डायनासोर काय खायचे? झारखंडमध्ये सापडले जीवाश्म

जीवाश्म

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील राजमहल डोंगररांगांवर कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्म (फॉसिल्स) आढळून आले आहेत.

हे जीवाश्म ज्युरासिक काळातील झाडांच्या पानांचे आहेत. हे सुमारे 150 ते 200 दशलक्ष म्हणजेच 15 ते 20 कोटी वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा केला जात आहे.

डायनासोर खात असलेल्या झाडांचे हे जीवाश्म असू शकतात, असं सांगितलं जात आहे.

आता या परिसरात ज्युरासिक काळातील जीवजंतूंचे जीवाश्म (अॅनिमल फॉसिल्स) मिळण्याची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे उत्खननक्षेत्रात याची उत्सुकता आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

साहिबगंज येथील पीजी कॉलेजमधील भूगर्भशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. रणजित प्रसाद सिंह यांनी बीबीसीला याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, "तालझारी परिसरात दूधकोल गावात हे जीवाश्म मिळाले आहेत. यांना संरक्षित करण्यासाठी आणि हा परिसर इको-सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्यात यावा, यासाठी मुख्य सचिव आणि काही इतर अधिकाऱ्यांना पत्र लिहित आहोत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर लखनौमधील बीरबल साहनी इन्स्टीट्यूट आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी इथं उत्खनन करून जीवाश्मांचा शोध घ्यावा.

दूधकोल गाव साहिबगंज जिल्ह्यात मंडरो येथे बनत असलेल्या फॉसिल्स पार्कपासून 45 किलोमीटर तर झारखंडची राजधानी रांचीपासून 425 किलोमीटर दूर आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

डॉ. रणजित कुमार सिंह गेल्या 12 वर्षांत राजमहलच्या डोंगरांमध्ये आढळून येणाऱ्या जीवाश्मांवर संशोधन करत आहेत. त्यांनी आतापर्यंत बीरबल साहनी इन्स्टिट्यूट, आयआयटी खरगपूर आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अनेक संशोधक पथकांमध्ये काम केलं आहे. या परिसरातील बहुतांश संशोधन कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. झारखंडमध्ये त्यांची ओळख जीवाश्म तज्ज्ञ म्हणूनच आहे.

राजमहलचे गूढ डोंगर

राजमहलच्या डोंगरांमध्ये पूर्वीसुद्धा अनेक जीवाश्म मिळाले आहेत. साहिबगंज व्यतिरिक्त पाकुड आणि जवळपासच्या इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे जीवाश्म आढळून येत असतात. या परिसरात यापूर्वी मिळालेल्या जीवाश्मांमध्येही असे पानाचे शिक्के आढळून आले आहेत.

पण, तज्ज्ञांनी जीवाश्म फोडताना आणि दोन दगडांच्या मधील भागात असे शिक्के पाहिले होते. पण पहिल्यांदाच जीवाश्मांच्या वरील भागात आणि मोठ्या संख्येने हे शिक्के सापडले. हे शिक्के सहजपणे पाहता येऊ शकतात.

डॉ. रणजित सिंह बीबीसीशी बोलताना म्हणाले, "दूधकोलमध्ये फॉसिल्सवर सापडलेले शिक्के टिलोफाईलम प्रजातींच्या झाडांचे आहेत. अशा वनस्पती ज्युरासिक काळात अस्तित्वात होत्या. पण ओळख न पटू शकलेलेही काही शिक्के आहेत. सध्यातरी ही झाडं प्रचंड मोठी होती. शाकाहारी डायनासोर या झाडांची पानं खात असतील, इतका अंदाज आपण लावू शकतो."

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

ते सांगतात, "ज्युरासिक काळातील वनस्पतींचे जीवाश्म याठिकाणी आधीपासून सापडत होते. त्यामुळे इथल्या जमिनीचं उत्खनन करून तिथं जंतूंचे जीवाश्म आहेत किंवा नाही, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा.

इथं डायनासोर काळातील झाडांची जीवाश्म आहेत, पण डायनासोरचे जीवाश्म नाहीत, असं कसं होऊ शकतं? आपण योग्य पद्धतीने शोध घेतल्यास राजमहल डोंगरांवर या काळातील जीवजंतूंच्या जीवाश्मांचा शोध किंवा इतर गोष्टी आढळून येऊ शकतील."

जीवाश्म कसे सापडले?

दूधकोल गावातील एक मुलगी आपल्या जनावरांना चरण्यासाठी डोंगरांवर घेऊन गेली होती. तिथं महुआच्या झाडाखाली तिला एक चमकणारा दगड मिळाला. ती हा दगड घेऊन घरी गेली. कुटुंबीयांना वाटलं की या दगडावर शंकर आणि पार्वतीची चित्रं काढण्यात आली आहेत. त्यामुळे घाबरून त्यांनी पुन्हा तो दगड होता त्याठिकाणी नेऊन ठेवला. ही बातमी गावभर पसरली.

गावातील लखन पंडित सांगतात, "गावकऱ्यांनी तोच दगड देव मानत पूजा-अर्चना सुरू केली. आता त्याठिकाणी मंदिर बनवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे. इतर गावातील लोकही दर्शनासाठी येऊ लागले आहेत. सध्या तिथं जत्रेचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी त्या बांबूच्या झाडांचं छप्पर घातलं आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

लखन पंडित पुढे सांगतात, "यादरम्यान, मी याची माहिती भू-शास्त्रज्ञ डॉ. रणजित सिंह यांना दिली. ते आमच्या गावात आले आणि हा दगड म्हणजे क्वार्ट्झ खनिज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते इतर गावकऱ्यांना घेऊन दूधकोल डोंगरांवर इतर भागात गेले. तेव्हा त्यांना पानाच्या शिक्क्यांचे जीवाश्म मिळाले.

आम्ही सर्वांनी त्यांची मदत करण्यासाठी परिसरात खोदकाम केलं. तेव्हा तशा प्रकारचे अनेक जीवाश्म सापडले. त्यांच्यावर सुंदर पानांचे शिक्के आहेत. आता गावातील लोक त्याचं संरक्षण करत आहेत."

आदिवासींचं गाव - दूधकोल

दूधकोल गावात सुमारे 60 घरं आहेत. इथले बहुतांश रहिवासी पहाडी आदिवासी आहेत. काही घरं संथाल आणि बिगर-आदिवासींचीसुद्धा आहेत. गावातील लोकाचं डोंगरांवर येणं-जाणं अत्यंत कमी आहे.

डोंगरांवर जाणारा रस्ता खूपच अरूंद आणि घनदाड झाडाझुडपांमधून जातो. यामुळे आतापर्यंत कुणाचीही नजर या जीवाश्मांवर पडलेली नव्हती.

बीरबल साहनी यांनीही केलं संशोधन

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) शी संबंधित शास्त्रज्ञ राजमहल डोंगरांमध्ये आधीपासून उत्खनन करत असतात. याच परिसरात कटघर गावात रेप्टाईल्ससारख्या प्रजातींच्या अंड्यांचे जीवाश्म मिळाले होते.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बीरबल साहनी यांनीसुद्धा या डोंगरांवर बराच काळ घालवला होता. 1940 च्या दशकात त्यांनी इथं पेंटोजायली प्रजातींच्या झाडांच्या जीवाश्मांचा शोध घेतला होता. त्यानंतर जगभरातील अनेक शास्त्रज्ञ याठिकाणी आले. तेव्हापासून अनेक जीवाश्मांचा शोध याठिकाणी लागला आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

भू-शास्त्रज्ञ डॉ. रणजित सांगतात, "राजमहलच्या डोंगरांवर जीवाश्म सापडण्याचं प्रमुख कारण म्हणजे इथं पूर्वी झालेले ज्वालामुखी विस्फोट आहेत. या स्फोटांनंतरच इथली भौगोलिक रचना बदलली. तेव्हाची झाडं आणि जीव-जंतू दगडांमध्ये अडकून राहिले. आता आपल्याला तेच जीवाश्म सापडतात. पण इथं आतापर्यंत अॅनिमल फॉसिल्स सापडलेले नाहीत. त्यांचासुद्धा शोध घेतला पाहिजे.

तालाझारीचे गटविकास अधिकारी सायमन मरांडी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "दूधकोल गावातील जीवाश्म मिळण्याच्या घटनेबाबत मला माहिती आहे. याची अधिक सविस्तर माहिती गोळा करण्यात येत आहे. यानंतर वरीष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल पाठवणार आहोत."

वनस्पती जीवाश्म तीन प्रकारचे असतात. शास्त्रज्ञांनी त्यांची कंप्रेशन, इंप्रेशन आणि टेट्रीफाईड अशी विभागणी केलेली आहे.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH

कंप्रेशन फॉसिल्स म्हणजे दोन दगडांमध्ये दबून बनलेले जीवाश्म. या प्रक्रियेत झाडांचे सॉफ्ट टिश्यू नष्ट झाल्या मात्र हार्ड टिश्यू कायम राहिल्या.

इंप्रेशन फॉसिल्स म्हणजे त्यांच्यावर जशीच्या तशी छाप पडलेले जीवाश्म. यांच्यावर झाडांची खोडं, पानं किंवा फांद्यांचे शिक्के आढळून येतात. दूधकोलमध्ये इंप्रेशन फॉसिल्सच आढळून आले आहेत. त्यांच्यावर पानांचे शिक्के आहेत.

टेट्रिफाईड फॉसिल्स म्हणजे थोडा वेगळा प्रकार आहे. यामध्ये झाडांमध्ये छिद्र असल्याने त्यांच्यात सिलिका गेला. आणि त्यानंतर अनेक वर्षांनंतर पूर्ण झाड दगडाप्रमाणे बनलं. राजमहल डोंगरांवर अशा प्रकारचे जीवाश्मसुद्धा आढळून येतात.

देशातील एकमेव फॉसिल्स पार्क

याच कारणामुळे साहिबगंज जिल्ह्यातील मंडरोमध्ये भारतातील पहिलं आणि एकमेव फॉसिल्स पार्क बनवलं जात आहे.

हे पार्क बनल्यानंतर याठिकाणी विविध प्रकारचे जीवाश्म ठेवण्यात येतील. त्यांची सविस्तर माहिती सोबत दिलेली असेल. संशोधकांना त्यांची मदत होईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)