मराठा आरक्षण: विवेक रहाडे या तरुणाने केली आत्महत्या

विवेक रहाडे

फोटो स्रोत, @dhananjay_munde

फोटो कॅप्शन,

विवेक रहाडे

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यावर मराठा आरक्षणाचं काय होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच या प्रश्नावर बीडमध्ये विवेक रहाडे नावाच्या एका तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी विवेकने एक चिठ्ठी लिहिली होती.

त्यात त्यानं लिहिलंय, "मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे. मी नीटची परीक्षा दिली. मात्र मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नंबर कुठेही लागणार नाही. प्रायव्हेट शिक्षण संस्थेत शिकवण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे."

या घटनेनंतर मराठा आरक्षणासाठी किती जणांना जीव गमवावा लागेल, असा सवाल विवेकच्या आईनं केला आहे.

त्यांनी म्हटलं, "मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे माझ्या पोटच्या गोळ्याने मरण पत्करलं. अशा अजून किती पोटच्या गोळ्याना जीव द्यावा लागेल?"

प्रकरणाची चौकशी सुरू

या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक राज रामस्वामी यांनी बीबीसीला सांगितलं.

ते म्हणाले, "ही घटना काल (30 सप्टेंबर) घडली आहे आणि याप्रकरणाचा तपास सुरू आहे. यासंबंधी चिठ्ठी मिळालेली आहे आणि त्याअनुषंगानं तपास चालू आहे. अद्याप पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येणं बाकी आहे. पुढील तपास सुरू असल्यानं सध्या तरी फार काही सांगता येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images

राजकीय प्रतिक्रिया

या घटनेनंतर राजकारण्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "बीडमधील विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहिल. मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरु असताना युवकांनी आत्महत्या करु नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही."

ते पुढे म्हणाले, "एक लक्षात ठेवा हा समाज, लढून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!"

बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं, "केतुरा जि. बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी संयमाने विचार करायला हवा. कोणत्याही प्रसंगाला संयमाने सामोरे जाऊन मार्ग नक्कीच निघतो. मी रहाडे परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!"

भाजप नेते निलेश राणे यांनीदेखील विवेक राहाडे आत्महत्येवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी आणखी एक तरुण भावाचे आत्मबलिदान. बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या आपल्या तरुण बांधवाने आरक्षण न मिळाल्यामुळे आत्महत्या केली."

यापूर्वी काकासाहेब शिंदेंनी केली आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुलै 2018मध्ये औरंगाबादमध्ये काकासाहेब दत्तात्रय शिंदे या 28 वर्षांच्या आंदोलकानं गोदावरीत उडी मारून जीव दिला होता.

28 वर्षांचे काकासाहेब शिंदे पेशाने ड्रायव्हर होते. त्यांच्या घरात आई, वडील आणि भाऊ असे चौघेच जण. गंगापूर तालुक्यातील आगर कानडगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथे घरी दोन एकर शेती. शेतीवर उपजीविका चालत नाही म्हणून काकासाहेब यांनी ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. त्यांच्यावर घर अवलंबून होतं.

गंगापूरमधून शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने यांच्या गाडीचे काकासाहेब शिंदे ड्रायव्हर होते. त्यामुळे काकासाहेब शिवसेनेच्या संपर्कात आले होते.

काकासाहेब यांचे लहान भाऊ अविनाश शिंदे हे 23 वर्षांचे असून गंगापूर तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आहेत.

अविनाश शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं की, "काकासाहेब यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये पगारातच त्यांचं घर चालायचं. आमच्याकडे दोन एकर जमीनीत काय उगवणार?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)