मुंबईला वीज पुरवठा कोण करतात? मुंबईत वीज कधीच कशी जात नाही?

इलेक्ट्रिसिटी

फोटो स्रोत, Getty Images

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (12 ऑक्टोबर) सकाळीच मुंबई शहरातल्या बहुतेक भागातली वीज गायब झाली. 10 वाजून 15 मिनिटांनी वीज पुरवठा बिघाडाच्या या प्रकरणाची नोंद शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीने घेतली.

तोपर्यंत मुंबई महानगर, पश्चिम आणि मध्य उपनगरं त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या शहरांपर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता आणि त्याचा फटका उपनगरी रेल्वेसेवा, शहरातील अत्यावश्यक सेवा, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेलाही बसला.

पुढच्या दोन तासांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आलं. पण, मुंबईसारख्या औद्योगिक राजधानीत घडलेल्या या प्रकारामुळे काही तास सगळ्याच यंत्रणेचा गोंधळ उडाला हे नक्की.

एरवी मुंबई सारख्या शहरात चोवीस तास वीज पुरवठा सुरू असतो. इथली वीज अचानक गायब होत नाही. पण, असं एखादं वीजसंकट येतं तेव्हा कुतुहल निर्माण होतं, की शहराला असा चोवीस तास पुरवठा कसा शक्य होतो? इथं वीज क्वचितच का जाते? हा वीज पुरवठा कोण करतं?

मुंबईला वीज पुरवठा कसा होतो?

तुम्हाला हे ठाऊक आहे का, की भारतात या घडीला सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 2 लाख 75 हजार मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. आणि वीज वापराची सरासरी काढली तर देशातल्या प्रत्येक घरात दर तासाला सरासरी एक हजार किलोवॅट इतकी वीजेची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्याला लॉकडाऊनपूर्वीचा विचार केला तर सरासरी दिवसाला 22 हजार मेगावॅट इतक्या विजेची गरज लागते आणि यातली जवळ जवळ 8 ते 12 टक्के म्हणजे 3300 मेगावॅट वीज ही एकट्या मुंबई शहराला लागते. ही विजेची मागणी अचानक कमी झाली किंवा अचानक वाढली तर पुरवठा आणि मागणी यांच्यातलं संतुलन जाऊन आतासारखं वीजेचं संकट येऊ शकतं.

मुंबईनगरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे आणि आपली विजेची गरज मागची कित्येक वर्षं स्वत:च पूर्ण करत आलेली आहे. अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती होती. मुंबईतल्या वीज निर्मिती आणि पुरवठा व्यवस्थेला 'आयलँडिंग व्यवस्था' (बेटावर वीज पुरवठा करणारी व्यवस्था) असं म्हटलं जातं. त्यानंतर मात्र जशी विजेची मागणी वाढली तशी टाटा पॉवर आणि पूर्वी रिलायन्स एनर्जी या कंपन्यांना वीज निर्मिती आणि पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

मुंबई पी

इथल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून तयार झालेली वीज उच्च दाबाच्या विजेच्या तारांमधून जवळच्या वीज केंद्रांपर्यंत पोहोचवली जाते. तिथून ती वीज उपकेंद्र आणि पुढे विजेच्या तारांच्या आणि ग्रिड्सच्या माध्यमातून घराघरांपर्यंत पोहोचवली जाते. मुंबईतल्या घरोघरी ही वीज पोहोचवण्याचं काम मुंबई महानगर परिसरात बेस्ट म्हणजेच बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट तर उपनगरात टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या कंपन्यांबरोबरच महावितरण ही कंपनीही करते.

मुंबईला वीज पुरवठा कोण करतं?

मुंबई ही औद्योगिक राजधानी असल्यामुळे इथली विजेची औद्योगिक मागणीही मोठी आहे. त्यासाठीच 1873 साली मुंबईत बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली. मुंबईला अखंड विद्युत पुरवठा करणं आणि शहराअंतर्गत वाहतूक सेवा चालवणं हे तिचं मुख्य काम होतं. आताही शहरातील साडे दहा लाख घर आणि कार्यालयांना हीच कंपनी वीज पुरवठा करते.

पण, मुंबई शहर जसं विस्तारलं आणि उपनगरांची वाढ होत गेली तेव्हा विजेच्या वाढत्या मागणीसाठी सरकारी बरोबरच खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा वाढवण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच 1990च्या दशकापासून मुंबई शहर आणि उपनगरांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर, रिलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आले. यातील रिलायन्स कंपनीने आपला मुंबई शहराला करत असलेला वीज पुरवठा अलीकडेच म्हणजे 2018 मध्ये अदानी पॉवर या कंपनीला विकला आहे.

थोडक्यात म्हणजे या घडीला दक्षिण मुंबईत बेस्ट, पश्चिम आणि मध्य मुंबईत टाटा तसंच अदानी पॉवर या कंपन्यांकडून पुरवठा होतो. टाटा पॉवर कंपनी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती करते जिचा पुरवठा ग्राहकांना आणि खासकरून शहरातली व्यापारी संकुल, कार्यालयं यांना होतो. तर अदानी एनर्जी ही कंपनी मुंबई जवळ डहाणू इथं पाचशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करते आणि तिचा पुरवठा घरगुती ग्राहकांना आणि व्यापारी कामांसाठीही होतो.

अशा पद्धतीने मुंबई शहराची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतो.

मुंबईला 24 तास वीज पुरवठा कसा शक्य होतो?

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुंबई शहराची गरज 3 हजार मेगावॅट इतकी आहे. सध्या लॉकडाऊनच्या दिवसांत ती कमी होऊन 2600 मेगावॅट पर्यंत स्थिरावली आहे. पण, मुंबई हे महत्त्वाचं महानगर असल्याने तिथे अव्याहत वीज पुरवठा सुरू राहणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनेच टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या कंपन्यांशी करार करण्यात आल्याचं वीज क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

"10-15 वर्षांपूर्वी मुंबई वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होती. जितकी, वीजेची मागणी होती ती शहरातील वीज निर्मिती प्रकल्पांमधून होत होती. पण, ही मागणी वाढल्यावर खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली. सध्या शहराच्या एकूण मागणीपैकी 40 टक्के विजेची निर्मिती बाहेरून होते. आणि टाटा तसंच अदानी यांच्या कंपन्या या विजेची निर्मिती तसंच वितरणही करतात," पेंडसे सांगतात.

त्याचबरोबर विजेची आपात्कालिन गरज पडली तर त्यासाठी राज्य सरकारच्या कोट्यातूनही एक स्टँडबाय लक्ष्य मुंबईसाठी ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी मुंबईकर आपल्या वीज बिलाच्या माध्यमातून 500 कोटी रुपये MSDCL या राज्य सरकारच्या कंपनीला देत असतात, अशी माहितीही पेंडसे यांनी दिली.

"मुंबईत वीज कमी पडू नये अचानक तुटवडा होऊ नये यासाठी राज्याच्या कोट्यातली काही वॅट वीज ही मुंबईसाठी राखून ठेवली जाते. आपत्कालिन परिस्थितीत ही वीज मुंबईतील वापरासाठी खुली होते. त्यामुळेच मुंबईत अव्याहत पुरवठा शक्य होऊ शकतो. या राखीव विजेसाठी मुंबईकर दर महिन्याला 500 कोटी रुपये भरतो," पेंडसे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)