रिपब्लिक टीव्हीवर TRP घोटाळ्याचा ठपका, अर्णब गोस्वामी परमबीर सिंहांना कोर्टात खेचणार

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठीसाठी
मुंबई पोलीस

Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंगमध्ये गडबड केल्याचं समोर आला आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. तर रिपब्लिक टीव्ही मात्र हे खोटं असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई पोलिसांचे आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यांची माहिती दिली आहे.

"Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग बनावट पद्धतीने वाढवल्याचं केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार करू," असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.

मुंबईत टीव्ही चॅनेलबाबत TRP रॅकेट सुरू असल्याचा संशय आहे, पैसे देऊन TRP रेटिंग वाढवण्यात येत होती. घरोघरी चॅनेल सुरू ठेवण्यासाठी 500 रुपये देण्यात आले, याबाबत तपास सुरू आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं आहे.

या चॅनेलमध्ये Republic TV ही इंग्रजी वृत्तवाहिनी आणि दोन मराठी चॅनेल (वृत्तवाहिनी नाही) यांचा समावेश असल्याचं परमबीर सिंह यांनी सांगितलं.

"इंग्रजी येत नसलेल्या घरातही इंग्रजी चॅनेल सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चुकीचे TRP रेटिंग देण्यासाठी एक टोळी कार्यरत आहे. घरांमध्ये पैसे देऊन विशिष्ट चॅनेल सुरू ठेवण्यास सांगण्यात येत होतं, त्यामध्ये मोठे चॅनेल सहभागी आहेत," असंही परमबीर सिंह म्हणाले.

याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना पोलिसांनी अटक केली आहे.

तक्रार कोणी केली?

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, TRP मोजण्यासाठी मुंबईत जवळपास 2000 लोकांच्या घरी बायोमीटर्स लावण्यात आले आहेत. या बायोमीटर्सवर लक्ष ठेवण्याचं काम हंसा या एजेन्सीला देण्यात आलं होतं. या एजन्सीचा एक व्यक्ती टीव्ही चॅनल्सला TRP मध्ये फेरफार करण्यासाठी मदत करत होता. हंसा आणि टीव्ही मीडियाचा TRP मोजणाऱ्या BARC कंपनीने याबाबत तक्रार दिली होती.

काय म्हणाले पोलीस आयुक्त?

याबाबत पत्रकारांशी बोलताना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, "BARC या एजन्सीला गेल्या काही दिवसापासून रिपब्लिक टीव्हीच्या TRP पॅटर्नमध्ये गडबड होत असल्याचा संशय होता. BARC आणि हंसा एजन्सीने याबाबत चौकशी केली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे TRP मध्ये फेरफार झाल्याची तक्रार देण्यात आली."

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत रिपब्लिक टीव्हीने TRP मध्ये फेरफार करण्यासाठी पैसे दिल्याचं मान्य केलं आहे.

"मुंबईतील काही घरातील लोकांना रिपब्लिक टीव्ही लावण्यासाठी पैसे देण्यात आले. चौकशीत समोर आलंय की अशिक्षित लोकांना हे इंग्रजी चॅनल पाहण्यासाठी 400 ते 500 रूपये देण्यात येत होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 28 लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत," असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

पोलीस आयुक्तांच्या दाव्यानुसार, ज्या लोकांना पैसे देण्यात येत होते त्यांनी पैसे घेण्याचं मान्य केलं आहे.

अर्णब गोस्वामी यांची चौकशी होणार?

पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीवर फसवणूक केल्याचा आरोप केलाय. यात रिपब्लिक टीव्हीत काम करणाऱ्यांचा समावेश आहे का? रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची चौकशी करणार का?

याबाबत मीडियाशी बोलताना पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले, "सद्य स्थितीत आम्ही या प्रकरणी कोणाचीही भूमिका नाकारत नाही. रिपब्लिक टिव्हीत काम करणारे प्रोड्यूसर, मालक, संचालक आणि प्रमोटर्स यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. या सर्वांना समन्स पाठवलं जाईल. हे सर्व आमच्यासाठी आरोपी आहेत."

"टिव्ही चॅनल्सला जाहिरातीमधून मिळाणारा महसूल हा TRP वर अवलंबून असतो. त्यामुळे TRPमध्ये फेरफार करून मिळालेला पैसे हा फसवणूकीतून मिळालेला आहे. येत्या काळात गरज भासली तर त्यांचे बॅंक अकाउंट गोठवण्यात येतील," असं पोलीस आयुक्त पुढे म्हणाले.

पोलिसांकडे पुरावे आहेत?

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे TRPमध्ये फेरफार केल्याचे पुरावे असल्याचा दावा केलाय. "काही लोकांची नावं मिळालेली आहेत. त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे,"असं आयुक्त म्हणाले.

संजय राऊत यांनी यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकून 'अत्यमेव जयते' असं लिहिलं आहे.

रिपब्लिक टीव्हीची भूमिका

तर दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीने एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांची बाजू मांडली आहे. मुंबई पोलिसांचा दावा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्याविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Republic TV

आपली बाजू मांडताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी म्हणतात,

'मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिं यांनी रिपब्लिक टीव्हीवर चुकीचे आरोप लावले आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आम्ही त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळेच ते असं करत आहेत.

या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही परमबीर सिं यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. BARC रिपोर्टमध्ये रिपब्लिक टीव्हीचा कुठेही उल्लेख नाही. देशातील नागरिकांना सत्य माहीत आहे. परमबीर सिंग यांचा सुशांत प्रकरणाचा तपास संशयास्पद आहे.

पालघर पुजारी हत्या प्रकरण, सुशांत प्रकरण तसंच इतर प्रकरणांमध्ये रिपब्लिक टीव्हीने केलेल्या वार्तांकनाने अस्वस्थ होऊन त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

सत्य परिस्थिती दाखवण्यापासून परावृत्त करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करण्यात येत आहे. BARC च्या रिपोर्टमध्ये रिपब्लिक टीव्हीचा उल्लेखही नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी या प्रकरणी अधिकृतरित्या माफी मागावी आणि कोर्टात उपस्थित राहण्याची तयारी ठेवावी.'

फोटो स्रोत, BARC

गेली अनेक वर्षं हिंदी न्यूज या सेगमेंटमध्ये आज तक ही वृत्तवाहिनी आघाडीवर असायची. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे रिपब्लिक भारत एक नंबरवर आलं. गेल्या आठवड्याचे ताजे आकडे काही वेळापूर्वीच BARC या संस्थेने जाहीर केलेत. त्यानुसार रिपब्लिकची प्रेक्षकसंख्या कमी झाली असली तरी ते पहिल्या नंबरवर कायम आहेत.

अर्णब गोस्वामी यांना अटक करा - सरनाईक

TRP घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

"मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी TRP घोटाळा उघडकीस आणल्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामध्ये अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही चॅनेलने TRP घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या माध्यमातून चॅनेल मोठं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं आहे. इतर दोन चॅनेलच्या संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. पण अर्णब गोस्वामी यांना अद्याप का अटक करण्यात आली नाही? अर्णब गोस्वामी यांनासुद्धा अटक झाली पाहिजे," असं शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक म्हणालेत.

वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)