडाखेबंद खेळीच्या बळावर पंजाबने बेंगळुरूवर 97 रन्सनी दणदणीत विजय मिळवला.

पंजाबने 206 रन्स केल्या तर बेंगळुरूचा 17 ओव्हर्समध्ये 109 रन्समध्येच ऑलआऊट झाला.

डेल स्टेनच्या बॉलिंगवर सिक्स आणि फोर खेचत राहुलने आयपीएलमधलं दुसरं शतक साजरं केलं. राहुलने 69 बॉलमध्ये 132 रन्सची खेळी केली. यामध्ये 14 फोर आणि सिक्सचा समावेश होता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतलं हे पहिलंवहिलं शतक आहे.

आयपीएल स्पर्धेतली भारतीय बॅट्समनने केलेली ही सर्वाधिक रन्सची खेळी आहे. मुरली विजयने चेन्नईकडून खेळताना राजस्थानविरुद्ध 127 रन्सची खेळी 2010 मध्ये साकारली होती. मुरली विजयचा विक्रम राहुलने मोडला.

आयपीएल स्पर्धेत सगळ्यात कमी मॅचेसमध्ये 2000 रन्स करण्याचा विक्रमही राहुलने नावावर केला.

पंजाबने दिल्लीविरुद्धची सलामीची लढत सुपर ओव्हरमध्ये गमावली होती. दुसऱ्या लढतीत विजय मिळवण्यादृष्टीने राहुलने शतकी खेळी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचला.

गेल्या वर्षी राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शतकी खेळी केली होती. आयपीएलमधलं हे 64वं शतक आहे.

याआधी मनीष पांडे, युसुफ पठाण, मुरली विजय, पॉल वल्थाटी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, विराट कोहली, संजू सॅमसन, ऋषभ पंत, अंबाती रायुडू या भारतीय बॅट्समननी शतकं झळकावली आहेत.

राहुल-मयांक जोडीने 57 रन्सची सलामी दिली. मयांक 26 रन्स करून आऊट झाला. निकोल पूरनने राहुलला चांगली साथ दिली. त्याने 17 रन्स केल्या. धडाकेबाज बॅट्समन ग्लेन मॅक्सवेल 5 रन्स करून आऊट झाला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळुरूने सपशेल शरणागती स्वीकारली. फिल्डिंग करताना दोन कॅच सोडणाऱ्या कर्णधार कोहलीला केवळ एका रनचं योगदान देता आलं. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 30 रन्स केल्या. तीन ओव्हर्स शिल्लक राखून आणि 97 रन्सनी झालेला पराभव बेंगळुरूला प्लेऑफसाठीच्या शर्यतीवेळी महागात पडू शकतो.

राहुलला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)