लक्ष्मी विलास बँकः तुमचे बँकेतले पैसे सुरक्षित राहाण्यासाठी हे उपाय करा

  • सरोज सिंह
  • बीबीसी प्रतिनिधी
लक्ष्मी विलास बँकः तुमचे बँकेतले पैसे सुरक्षित राहाण्यासाठी हे उपाय करा

फोटो स्रोत, Getty Images

केंद्र सरकारने लक्ष्मी विलास बँकेतील ठेवीदारांना आपले पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे. 16 डिसेंबरपर्यंत खातेधारकांना एका खात्यातून जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढता येणार आहेत. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांनाही अशाच निर्बंधांना सामोरे जावे लागले होते.

त्यामुळे आपले बँकेतले पैसे कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न उरतोच. यंदाच्या बजेटमध्ये डिपॉझिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे ग्राहकांची 5 लाखांपर्यंतची ठेव सुरक्षित करण्य्यात आली आहे. तुमच्या पाच लाखांपर्यंतच्या रकमेचा विमा काढला जातो.

पण आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पैसे ठेवण्यासाठी तुम्ही बँक कशी निवडता हे जाणून घेणं गरजेचं आहे. भारत सरकारचे माजी महसूल सचिव राजीव टकरू सांगतात, 'लोक फक्त घराजवळ बँकेची शाखा आहे, सर्व्हिस चांगली देते म्हणून खातं काढतात. पण तसं करणं योग्य नाही.'

आपला पैसा सुरक्षित राहावा यासाठी टकरू यांनी काही उपाय सांगितले आहे.

1) सरकारी बँक की खासगी बँक

भारतात खासगी बँकेपेक्षा सरकारी बँक सुरक्षित असते अशी धारणा आहे.

राजीव टकरू म्हणतात, यामागे एक लॉजिक आहे. बँक चालवणारी एखादी खासगी व्यक्ती असेल तर तिला मर्यादा असतात जर अशा स्थितीत बँकेला तोटा झाला तर तो भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे मर्यादित साधनं असतात.

परंतु सरकारी बँक चालवताना ती दिवाळखोरीत निघणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. तसेच सरकारची प्रतिमाही त्यावर अवलंबून असते. त्यामुळे सरकारी बँकेत पैसे सुरक्षित राहातात असं मानलं जातं. तोटा भरून काढण्यासाठी सरकारचे काही मार्ग असतात.

सरकार बँकेत पैसाही ओतत असते त्यामुळे बँका तोट्यातून बाहेर येण्यास मदत होते. लक्ष्मी विलास बँकेचे विलिनीकरण डीबीएस इंडियामध्ये करण्याची तयारी सुरू आहे.

2) बँकिंगमध्ये विविधता आणा

तुम्ही बँकांमध्ये जे पैसे ठेवणार आहात ते एकाच बँकेऐवजी अनेक बँकांमध्ये ठेवा. काही लोकांना असं त्रासदायक वाटू शकतं. पण पीएमसी, लक्ष्मीविलास बँकेचा अनुभव पाहाता अनेक बँकेत पैसे ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.

बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या मतानुसार, अनेक बँकांमध्ये पैसे ठेवणं अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरू शकतं. कुटुंबातल्या वेगवेगळ्या सदस्यांच्या नावावरही खातं काढलं जाऊ शकतं. एका बँकेतन पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले तर दुसरे पर्याय खुले राहातात.

3) बँकेचा ताळेबंद नीट वाचा

राजीव टकरू तिसरा सल्ला देतात तो ताळेबंद वाचण्याचा. तुम्ही ज्या बँकेत खातं काढणार आहात त्या बँकेची स्थिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बँकेचा ताळेबंद पाहून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकतात. जर तो समजण्यास कठीण वाटलं तर कोणाची तरी मदत घेऊ शकता.

फोटो स्रोत, EDUCATION IMAGES

त्यामुळे बँकेची लायबलिटी (उत्तरदायित्व, कर्ज) किती आहे हे समजतं. बँकेचा पैसे कोठे कोठे अडकला आहे, अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) किती आहे ते समजतं.

आदिल शेट्टी म्हणतात, "वेळोवेळी तुम्ही बँकेचं मूल्यांकन केलं पाहिजे. बँकेसी संबंधित प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवावं. एनपीए, स्टॉक मार्केटमध्ये बँकेची स्थिती हे काही मापदंड आहेत, त्यावरुन तुम्हाला बँकेची तब्येत सध्या कशी आहे ते समजतं. पीएमसी आणि येस बँकेच्या बाबतीत हेच दिसून आलं. ताळेबंदावरुन बँकेचं काम कसं सुरू आहे ते समजतं."

4) आपली बँक 'स्ट्रेस बँक' लिस्टमध्ये तर नाही ना?

पैसे ठेवीच्या रूपात म्हणजे बचत खात्यात किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले की ते सुरक्षित राहिले असं तुम्हाला वाटतं. पण बँकिंग प्रणाली तसं मानत नाही. वास्तविक तुम्ही बँकेला कर्जरुपात पैसे देता आणि त्याबदल्यात बँक तुम्हाला व्याज देत असते.

तुम्ही बँकेत पैसे ठेवता म्हणजे ते पैसे बाजारात गुंतवण्य़ाची परवानगी तुम्ही देत असतात. मात्र गुंतवलेल्या पैशावर कमाई झाली नाही तर बँकेपुढे अडचण निर्माण होते. त्यामुळेच बँकेचे पैसे कोठे अडकलेत हे ताळेबंदातून समजते.

फोटो स्रोत, Getty Images

बँका आपले व्यवहार, हिशेब नीट करतात की नाही हे पाहाण्याचं काम आरबीआयचं आहे. जराही शंका आली तर आरबीआय निर्बंध लागू करते. हाताबाहेर स्थिती गेली तर बँकांचं कामकाज काही दिवसासांठी आपल्या हातात घेते.

थोडी शोधाशोध केल्यावर तुम्हाला अशा बँकांची यादी इंटरनेटवर स्ट्रेस्ड बँक म्हणून सापडेल. त्यात तुमची बँक असेल तर लवकरात लवकर पैसे काढून घेणं फायद्याचं ठरेल.

5) जास्त व्याज दर असेल तर नक्की तपासणी करा

जर जास्त दराने व्याज मिळत असेल तर अशा बँकेकडे जास्त संशयाने पाहावे असं राजीव टकरू सांगतात.

साधारणतः बँका ठेवींवर व्याज कमी देतात. काही खासगी बँका चांगली सेवा देऊन सरकारी बँकांपेक्षा थोडं जास्त व्याज देतात. पण एखादी बँक यापेक्षाही सर्वांत जास्त व्याज देत असेल तर तुम्ही निश्चितच थोडी चौकशी केली पाहिजे.

आदिल शेट्टी म्हणतात, "या नोव्हेंबर महिन्यात फिक्स्ड डिपॉझिटवर 4.9 ते 5.5 टक्के व्याज दिलं जात आहे. मात्र काही लहान बँका 7 टक्के व्याज देत आहेत. सर्वत्र व्याजदर कमी होत असताना लोक अशा ठिकाणी पैसे ठेवून व्याज मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र यात धोकासुद्धा आहे. त्यासाठी आपला पैसा ठेवण्याआधी नीट तपास करावा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)