राज ठाकरे : हाथरसच्या निमित्ताने मनसेचं इंजिन पुन्हा काँग्रेसच्या मागे?

राज ठाकरे

फोटो स्रोत, facebook

"हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस काय लपवण्याचा प्रयत्न करत आहेत? सर्व माध्यमं सरकारवर का तुटून पडत नाहीत, त्यांना का जाब विचारला जात नाही," असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून प्रशासनाला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनीही या प्रकरणावरून केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट करून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

"उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचारादरम्यान झालेला मुलीचा मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना अडवण्यात आलं. तसंच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून ताब्यात घेतलं. याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात केला.

"पीडित मुलीच्या घरच्यांना कुणी भेटायला जात असेल, तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जात आहे, उत्तर प्रदेश सरकारला नक्की कशाची भीती आहे," असा सवाल ठाकरे यांनी केला.

"हाथरसमधील घटना पाशवी आहे. पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं, हे होऊन चालणार नाही. यावेळी अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलंच पाहिजे," असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाजपवरील टीकेचा अर्थ काय?

राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या जवळ जात असल्याचं सांगितलं जात होतं. झेंडा बदलण्यापासून इतर काही मुद्द्यांवर त्यांची भूमिका भाजपला पूरक होती. पण हाथरस प्रकरणावरून आता त्यांनी भाजपवरच जोरदार टीका केली आहे. याचा नेमका अर्थ काय असू शकतो?

लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांच्या मते, "राज ठाकरेंना महाराष्ट्रात स्वतःचं स्थान निर्माण करायचंय त्यामुळे ते कुठल्याही विचारधारेच्या बाजूने जाणार नाहीत. त्यांना ते सोयीस्कर नाही. स्वतःचं राजकारण आणि पक्ष वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. ज्या पद्धतीने राजकीय फायदा मिळेल तसं ते करतील.

"हे प्रकरण संवेदनशील आहे. उत्तर प्रदेश सरकारने ज्याप्रकारे प्रकरण हाताळलंय त्यावरून लोकांमध्ये चीड आहे, अशावेळी त्यांनी जर भाजपची बाजू घेतली असती तर त्यांच्यावरच टीका झाली असती. त्यांनी हे दाखवून दिलं की मी भाजपच्याही बाजूने नाही आणि काँग्रेसच्याही बाजूने नाही. माझी दिशा वेगळी आहे असा एक सूचक संदेश त्यांनी दिलाय."

मनसेचं इंजिन पुन्हा काँग्रेस मागे?

भाजपवर टीका, राहुल गांधींचं समर्थन, धक्काबुक्कीचा निषेध म्हणजेच भाजपच्या जवळ जाण्याच्या मार्गावर असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या इंजिनाला फक्त ब्रेकच मारला नाही, तर त्यांनी भाजपच्या दिशेने मोठा भोंगाही वाजवल्याचं पत्रकावरून दिसून आलंय.

यामुळे मनसेच्या इंजिनाची दिशा बदलून पुन्हा ते काँग्रेसच्या दिशेने धावू लागलं आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला.

फोटो स्रोत, HANDOUT

हाथरस प्रकरणी पक्षाची भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडल्याचं देशपांडे यांनी सांगितलं.

"जे चुकीचं आहे, ते चुकीचंच, अशी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका असते. तसंच ही घटना चुकीची आणि दुर्दैवी होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी याबाबत सडेतोड भूमिका मांडली. यामध्ये कुणाच्या जवळ किंवा दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असं संदीप देशपांडे सांगतात.

देशपांडे यांच्या मते, "राज ठाकरे यांच्या भूमिकेमागे कोणतंही राजकारण नव्हतं. त्यांनी त्यांचं मत स्पष्टपणे व्यक्त केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. एखादी घटना चुकीची असल्यास त्याबाबत मत मांडताना एखादा पक्ष दुखावेल किंवा नाही, याचा विचार आम्ही करत नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टींचं समर्थन कधीच केलं जाणार नाही."

चुकीच्या गोष्टींना चुकीचंच संबोधून त्याच्या विरोधात उभे ठाकण्याची धमक राज ठाकरे यांच्यामध्येच आहे. हाथरस प्रकरणी राज ठाकरे यांच्या भूमिकेमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, हे आपण लक्षात घ्यावं, असंही देशपांडे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)