राजेश टोपे: मुंबई लोकल ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होऊ शकते

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी प्रतिनिधी
ट्रेन

फोटो स्रोत, PAL PILLAI/Getty images

मुंबईतल्या लोकल ट्रेन्स या महिनाअखेर सर्वांसाठी सुरू होऊ शकतील, असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी अंतिम निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांना दिलेल्या मुलाखतीत राजेश टोपे म्हणाले की, "मला अंदाज वाटतो की ऑक्टोबर संपेपर्यंत ट्रेन सुरू करण्यास काही हरकत नसावी. हा तसा केंद्राचा विषय आहे, पण राज्याचाही आहे आणि दोन्ही सरकारांनी मिळून ठरवायचं आहे."

पण लोकल सुरू झाल्या तरी, गर्दीवर कसं नियंत्रण ठेवणार? फिजिकल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळणार? हे प्रश्न कायम आहेत. तसंच लोकल ट्रेन सुरू झाल्यावर कोरोना विषाणूचा प्रसार वाढेल अशी चिंताही तज्ज्ञांना वाटतेय.

लॉकडाऊन सुरू झाल्यावर 23 मार्चपासून मुंबईतली लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. जूनमध्ये काही प्रमाणात ट्रेन्स सुरू झाल्या, मात्र त्यातून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवास करता येतो आहे.

पण सर्वसामान्यांनाही लोकलनं प्रवास करू द्यावा अशी मागणी जोर धरतेय. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानेही सरकारने तशी परवानगी द्यावी अशी सूचना केली होती. तसंच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सरकार या महिन्यात लोकल सुरू करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं.

लोकलच्या ज्यादा सेवा, डबेवाल्यांना परवानगी

अनलॉक-5 ची घोषणा झाल्यावर राज्यांतर्गत प्रवासासाठी ट्रेन सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वेने एक ऑक्टोबरपासून लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. तसंच आता डबेवाल्यांनाही ट्रेन प्रवासाची परवानगी मिळाली आहे.

लोकलअभावी सर्वसामान्यांना प्रवास करणं कठीण बनलं असल्याची जाणीव सरकारलाही असल्याचं टोपे मान्य करतात.

"लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन आहे. जोपर्यंत लोकल ट्रेन पूर्णपणे सुरू होत नाही, तोवर मुंबई सुरू झाली असं खऱ्या अर्थानं म्हणता येणार नाही. आम्हीही मंत्रालयात शंभर टक्के कर्मचारी बोलवू शकत नाही, कारण तेवढ्या ट्रेन्स सुरू नाहीत."

पण जेवढ्या ट्रेन्स सुरू आहेत, त्यातही प्रवास करणं कठीण झालंय.

फोटो स्रोत, Getty Images

लोकलमधल्या गर्दीचं काय?

तृषा सावंत रोज मुलुंडहून मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करतात. स्टेशनवर गर्दीत अंतर राखणं कठीण असल्याचं त्या सांगतात.

"अगदी सकाळची वेळ असल्याने ट्रेनमध्ये चढायला गर्दी नसते आणि उतरताना सीएसटीला रांगेनं बाहेर पडतात. पण बाहेर पडताना जिन्यात सगळी गर्दी एकच होते आणि एकमेकांचे धक्के एकमेकांना लागतातच."

एका सीटवर एकानेच बसलं पाहिजे असं नियमावली सांगते, पण चौथी सीटही रिकामी नसल्याचं प्रवासी सांगतात. गर्दी असली तरी अनेकांना ट्रेनचा प्रवासच सोयीचा वाटतो.

कल्याणहून ठाण्याला प्रवास करणारे स्वप्निल प्रभाकर अत्यावश्यक सेवेत आहेत. ते सांगतात, "आधी बसने जायचो जेव्हा ट्रेन सुरू नव्हत्या. पण कल्याण ते ठाणे प्रवासाला बसने तीन ते चार तास लागायचे. आता कोरोनाची जास्त भीती वाटते, कारण लोक आधीसारखीच गर्दी करतायत. गोल वगैरे आखले आहेत पण तिथे कोणी उभं राहात नाही."

ट्रेनमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती

लोकल ट्रेनवर फक्त मुंबई आणि उपनगरातील लोकच अवलंबून नाहीत, तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हायात राहणारे अनेकजण रोज कामासाठी लोकलनेच प्रवास करतात.

कोव्हिडची साथ येण्याआधी मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून जवळपास 78 लाख लोक दिवसाला प्रवास करत असत. अनेकदा सतराशे ते अठराशे प्रवासी क्षमता असलेल्या ट्रेनमध्ये चार हजारांहून अधिक प्रवासी असतात.

त्यामुळे पूर्ण क्षमतेने लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्या, तर तिथे कोव्हिडचा प्रसारही वेगाने होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राजेश टोपे सांगतात, "बेपर्वाईने लोकल सुरु करणं योग्य ठरणार नाही, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि आपल्याकडे तेवढ्यांची व्यवस्था करणं शक्य नाही."

फिजिकल डिस्टंसिंगचे नियम कसे पाळणार?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

फिजिकल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे, पण आपल्याकडची लोकसंख्या पाहता अनेक गोष्टी शक्य नाहीत असं राजेश टोपे मान्य करतात. लोकल ट्रेनमधला प्रवास कसा असेल याविषयी काही नियम ठरवावे लागतील असं ते सांगतात.

"अनेक गोष्टी शक्य नव्हत्या, पण त्या परिस्थितीनं शक्य झाल्या. साथीच्या आधीच्या अनेक गोष्टी टाळाव्या लागतील. गर्दी कमी करावीच लागेल, अनावश्यक प्रवास टाळावा लागेल, प्रत्येकाला स्क्रीन करावंच लागेल. मास स्क्रिनिंगसाठी काही तंत्रज्ञान वापरावंच लागेल."

ट्रेनच्या फेऱ्या वाढवता येतील का, फिजिकल डिस्टंसिंगसाठी काही नियम करता येतील का यावर सरकार विचार करत आहे.

त्यानुसार प्रवासात मास्क घालणं, आजारी व्यक्तींनी प्रवास टाळणं, तपासणी करूनच प्रवाशांना स्टेशनात प्रवेश देणं, गर्दी टाळण्यासाठी ऑफिसच्या वेळा बदलणं अशी पावलं उचलली जाऊ शकतात. अधिकाधिक लोकांची तपासणी लवकर व्हावी यासाठी मास स्कॅनरसारख्या तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा सरकारचा विचार आहे.

राजेश टोपे सांगतात "युरोपात सगळं सुरू झालं आहे, पण तिथे प्रत्येक व्यक्ती प्रशिक्षित आहे आणि स्वयंशिक्षितही आहे. लोकांनी अधिक जबाबदारीनं वागायला हवं असं मला वाटतं. मास्क, फिजिकल डिस्टंसिंग, हँडसॅनिटायझर अशी शिस्त काटेकोरपणे पाळली पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)