ICC T-20 World Cup : स्ट्राईकरेट म्हणजे काय?
- पराग फाटक
- बीबीसी मराठी

फोटो स्रोत, Alex Davidson
असिफ अली
पाकिस्तानच्या असिफ अलीने अफगाणिस्तानविरुद्ध एका षटकात चार षटकार खेचत सनसनाटी विजय मिळवून दिला. असिफने 7 चेंडूत 25 धावांची अविश्वसनीय खेळी केली. असिफच्या स्ट्राईकरेटची सगळीकडे चर्चा आहे.
स्ट्राईक रेट असतो काय?
ट्वेन्टी-20 क्रिकेट म्हटलं की नेहमी स्ट्राईक रेटची चर्चा होते. नाक्यावर मित्रांच्या घोळक्यात, व्हॉट्स अॅपग्रुपवर, चॅनेलीय चर्चांमध्ये गेलचा स्ट्राईक रेट बघितला का? तो बॅट्समन किती स्लो खेळला यावर खमंग चर्चा रंगते. पण हा स्ट्राईक रेट नेमका काय असतो आणि तो मोजला कसा जातो? गणितीय असलं तरी हे समजून घेणं रंजक आहे कारण ट्वेन्टी-20ची मेख यातच आहे.
बॅटिंग स्ट्राईक रेट म्हणजे प्रति बॉल बॅट्समन किती रन्स करतो हा आकडा. हे प्रमाण टक्केवारीत मोजतात.
ज्या बॅट्समनचा स्ट्राईक रेट जास्त त्याचा रन्स करण्याचा वेग जास्त. आता हे कसं ते समजून घेऊया.
स्ट्राईक रेटचा फॉर्म्युला
स्ट्राईकरेटसाठी एक फॉर्म्युला वापरला जातो.
बॅट्समनने केलेल्या रन्सला 100ने गुणायचं. याचं जे उत्तर असेल त्याला बॅट्समनने किती बॉलमध्ये त्या रन्स केल्या ते भागायचं.
उदाहरणार्थ असिफने 7 चेंडूत 25 धावांची खेळी केली.
25*100/7=357.142
असिफ अलीचा त्या इनिंग्जचा स्ट्राईक रेट तब्बल 357.142 झाला. म्हणजेच शंभर चेंडूत असिफ 357 धावा करू शकतो असा त्याचा अर्थ. परंतु सात चेंडूतील खेळीतून समग्र करिअरविषयी बोलता येणार नाही.
फोटो स्रोत, Mumbai Indians
कृणाल पंड्या
गेल्यावर्षी सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहाने 31 बॉलमध्ये 30 रन्सची संथ खेळी केली. यासाठी त्याला जबरदस्त टीकेला सामोरं जावं लागलं.
साहाचा त्या इनिंग्जचा स्ट्राईकरेट पाहूया.
30*100/31=96.77
हैदराबादला मोठ्या धावसंख्येसाठी साहाकडून वेगवान खेळीची अपेक्षा होती. साहा वाईट खेळला नाही मात्र त्याच्या खेळीचा वेग कमी होता.
फोटो स्रोत, Sunrisers Hyderabad
वृद्धिमान साहा
कोलकाताविरुद्ध संथ खेळी केल्याबद्दल चेन्नईकडून खेळणाऱ्या केदार जाधवला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. केदारने 12 बॉलमध्ये 7 रन्स केल्या होत्या.
7*100/12=58.33
म्हणजे 100 बॉलमागे केदार 58 धावा करतो असा त्याचा अर्थ. ट्वेन्टी-20 सारख्या फॉरमॅटमध्ये जिथे एका संघाला 20 ओव्हर्स मिळतात, तिथे प्रत्येक बॅट्समनला मिळणाऱ्या बॉलची संख्या अत्यंत कमी असते. अशावेळी कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स कराव्या लागतात.
त्यादृष्टीने 100 बॉलमागे 58 रन्स करणारा खेळाडू संथ ठरतो. या उदाहरणात केदार जाधवची खेळी कूर्म गतीची ठरली होती.
फोटो स्रोत, Chennai Super Kings
केदार जाधव
चेन्नईसमोर 168 रन्सचं लक्ष्य होतं. शेन वॉटसन, फॅफ डू प्लेसिस, अंबाती रायुडूसह महेंद्रसिंग धोनी तंबूत परतले होते. खेळपट्टीवर बॅट्समन म्हणून केदारकडून मॅच जिंकून देण्याची अपेक्षा होती. मात्र कोलकाताच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर केदार रन करू शकला नाही. त्याच्या खेळीचा वेग टीकेच्या केंद्रस्थानी सापडला.
बॉलिंगचा स्ट्राईक रेट
ट्वेन्टी-20 प्रकारात बॉलर्सची कत्तल होते. मात्र चांगले बॉलर या फॉरमॅटमध्ये, 4 ओव्हर्समध्येही आपली छाप उमटवतात.
किती बॉलमागे बॉलर विकेट घेतो हे प्रमाण म्हणजे बॉलरचा स्ट्राईक रेट. उदाहरणाद्वारे समजून घेऊया.
फोटो स्रोत, Robert Cianflone
जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने विरुद्ध 4 ओव्हर्समध्ये 20 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.
4 ओव्हर्स म्हणजे 24 बॉल. या आकड्याला बुमराहने घेतलेल्या विकेट्सनी भागूया.
24/4=6
म्हणजे बुमराहने त्या मॅचमध्ये साधारणपणे 6व्या बॉलला विकेट पटकावली आहे. 24 बॉलमध्ये 4 विकेट्स ही कामगिरी चांगली असल्याने 6 हा स्ट्राईक रेटही चांगला आहे.
बॉलरच्या बाबतीत स्ट्राईकरेट कमी असणं हे चांगलं असतं. दुसऱ्या शब्दात किती कमी बॉलमध्ये बॉलर विकेट काढतो त्याचं हे प्रमाण.
इकॉनॉमी रेट म्हणजे काय?
इकॉनॉमी रेट हे तुलनेने समजायला सोपं आहे. एखाद्या बॉलरने मॅचमध्ये दिलेल्या रन्सच्या संख्येला ओव्हर्सच्या संख्येने भागायचं. जो आकडा समोर येतो तो म्हणजे त्या बॉलरने सरासरी प्रति ओव्हर किती रन्स दिल्या आहेत.
उदाहरणार्थ चेन्नईच्या करण शर्माने 4 ओव्हरमध्ये 28 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे 28/4=7
याचाच अर्थ करणने त्या स्पेलमध्ये साधारण प्रतिओव्हर सातच्या रेटने रन्स दिल्या. इकॉनॉमी रेट जितका कमी तितका तो बॉलर रन्स रोखण्याच्या बाबतीत यशस्वी असं गृहितक आहे.
उदाहरणार्थ पंजाबच्या ख्रिस जॉर्डनने 3 ओव्हरमध्ये 42 रन्स दिल्या. हे आकडे सूत्रात टाकले तर 42/3= 14
याचा अर्थ जॉर्डनने त्या स्पेलमध्ये प्रतिओव्हर 14 रन्सची खिरापत वाटली आहे. बॅट्समनने त्याचा बॉलिंगचा समाचार घेतला आहे. पंजाबच्या टीमला जॉर्डनकडून रन्स रोखण्याची अपेक्षा होती पण यात तो कमी पडला.
इकॉनॉमी रेट हा पूर्णांकातही असू शकतो. म्हणजे याच मॅचमध्ये पंजाबच्या हरप्रीत ब्रारने 4 ओव्हर्समध्ये 41 रन्स दिल्या. सूत्रानुसार 41/4=10.25
हरप्रीतच्या एका ओव्हरमध्ये साधारणत: 11 रन कुटल्या गेल्या. अर्थातच हे प्रमाण वाईट आहे. हरप्रीत प्रतिस्पर्धी संघाची रन्सची फॅक्टरी थांबवू शकला नाही.
इकॉनॉमी रेट काढताना विकेट्सचा मुद्दा गौण राहतो. संबंधित बॉलर किती इकॉनॉमिकल म्हणजे किती काटेकोर बॉलिंग करतो याचं हे प्रमाण असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)