हाथरस प्रकरणातील आरोपीने तुरुंगातून लिहिलेलं कथित पत्र व्हायरल

  • दिलनवाज पाशा
  • बीबीसी प्रतिनिधी
चिट्ठी

उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने तुरुंगातून लिहिलेलं एक कथित पत्र व्हायरल होताना दिसत आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित व्यक्तीसोबत होता. त्याची आणि पीडितेची बातचीतही झाल्याचं त्याने या पत्रात म्हटलं आहे.

पीडितेला त्याच्यासोबत पाहून तिच्या आई आणि मुलानेच तिच्यावर हल्ला केला, असा आरोप आरोपीने लावला आहे.

याप्रकरणी हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जसस्वाल यांच्याशी बीबीसीने बातचीत केली.

"सदर पत्राची प्रत व्हॉट्सअॅपवर मिळाली आहे. पण अधिकृतपणे अशा प्रकारचं कोणतंच पत्र मिळालं नाही. तुरुंगातून पाठवण्यात येणाऱ्या पत्रावर तुरुंगाधिकाऱ्यांचा शिक्का असेल, तेच पत्र आम्ही अधिकृत मानतो," असं जयस्वाल म्हणाले.

तसंच, कदाचित ते पत्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवून देण्यात आलं असेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

तुरुंगात कैदेत असलेले कैदी आपलं म्हणणं मांडण्यासाठी अशा प्रकारचे पत्र आधीपासून लिहितात, सुनावणीदरम्यान न्यायाधीशांसमोर आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबाबत सांगतात. अनेकवेळा कैदी पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात, असं जयस्वाल म्हणाले.

कथित पत्र हातानं लिहिण्यात आलं आहे. यावर मुख्य आरोपीसह इतर आरोपींची सहीसुद्धा आहे.

तर पीडित कुटुंबीयांनी आरोपीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याची बाब फेटाळून लावली. हे पत्र म्हणजे एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.

यापूर्वी बातम्यांमध्ये आरोपी आणि पीडिता यांच्यातील एक कथित फोन कॉल रेकॉर्ड़िंग लीक करण्यात आली होती.

आरोपीने पीडितेच्या भावाला गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा कॉल केला. यादरम्यान एकूण सर्व मिळून पाच तासांपेक्षा जास्त वेळ त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं, असा दावा करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पण पीडितेच्या नातेवाईकांनी बीबीसीशी बोलताना ही गोष्ट फेटाळून लावली. त्यांच्यात आणि आरोपीमध्ये कधीच फोनवर बोलणं झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय, पोलिसांकडे रेकॉर्डिंग असल्यास त्यांनी ती जाहीर करावी, असं ते म्हणाले.

दरम्यान, फोन कॉलप्रकरणी पोलीस अधीक्षक जयस्वाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "मला याविषयी माध्यमांमधील बातम्यांमधूनच माहिती मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती SITचं पथकच देऊ शकेल.

कॉल डिटेल्स तपासाचा भाग आहेत का, या प्रश्नाचं उत्तरसुद्धा SITच देऊ शकेल, असं जयस्वाल यांनी सांगितलं.

हाथरसमधील कथिक सामूहिक बलात्कार प्रकरणात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आरोपी निर्दोष असून त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. तर पीडितेचे कुटुंबीय न्यायाची मागणी करत आहेत.

घाई-गडबडीत पीडितेचा मृतदेह जाळण्यात आल्यानंतर या प्रकरणात आणखी काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सध्या SIT या प्रकरणाचा तपास करत असून बुधवारी (7 ऑक्टोबर) त्यांचा अहवाल मिळणार होता. पण त्यांना आता 10 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची CBI चौकशी करण्याचा प्रस्तावही पाठवला असून अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

हाथरसमध्ये काय घडलं?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका दलित तरूणीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार झाला तसंच उपचारादरम्यान दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

पीडितेला अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आलं होतं.

14 सप्टेंबर रोजी पीडिता आपल्या आई आणि भावासोबत गवत कापण्यासाठी गेली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, असा कुटुंबाचा आरोप आहे.

सदर तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी कोणत्याही नातेवाईकाच्या उपस्थितीशिवाय रात्री उशीरा करण्यात आला, असा आरोप पोलीस आणि प्रशासनवर आहे.

पण, प्रशासनाने हा आरोप फेटाळला असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कुटुंबीयांच्या सहमतीने हा अंत्यविधी पार पाडण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)