हाथरसनंतर बलरामपूरमध्ये कथित सामूहिक बलात्कार, 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

प्रतिनिधिक छायाचित्र

हाथरसमधल्या बलात्काराने देशभर उफाळलेला संताप शांत होतो न होतो तोच उत्तर प्रदेशातल्याच बलरामपूरमध्ये एका दलित मुलीवरही कथित सामूहिक बलात्कार झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

बलरामपूर पोलिसांनी ट्वीटरवर एक व्हिडियो पोस्ट करत तरुणीच्या पालकांकडून तक्रार मिळाल्याची माहिती दिली आहे.

पोलिसांनी या व्हिडियोमध्ये म्हटलं आहे, "तक्रारीत 22 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे की ती एका खाजगी कंपनीत नोकरी करायची. मंगळवारी मुलगी कामावर गेली. पण संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. थोड्या वेळाने मुलगी रिक्षाने घरी आली तेव्हा तिच्या हाताला सलाईन लावलं होतं आणि तिची परिस्थिती खूप वाईट होती. कुटुंबीय तिला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेले. पण, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला."

पोलिसांनी सांगितलं, "तक्रारीत कुटुंबीयांनी दोन मुलांची नावं सांगितली आहेत. त्या मुलांनी कुठल्यातरी डॉक्टरकडे नेऊन आमच्या मुलीवर उपचार केले. तिच्यावर बलात्कार केला. प्रकृती ढासळल्यावर तिला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी घरी पाठवलं."

या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटकही केली आहे. पुढील चौकशी करून इतर आरोपींनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणातल्या आरोपींनी मुलीचे हात, पाय आणि कंबरही मोडल्याचं काही प्रसार माध्यमांनी सांगितलं होतं.

बलरामपूर पोलिसांनी मात्र याचं खंडन केलं आहे. ट्विटरवरच एका यूजरला उत्तर देताना पोलिसांनी म्हटलं आहे, "हात, पाय आणि कंबर मोडल्याची माहिती खोटी आहे."

यूजरने लिहिलं होतं, "हाथरसनंतर यूपीमध्ये आणखी एक गँगरेप आणि खून. हे त्यापेक्षाही भयंकर आहे. एका दलित मुलीवर गँगरेप आणि खून. यावेळी यूपीतल्या बलरामपूरमध्ये. बलात्कारानंतर तिचे पाय आणि कंबर तोडण्यात आले. इतकंच नाही तर तिला विषाचं इंजेक्शनही देण्यात आलं. दोघांना अटक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे."

यानंतर पोलिसांनी स्वतः एक व्हिडियो मेसेज तयार करून तो पोस्ट केला.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीटरवर लिहिलं, "भाजप सरकारने हाथरस प्रमाणे निष्काळजीपणा आणि सारवासारव करू नये आणि तात्काळ कारवाई करावी."

तर आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संजय सिंह आपल्या ट्विटमध्ये लिहितात, "बलरामपूरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना. एका दलिताची मुलगी नराधमांच्या वासनेला बळी पडली. योगी राजमध्ये मुलगी होणं अभिशाप बनलं आहे. मुलींचं रक्षण करू शकत नसाल तर खुर्ची सोडा योगीजी."

काँग्रेस खासदार पी. एल. पुनिया ट्विट करतात, "राज्यात हे काय घडतंय. सरकार अकर्मण्य बनलं आहे तर प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. "

काही दिवसांपूर्वीच म्हणजे 14 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातल्याच हाथरसमध्ये 20 वर्षांच्या मुलीवर कथित सामूहिक बलात्कार झाला होता. दिल्लीतल्या सफदरगंज हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)