मुंबई पालिकेत शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी भाजप काँग्रेस एकत्र येणार?

मुंबई महापालिका

फोटो स्रोत, Bmc

मुंबई महानगरपालिकेत स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी 5 ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे यशवंत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेकडून तिसर्‍यांदा यशवंत जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी संध्या जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर या निवडणुकीत भाजपबरोबर कॉंग्रेसनेही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सामील असणारी कॉंग्रेस मुंबई महापालिकेत शिवसेनेविरुद्ध का निवडणूक लढवत आहे? कॉंग्रेस शिवसेना खरंच संघर्ष आहे का? यामागे काय राजकारण आहे? याबाबतचा हा रिपोर्ट

संख्याबळाचं गणित काय?

गेली अनेक वर्षे स्थायी समितीचं अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. भाजप पहिल्यांदाच ही निवडणूक लढवत आहे. भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मुंबई महापालिकेत कॉंग्रेस हे विरोधी पक्षात आहे. त्यामुळे कॉंग्रेसनेही स्थायी समिती अध्यक्षपदासाठी असिफ झकेरिया आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी संगीता हांडोरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीनही पक्षांकडून अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेकडे संख्याबळ अधिक आहे.

स्थायी समिती सदस्य

शिवसेना - 11

भाजप - 10 ( स्वीकृत नगरसेवक सदस्य असल्याने 1 मत कमी)

काँग्रेस - 3

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

समाजवादी काँग्रेस पक्ष - 1

शिक्षण समिती सदस्य

शिवसेना - 13

भाजप - 10 ( स्वीकृत नगरसेवक सदस्य असल्याने 1 मत कमी)

काँग्रेस - 4

राष्ट्रवादी काँग्रेस - 1

समाजवादी काँग्रेस पक्ष - 1

फोटो स्रोत, Getty Images

भाजपचा कॉंग्रेसला पाठिंबा?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

या संख्याबळानुसार जर ही निवडणूक तिरंगी झाली तरीही शिवसेनेचा विजय निश्चित आहे. पण जर भाजपने कॉंग्रेसला पाठिंबा दिला तर शिवसेनेला धोका निर्माण होऊ शकतो. जर कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर भाजप कॉंग्रेसला पाठिंबा देऊन शिवसेनेला अडचणीत आणणार अशी चर्चा आहे.

भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले "मुंबई महापालिकेत आम्ही दुसरा मोठा पक्ष आहोत. यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही कोणाचा पाठिंबा घेणार किंवा देणार हे 5 ऑक्टोबरला निवडणुकीदिवशी कळेल". पण शिंदे यांनी पाठिंबा देणार की नाही हे स्पष्ट केलं नाही.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांना भाजपचा पाठिंबा घेणार का हे विचारलं असता ते म्हणाले,"आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतोय. उरला प्रश्न भाजपच्या पाठिंब्याचा... तर आम्ही कोणाचाही पाठिंबा मागितला नाही आणि आम्हाला त्याची गरज नाही.

आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार की निवडणूक लढविणार याचा निर्णय अजून झाला नाही. आमच्या पक्षातले वरिष्ठ हा निर्णय घेतील तेव्हा आम्ही काय करणार ते स्पष्ट करू".

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन,

किशोरी पेडणेकर

'शिवसेना निवडणून येणारच'

कॉंग्रेसला भाजप पाठिंबा देणार याची कितीही चर्चा असली तरी राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेत सामील असणार्‍या कॉंग्रेसला भाजप खरंच पाठिंबा देऊ शकतं का? हा प्रश्न उपस्थित होतो. कॉंग्रेसही स्थायी समितीअध्यक्षपदासाठी भाजपची मदत घेऊन राज्याच्या सत्तेत बिघाडी करणार नाहीत असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

शिवसेनेचे उमेदवार यशवंत जाधव म्हणतात, "कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यांची भूमिका ते निभावत आहेत. राज्याच्या सत्तेत एकत्र असताना ते महापालिकेत भाजपचा पाठिंबा घेतील आणि भाजप पाठिंबा देईल असं कुठेही वाटत नाही. त्यामुळे पडद्यामागे काहीही चर्चा सुरू असली तरी शिवसेना निवडणून येणार याची खात्री आम्हाला आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)