धनंजय मुंडे यांच्याबद्दल शरद पवारांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय?

  • दीपाली जगताप
  • बीबीसी मराठी
धनंजय मुंडे-शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल," असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध असून आपल्याला त्यापासून दोन अपत्य असल्याचे जाहीर केले होते. या महिलेच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हा आरोप मुंडे यांनी फेटाळला आहे.

या प्रकरणी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

शरद पवार यांच्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय? याप्रकरणी शरद पवार काय निर्णय घेणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जाईल का? पवारांच्या विधानानंतर आता धनंजय मुंडे स्वत:च राजीनामा देणार? या प्रश्नांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

शरद पवार नेमकं काय म्हटले?

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आज (14 जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

फोटो स्रोत, Facebook / Dhananjay Munde

धनंजय मुंडे यांनी बुधवारी (13 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपले स्पष्टीकरण दिल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, "धनंजय मुंडे यांनी मला भेटून सविस्तर माहिती दिली. पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर हा विषय मांडणार आहे. त्यांचे काही व्यक्तिगत संबंध होते त्यातून पोलीस तक्रार झाली आहे. धनंजय मुंडे यांनीही यापूर्वी न्यायालयात दाद मागितली आणि आदेश मिळवला."

"पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना त्यांनी दिलेली माहिती देणं माझे कर्तव्य आहे. त्यांची मतं जाणून घेऊन पुढची पावलं उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत," असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या सूचक वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. याप्रकरणी पक्षला निर्णयाला घ्यावा लागेल," असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे राजीनामा देतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी बीबीसीशी बोलताना असं सांगितलं, "शरद पवार यांनी नवाब मलिक यांना 'क्लीन चीट' दिली पण धनंजय मुंडे यांच्याबाबतीत निर्णय घ्यावा लागेल असं ते स्पष्ट म्हणाले. त्यामुळे थेट निर्णय घेतला नसला तरी त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट केलं."

फोटो स्रोत, Twitter

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ते पुढे सांगतात, "असे सूचक विधान करून त्यांनी धनंजय मुंडे यांना स्वत:च निर्णय घेण्यासाठी वेळ दिल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावरून दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असंही पवार म्हणाले आहेत. पण शरद पवार यांचे शब्द हे कारवाई सूचित करणारे आहेत यात शंका नाही,"

शरद पवार महिलेचा आरोप गंभीरतेने घेत असले तरीही कोणताही निर्णय पूर्ण विचार केल्याशिवाय घेणार नाहीत असंही काही राजकीय विश्लेषकांना वाटते.

ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "या प्रकरणात एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आम्ही एका महिलेच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत नाही असा संदेश दिला आहे. पक्षाचा कोणताही नेता महिलेवर अन्याय करत असेल तर ते खपवून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांना जी माहिती आहे त्या आधारावर वक्तव्य केले आहे."

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्याने तसंच त्यांनी आपले विवाहबाह्य संबंध आणि अपत्य असल्याचे जाहीरपणे कबूल केल्याने पक्षाची प्रतिमा खालावली आहे.

शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना याचाही विचार केल्याचे दिसून येते. एकाबाजूला महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी स्वतंत्र धोरण याबाबत भाष्य करायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच नेत्यांना पाठिशी घालायचे अशी भूमिका पक्षाला घेता येणार नाही, असं सांगण्याचा प्रयत्नही पवारांनी आपल्या वक्तव्यातून केलेला दिसतो.

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी सांगितलं, "गंभीर आरोपाचे परिणाम गंभीरच होत असतात. तो आरोप सिद्ध झाला तरी आणि नाही झाला तरी. बलात्काराचा आरोप गंभीर असल्याने शरद पवारांनीही प्रकरण गंभीर असल्याचे म्हटलं आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचाही विचार पक्ष करणार."

'पक्षाला निर्णय घ्यावा लागेल'

शरद पवार यांचे वक्तव्य म्हणजे धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वत:च देण्यासाठी दिलेला वेळ आहे, असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना वाटते.

ते म्हणतात, "धनंजय मुंडे यांनी स्वत: राजीनामा दिला तर उद्या नेते म्हणणार त्यांनी स्वत: राजीनामा दिला आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना एकप्रकारे पवारांनी वेळ दिला आहे."

"धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात पक्षाला निर्णय घ्यावा लागेल," असंही शरद पवार म्हणाले. पण याचा अर्थ धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जाईलच असे नाही असंही काही तज्ज्ञांना वाटते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे प्रकरणात पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे तसंच धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, SUPRIYA SULE/FACEBOOK

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "त्यांच्यावरील आरोप गंभीर असले तरी कोणाच्याही केवळ आरोप करण्यावरून निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे पोलीस तपासानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. संबंधित महिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार याआधीच धनंजय मुंडे यांनी केली आहे. याचाही आपण विचार करायला हवा."

शरद पवार यांचे वक्तव्य आणि त्यांच्या प्रतिक्रियेनंतर जयंत पाटलांनी दिलेली प्रतिक्रिया यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते.

यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार समर खडस असं सांगतात, "पक्षाला राजीनामा मागायचा असता तर तातडीने मागितला असता. काही वर्षांपूर्वी राजकारणात असे तातडीने राजीनामे मागितले गेले आहेत. पण पक्षाने अद्याप राजीनामा मागितला नाही याचा अर्थ त्यांच्याकडे यासंदर्भात ठोस पुरावा किंवा तथ्य समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस तपास करतील आणि मग पक्ष निर्णय घेईल असेच शरद पवार यांना सांगायचे असावे असे वाटते."

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप झालेले आहेत. संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे तर मुंडेंनी महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, PTI

प्रताब आसबे सांगतात, "यासंदर्भात अधिक माहिती घेऊन सविस्तर विचार करूनच शरद पवार निर्णय घेतील. याप्रकरणाला अनेक कंगोरे असल्याचे आता दिसून येते. त्यामुळे कोणताही निर्णय पक्ष घाईगडबडीत घेणार नाही असे दिसते."

कृष्णा हेगडे यांच्या तक्रारीनंतर शरद पवारांची भूमिका बदलणार?

महिलेचे आरोप सिद्ध होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. त्यामुळे शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असली तरी याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत.

त्यात या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेविरोधात पोलीस तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.

अभय देशपांडे सांगतात, "हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की शरद पवार यांचे वक्तव्य भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्या तक्रारीआधीचे आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेविरोधात कृष्णा हेगडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे आणि परिस्थिती बरीच बदलली आहे. यामुळे आता मुंडे यांच्या राजीनाम्याचा विरोधात असलेला राष्ट्रवादीतील गटाचा आवाज वाढणार आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)