मराठा आरक्षण: उदयनराजे समर्थकांचे प्रकाश आंबेडकरांना आव्हान #5मोठ्याबातम्या

प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, facebook

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'प्रकाश आंबेडकर, धमक असेल तर समोर या,राजांच्या स्टाईलमध्ये उत्तर देऊ'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनावरुन गुरुवारी (8 ऑक्टोबर) उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली.

'एक राजा तर बिनडोक आहे. दुसरे संभाजी छत्रपती यांनी भूमिका घेतली आहे पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर देत आहेत' असं ते म्हणाले.

त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

उदयनराजे यांच्या समर्थकांनी म्हटलं, "ज्या प्रकाश आंबेडकर यांनी सातारा शहरात सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम केलं नाही, त्यांनी आमच्या राजाबद्दल असे उद्गार काढणं योग्य नाही. त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी वेळ आणि ठिकाण सांगावं, त्याठिकाणी आम्ही येऊ आणि राजेंच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ."

2. महाविकास आघाडीतील पक्ष येणाऱ्या काळात विरोधी बाकावर - जे. पी. नड्डा

महाराष्ट्रात काय चाललंय, काहीच कळत नाही, कोरोना काळात काम करण्यास ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जे. पी. नड्डा

भाजपच्या नवनिर्वाचित राज्य कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण राजकारणात धोका होत असतो राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच निवडून दिलं होतं, पण शिवसेनेनं धोका केला, हा धोका भाजपाशी नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे. येणाऱ्या काळात हे तिन्ही पक्ष विरोधात बसलेले दिसतील, सध्या आपण विरोधकांचे काम करू, येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल.

3. 'आत्मनिर्भर भारत योजनेतून सरकारला काय साध्य करायचंय?'

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'ची घोषणा केली होती. पण, "केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' योजनेचे परिणाम संरक्षणवादाच्या रूपात होऊ नयेत," असं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राजन म्हणाले, "आत्मनिर्भर भारत राबवताना स्वदेशी मालाच्या स्पर्धेत परदेशी माल उतरू नये यासाठी स्वदेशी मालास सरकारने दिलेले संरक्षण घातक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

"यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते 'मेक इन इंडिया' हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे."

4. डॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपी महिला डॉक्टरांना पुढील शिक्षणास परवानगी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टरांना पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. यामुळे आरोपी डॉक्टर मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकणार आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Payal Tadavi

फोटो कॅप्शन,

पायल तडवी

मुंबई उच्च न्यायलयानं 3 आरोपी महिला डॉक्टरांना सशर्त जामीन देताना बीवायएल नायर हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई केली होती. याविरोधात डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या डॉ. पायल तडवीने 22 मे 2019 रोजी आत्महत्या केली. पायलने तिच्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ डॉक्टर सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला होता.

5. MPSCचा निकालाबाबत नवीन निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेची मूळप्रत स्कॅन करून त्यांच्या ऑनलाईन प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे निकालाबाबत साशंकता असल्यास लगेच त्याची पडताळणी होऊ शकणार आहे, सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक फोटो

दरम्यान, एमपीएससीची रविवारी (11 ऑक्टोबर) होणारी परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या नेत्यांशी गुरुवारी (8 ऑक्टोबर) दीर्घ चर्चा केली. या बैठका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.

परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचा दावा बैठकीनंतर मराठा नेत्यांनी केला. मात्र, सरकारने रात्री उशिरापर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)