ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदाच्या शर्यतीतल्या सासू - सुनेचं राजकारण अन् रखडलेला ग्रामविकास

  • प्रणाली येंगडे
  • बीबीसी मराठीसाठी नांदेडहून
महिला मतदार

फोटो स्रोत, Getty Images

अवघी 1,874 लोकसंख्या असणाऱ्या दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू आणि सून एकमेकींच्या प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात आहेत.

या दोघींमधले कौटुंबिक आणि राजकीय वाद सध्या या गावातल्या निवडणुकीच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

नांदेड जिल्ह्यातल्या दाभड ग्रामपंचयातीमध्ये रेखा दादजवार आणि संगीता दादजवार ही सासू- सून जोडी एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

रंजक बाब म्हणजे याआधीच्या टर्ममध्ये या दोघींनीच सरपंचपद वाटून घेतलेलं होतं.

पदासाठी सासू - सून संघर्ष

बीबीसी मराठीशी बोलताना संगीता दादजवार यांनी सांगितलं, "मागच्या टर्ममध्ये अडीच-अडीच वर्ष सरपंच पदाचा कार्यभार विभागला गेला असतानाही सत्तेच्या प्रेमापोटी सासूबाईंनी चार वर्षे सरपंच पद सोडलं नाही. शेवटी ग्रामसभा नियमित न घेतल्याने त्यांना पद सोडावे लागलं होतं."

आपल्यामध्ये मतभेद नसून दोघींपैकी कोणीही निवडून आलं तरी त्याचा आनंदच असेल असंही संगीता सांगतात.

पण कार्यकाळ विभागण्याविषयी काहीच ठरलं नव्हतं, असं सासूबाई रेखा दादजवार यांचं म्हणणं आहे.

त्यांनी म्हटलं, "सणावारानिमित्त कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येतो. मात्र, माझ्या कार्यकाळात मला खूप त्रास दिला गेला. मुळात अडीच-अडीच वर्षे कार्यभार विभागण्यात आलाच नव्हता. ही विभागणी उपसरपंच पदासाठी होती."

आपण घेतलेल्या ग्रामसभांची ग्रामसेवकाने नोंद न ठेवल्याने आपल्याला पदावरून बडतर्फ केलं गेलं, असं रेखा दादजवार यांचं म्हणणं आहे. पण ग्रामसभा घेणं ही सरपंचाची जबाबदारी असून नोटीस काढल्याशिवाय ग्रामसभा घेतली जाऊ शकत नाही, त्यामुळे ग्रामसेवकाने नोंद न ठेवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महिला राजसत्ता आंदोलनाच्या मालती सगणे यांनी सांगितलं.

एकूण 3 अवॉर्ड असणाऱ्या दाभड ग्रामपंचायतीत सासू-सून एकाच वॉर्डमधून निवडणूक लढवत असल्याने चुरस निर्माण झाली आहे.

रखडलेला ग्रामविकास

दाभाडे गावाला बीबीसी मराठीच्या प्रतिनिधीने भेट दिली. ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत धूळ खात पडलेलं ग्रामपंचायत ऑफिस, निकृष्ट दर्जाचे रस्ते, रखडत पडलेले विकास प्रकल्प अशी अवस्था सध्या गावात आहे.

फोटो स्रोत, Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सासू - सुनेच्या या भांडणात गावाचा विकास रखडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका गावकऱ्याने सांगितलं, "माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ असलेली दाभड ग्रामपंचायत नॅशनल हायवेलगत असल्याने आर्थिक मिळकतीच्या बाबतीत समृद्ध आहे. असं असतानाही, सासू काय किंवा सून काय कोणीही काहीच काम केलेलं नाही. गावात साधी स्मशानभूमी देखील नाही. पक्के रस्ते नाहीत. पिण्याच्या पाण्याकरता 20 लाखांचा निधी मिळूनही तो प्रकल्प आजतागायत रखडलेलाच आहे."

दाभड ग्रामपंचायतीतल्या या सासू - सुनेतल्या लढतीविषयी बोलताना महिला राजसत्ता आंदोलनाच्या राज्य निमंत्रक मालती सगणे यांनी सांगितलं, "त्या दोघी राजकारणाच्या रिंगणात असल्या तरी त्यांचा 'गॉडफादर' कुणीतरी वेगळा आहे. पितृसत्ताक व्यवस्थेत दोन स्त्रियांमध्ये भांडणं लावून त्याद्वारे आपली राजकीय पोळी भाजण्याचा मानस तेथील पुरुषांचा असला पाहिजे.

त्यात मराठवाड्यात अजूनही सरंजामशाही अस्तित्वात असल्याने 50 टक्के आरक्षण असून देखील त्याचा खरा फायदा महिलांना मिळवून देण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)