धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजप नेते कृष्णा हेगडेंची तक्रार

कृष्णा हेगडे

फोटो स्रोत, http://krishnahegde.com

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने 2010मध्ये आपल्यालाही त्रास दिला होता अशी तक्रार एका भाजप नेत्याने दाखल केलीय.

याच महिलेने आपल्यालाही भुलवण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेच्या आंबोली पोलीस ठाण्यात याविषयीची तक्रार दाखल केलीय.

आपण या महिलेला दोन वेळा भेटल्याचं कृष्णा हेगडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, "या महिलेने आधी मला त्रास दिला, आज धनंजय मुंडेंवर आरोप केलेयत. मनसेच्या मनीष धुरींनीही मला त्यांच्यासोबत असाच प्रकार घडल्याचं सांगितलं."

ही महिला 2010 सालापासून आपल्याला कॉल आणि मेसेज करून त्रास देत असल्याचं कृष्णा हेगडेंनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

पाच वर्षं म्हणजेच 2015पर्यंत हा प्रकार सुरू होता असं कृष्णा हेगडे यांनी या तक्रारीत सांगितलं आहे.

आपल्याला अशा नात्यात वा भेटण्यात रस नसल्याचं सांगितल्यानंतरही तिने मेसेज करणं सुरू ठेवलं, आपल्यावर पाळतही ठेवण्यात आली, असा आरोप कृष्णा हेगडेंनी केलाय.

ही महिला आपल्याला ब्लॅकमेल करत होती, संबंध निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करत होती, यावर्षी जानेवारी महिन्यातही या महिलेने आपल्याला मेसेज पाठवले होते. हा हनीट्रॅप आहे, असं या तक्रारीत म्हटलंय.

दरम्यान, 2008-09 मध्ये या महिलेने आपल्याला संपर्क केल्याचं मनसेचे नेते मनीष धुरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. या महिलेला म्युझिक व्हीडिओ करायचा होता, ती आपल्याला कॉल - मेसेज करायची असं मनीष धुरींनी सांगितलं.

एकीकडे किरीट सोमय्यांसारखे भाजप नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत असतानाच दुसरीकडे कृष्णा हेगडेंनी ही तक्रार दाखल केल्याने चर्चांना सुरुवात झालीय.

पण आपल्यासाठी हा राजकीय मुद्दा नसून धनंजय मुंडेंना आपण ओळखत नसल्याचं कृष्णा हेगडेंनी माध्यमांना सांगितलं.

आपल्याला त्रास देणाऱ्या महिलेनेच धनंजय मुंडेंवर आरोप केल्याने आपण थक्क झालो आणि म्हणून पुढे येत तक्रार दाखल करत असल्याचं कृष्णा हेगडेंनी तक्रारीच्या पत्रात म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)