बेळगाव : मराठी झेंड्यासाठी 7 वर्षं न्यायालयात लढा आणि निर्दोष मुक्तता

  • स्वाती पाटील
  • बीबीसी मराठीसाठी
सरिता पाटील

फोटो स्रोत, Swati Patil

"मी आयुष्यात कधीही कोर्ट पाहिलं नव्हतं. पण या खटल्याच्या निमित्ताने मला तब्बल सात वर्षं झगडावं लागलं. न्यायालयात कटघऱ्यात उभं राहून प्रश्नोत्तरांना सामोरं जावं लागलं."

"यामागे घरावर मराठी झेंडा लावला इतकंच कारण होतं. या खटल्यातून आज माझी निर्दोष मुक्तता झाली. पण बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून प्रत्येक वेळी मराठी नगरसेवकांना अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न सुरू असतो."

बेळगावच्या माजी महापौर आणि नगरसेविका सरिता पाटील यांनी आपला अनुभव सांगितला.

सरिता पाटील या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या आहेत. घरावर गुढीसोबत 'मी मराठी' अशी अक्षरं असलेला भगवा झेंडा लावल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

7 वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय घडलं होतं?

बेळगाव मध्ये 2013 साली गुढीपाढव्याच्या निमित्ताने मराठी नागरिकांनी आपल्या घरावर गुढीसोबत भगवे झेंडे लावले होते. विधानसभा निवडणुका असल्याने झेंड्याचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवत तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

सरिता पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयपीसी 248 (1) ,171(F), 3, 4 आणि 5 या कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. खडेबाजार पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पण भगवा झेंडा हे हिंदुत्वाचं प्रतिक आहे. आपल्या घरावर भगवा झेंडा लावण्यात गैर काय असा सवाल पाटील करतात.

"भगवे झेंडे प्रत्येक घरावर लावलेले असतात. पण जाणूनबुजून मला त्रास दिला. निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी तक्रार करत माझ्यावर मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल केला. या खटल्याचा निकाल तब्बल सात वर्षानंतर लागला. दरम्यानच्या काळात मला प्रत्येक तारखेला न्यायालयात जावं लागलं. या आधी कधीही मी कोर्टाची पायरी चढले नव्हते. त्यामुळे मला व्यक्तिगत आयुष्यात त्रास सहन करावा लागला," पाटील सांगतात.

'मी मराठी' उल्लेख असलेले झेंडे एखाद्या राजकीय हेतूने लावण्यात आले होते, हे कर्नाटक सरकारला न्यायालयात सिद्ध करता आला नाही. त्यामुळं सरिता पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

न्यायालयात सरिता पाटील यांची बाजू माजी नगरसेवक आणि वकील रतन मासेकर यांनी मांडली.

मासेकर सांगतात, "2013 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात सगळीकडे मराठीजनांनी आपल्या घरावर, गल्लीत भगवे ध्वज लावले होते. त्यावेळी विधानसभा निवडणूक असल्याने तत्कालीन निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्यांनी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने भगवे ध्वज लावल्याचा ठपका ठेवत नगरसेविका सरिता पाटील यांच्यावर खटला दाखल केला. कलम 171 अंतर्गत मतदारांना आकर्षित करण्याचा आरोप पाटील यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण न्यायालयात सरकारला हे सिद्ध करण्यात यश आलं नाही. त्यामुळं पाटील यांची 7 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झाली."

सरिता पाटील यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर बेळगावमधील भाजपचे माजी आमदार संजय पाटील म्हणाले, "भगवा ध्वज हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता भगवा झेंडा हातात घेऊन पक्षाचं काम करतो. पण निवडणूक काळात निवडणूक आयोग काही नियम करत असतात. त्यानुसार त्यावेळी नेमकं काय झालं असेल हे पाहिलं पाहिजे. मात्र भगव्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे असं माझं मत आहे."

फोटो स्रोत, Swati Patil

फोटो कॅप्शन,

सरिता पाटील बेळगावच्या महापौर होत्या.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका सरिता पाटील बेळगावच्या महापौर असताना 2016 साली त्या 1 नोंव्हेबरच्या काळ्या दिनाच्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी कर्नाटक प्रशासनाने पाटील यांच्यावर कारवाईचा इशारा दिला होता.

महापालिकेच्या बैठका वेळेवर न घेणं, निधी वाटप न करणं असे आरोप ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी कागदपत्रांची पूर्तता केल्याने नगरविकास खात्याकडून सरिता पाटील यांना क्लिन चीट मिळाली होती.

तर 2009मध्ये तत्कालीन महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणु किल्लेकर यांच्यावर काळा दिन रॅलीत सहभागी झाल्या प्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच बेळगाव महापालिका बरखास्त करण्यात आली होती.

त्यानंतर 2013 मध्ये निवडणूक घेण्यात आली. मात्र 2014 मध्ये म्हणजे तब्बल एक वर्षानंतर शपथविधी घेण्यात आला. हा कार्यकाळ 2018 मध्ये पूर्ण झाला.

त्यानंतर 2020चं अर्धं वर्षं उलटून गेलं तरीही महापालिका निवडणूक जाहीर झालेली नाही. सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.

बेळगावचा महापौर मराठी माणूस होईल या भीतीने निवडणूक लांबवण्यात आल्याचा आरोप सरिता पाटील यांनी केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)