मराठा आरक्षण : पार्थ पवार यांच्या मनात काय चाललंय?

पार्थ पवार

फोटो स्रोत, Twitter

बीडमध्ये मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे विवेक रहाडे या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे राज्यात खळबळ माजली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आक्रमक झाले आहेत.

मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचं पार्थ यांनी म्हटलं. मराठा आरक्षणप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

पण या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पार्थ पवारांनी या मुद्द्यावरून पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. तसंच त्यांच्या ट्वीटमध्ये विद्यमान राज्य सरकारबद्दल नाराजीचाही सूर आहे.

ते म्हणतात, "विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेकसारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो."

पुढच्या ट्विटमध्ये लगेचच पार्थ असं म्हणतात, "विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही."

सध्या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी अनेकवेळा सरकार किंवा पक्षाशी विसंगत भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

राम मंदिर भूमिपूजनाला शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणारं पत्र लिहून 'जय श्रीराम'चा जयघोष करणारं ट्वीट केलं.

तत्पूर्वी, राम मंदिर भूमिपूजनाची घोषणा झाल्यानंतर शरद पवारांच्या एका वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली होती. 19 जुलै रोजी एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य करत केंद्र सरकारवर टीका केली होती.

"कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे," असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

पण त्याच्या पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष कार्यक्रम पार पडल्यानंतर पार्थ पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाबाबत शुभेच्छा देऊन आजोबांच्या भूमिकेपेक्षा उलट भूमिका घेतली.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी

राम मंदिराच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा थांबते न थांबते, तोच पार्थ पवार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयात हजर झाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी अनिल देशमुखांकडे केली. सदर आशयाचं पत्रही पार्थ यांनी गृहमंत्र्यांना दिलं.

त्यावेळी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून प्रचंड गोंधळ सुरू होता. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस सुशांत प्रकरणामुळे आमनेसामने आले होते. अशातच पार्थ पवार यांनीही या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे वादात आणखीनच भर पडली.

फोटो स्रोत, facebook

शरद पवार यांनी याविषयी बुधवारी(12 ऑगस्ट) प्रतिक्रिया दिली. "पार्थ अपरिपक्व आहेत आणि मी त्यांना कवडीचीही किंमत देत नाही, माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे," असं शरद पवार म्हणाले होते. या वक्तव्यानंतर राज्यात एकच राजकीय खळबळ उडाली. पवार यांनी इतकं कठोर वक्तव्य करण्यामागे काय कारण आहे, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली.

त्याच दिवशी संध्याकाळी स्वतः अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले. हा वाद मिटवण्यासाठी पवार कुटुंबीयांनी एक बैठक आयोजित केली होती आणि हा वाद मागे पडला. पण त्या बैठकीत काय चर्चा झाली, ते स्पष्टपणे बाहेर येऊ शकलं नव्हतं.

दरम्यान, 19 ऑगस्ट रोजी सुशांत प्रकरण सीबीआयकडे देण्यात आलं. त्यावेळी पार्थ यांचं ट्वीट होतं, 'सत्यमेव जयते.'

लोकप्रिय राजकीय मुद्द्यांच्या शोधात

पार्थ पवार यांची आतापर्यंतची मुद्द्यांची निवड पाहिल्यास लोकप्रिय आणि चर्चेतल्या विषयांवर ते प्रतिक्रिया देतात.

आधी राम मंदिर, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, सीबीआय चौकशी आणि आता मराठा आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी ट्वीट केले आहेत.

फोटो स्रोत, Twitter

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात, "पार्थ पवार आपणही राजकारणात सक्रिय आहोत, असं दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी ज्वलंत प्रश्न किंवा लोकप्रिय मुद्द्यांचा वापर करण्याचं ठरवल्याचं दिसून येतं. तरूणांना आकर्षित करून घेण्यासाठी हे मुद्दे उपयोगी ठरतात. पॉप्युलिस्ट राजकारणाचा हा एक प्रकार आहे."

राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न

पार्थ पवार यांच्या रुपानं पवार घराण्यातली तिसरी पीढी राजकारणात आली आहे.

वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमधून बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी दीड वर्षांपासून ते अजित पवार यांच्या सोशल मीडियाचं काम पाहत होते. पुढे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उभे राहिले, पण त्यांचा पराभव झाला.

रोहित हे पवारांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आहे. त्यामुळे राजकारणात रोहित पवार यांच्याबरोबरीनं आपलंही स्थान निर्माण करण्यासाठी आता पार्थ यांची धडपड सुरू आहे का?

फोटो स्रोत, facebook

राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, "पार्थ पवार लोकसभा निवडणुकीपासून साईडलाईन झाले होते. त्यामुळे ते सक्रीय होण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसऱ्या बाजूला, रोहित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीने जोर धरला आहे. त्यामुळे आपण बाजूला पडलो, असं पार्थ यांना वाटू शकतं. अशा स्थितीत ते प्रकाशझोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच झालेल्या वादानंतर पार्थ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षासुद्धा समोर आल्या आहेत.

अद्यैत मेहता सांगतात, "पार्थ पवार यांच्या मनात लोकसभेच्या पराभवाची सल अजूनही आहे. दुसरीकडे, रोहित पवार विधानसभेत गेले. त्यामुळे त्यांच्यावर फोकस असणं स्वाभाविक आहे. अशा स्थितीत पार्थ यांनाही राजकीय कारकिर्दीला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतं. कोणत्याही स्थितीत आपण मागे पडलो, असं त्यांना होऊ द्यायचं नाही."

पार्थ यांना अजित पवारांचा पाठिंबा?

पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपण समजून घेतलं. पण त्यासाठी त्यांनी अनेकवेळा पक्षविरोधी भूमिका घेतली, हे वास्तव आहे.

त्यांची भूमिका पक्षविरोधी असूनसुद्धा वडील अजित पवार यांनी त्यांना समजावून सांगितलं नसेल का? उपमुख्यमंत्री असल्यामुळे जी भूमिका, जी नाराजी अजित पवारांना व्यक्त करता येत नाहीये, ती पार्थ पवारांच्या निमित्ताने व्यक्त होत आहे का?

पार्थ यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल 'सत्यमेव जयते'च्या दिशेने सुरू आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

या सगळ्याचा अर्थ काय असू शकतो?

"भाजप फक्त या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहे. पवार कुटुंबीयातील वाद चव्हाट्यावर आला, तर भाजपसाठी ते चांगलंच आहे. पण अजित पवारसुद्धा पार्थच्या भूमिकेविषयी मौन बाळगून असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं," असं मेहता यांना वाटतं.

फोटो स्रोत, Twitter

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पार्थ यांच्या भूमिकेवरून अशी परिस्थिती आधीही निर्माण झाली होती.

"पार्थच्या निमित्ताने अजित पवार हे भाजपला समांतर भूमिका घेऊन काय प्रतिक्रिया येऊ शकतात हे निश्चितच जोखून पाहू शकतात," असं मत 'चेकमेट' या पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.

सूर्यवंशी सांगतात, "अजित पवार हे आपल्या मुलाचं राजकीय करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत पार्थ यांच्या पराभवानंतर आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. 'पार्थ यांचे ट्वीट ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, त्यांना पक्षासोबत घेऊन जायचं असेल तर त्यांना काहीतरी जबाबदारी द्यायला हवी, विधान परिषदेची उमेदवारी द्यायला हवी, अशी भूमिका अजित पवार पक्ष आणि शरद पवार यांच्यासमोर मांडू शकतात."

पार्थ यांच्या भूमिकेचा थेट संबंध अजित पवार यांच्या नाराजीशी असल्याचं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांना वाटतं.

बीबीसी मराठीशी बोलताना प्रधान म्हणाले होते, "पार्थ पवार यांनी राम मंदिर सारख्या राष्ट्रीय विषयावरही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. आताही सुशांत सिंहच्या प्रकरणातही ते महाविकासआघाडीच्या विपरित मागणी करत आहेत. पक्षातल्या इतर कुणी कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने अशी भूमिका घेतली असती तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली असती. पण पार्थवर अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. त्याचं काय कारण आहे?"

अजित पवार यांनी हात झटकले

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांना पार्थ पवार यांच्या ट्वीटबाबत प्रतिक्रिया विचारली.

पार्थ पवार यांनी सरकारविरोधी भूमिका घेतलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं होतं. तीच आपली भूमिका असल्याचं अजित पवार म्हणाले.

"मुलाच्या ट्वीटबद्दल उत्तर देणं, एवढेच मला उद्योग नाहीत. मला राज्यात इतर अनेक जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकाला त्यांचे स्वतंत्र विचार असतात. काय ट्वीट करावं, याचे अधिकार प्रत्येकाला आहेत. आपल्या हक्काचं आरक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे," असंही पवार पुढे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)