धनंजय मुंडे : बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागेल का?

  • प्राजक्ता पोळ
  • बीबीसी मराठीसाठी
धनंजय मुंडे

फोटो स्रोत, DHANANJAY MUNDE/ FACEBOOK

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला. याबाबत धनंजय मुंडे यांनी खुलासाही केला.

पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपने बलात्काराचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलीस चौकशी पूर्ण झाल्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केला. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं चित्र होतं.

पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर आहेत. त्यावर पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल."

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्यांनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं,"मी शरद पवार यांना भेटून या प्रकरणाची सर्व माहिती दिली आहे. पक्ष आणि पवार विचार करून योग्य तो निर्णय घेतील."

त्यामुळेच या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागेल का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधतानाच धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेण्याचाही प्रयत्न केला आहे.

गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण?

2009 ची निवडणूक... बीडमधून नुकतेच लोकसभेवर गोपीनाथ मुंडे निवडणून गेले होते. परळीमधून धनंजय मुंडे विधानसभेचे उमेदवार असतील अशी शक्यता राजकीय क्षेत्रात दिसत होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण? हा प्रश्न समोर आला.

विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली. धनंजय मुंडे नाराज झाले. गोपीनाथ मुंडेंनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण 2012 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

फोटो स्रोत, Getty Images

2014 ला गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. पाच महिन्यात विधानसभा निवडणूका होत्या. परळीतून पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले धनंजय मुंडे 25 हजार मतांनी पराभूत झाले. पण नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक निवडणूकांमध्ये त्यांनी यश मिळवलं.

विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांची स्थानिक राजकारणाची पकड लक्ष वेधून घेणारी होती. 2014 मध्ये शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेवर पाठवलं. त्यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद दिलं.

ती जबाबदारी त्यांनी उत्तमपणे सांभाळली. याचा पुरावा म्हणजे धनंजय मुंडेंबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना म्हटलं होतं, "जेव्हा धनंजय मुंडे भाषण करतात तेव्हा त्यांच्यात गोपीनाथ मुंडे यांचा भास होतो. आता ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी हा पठ्या आमच्या भाजपच्या तालमीत तयार झालेला आहे."

विरोधी पक्षाचं त्यांच्या कामगिरीसाठी सत्ताधाऱ्यांकडून होणारं कौतुक क्वचित असतं. ते धनंजय मुंडे यांचं झालं. 2015 साली पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या चिक्की घोटाळ्याच्या आरोपावर त्यांनी रान पेटवलं. या सगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीच्या नेत्यांपर्यंत येऊन पोहोचले.

फोटो स्रोत, Getty Images

अजित पवारांच्या ते अधिक जवळ गेले. या दरम्यान विधानपरिषदेबरोबरच बीडच्या स्थानिक राजकारणात धनंजय मुंडे यांना चांगल यश मिळत होतं. डिसेंबर 2015ची नगरपालिकेच्या निवडणूक, 2017 ची जिल्हापरिषद निवडणूक, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक या स्थानिक निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळालं. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं पारडं जड होत गेलं.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केलं आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आले.

'ती' चूक महागात पडली?

राज्यात महाविकास आघाडीची गणितं जुळत होती. हे सरकार स्थापन झालं तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते राहिलेल्या मुंडे यांना मोठं खातं मिळेल अशी अपेक्षा होती. 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना साथ दिल्याची चर्चा होती. ते बराच काळ संपर्कातही नव्हते. जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरला आले तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

शरद पवार यांची फसवणूक केल्याच्या समजूतीने धनंजय मुंडेंच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. त्यानंतर मात्र शरद पवारांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. सगळी सूत्र अजित पवार विरोधी गटाच्या हातात सोपवली.

फोटो स्रोत, Getty Images

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी धनंजय मुंडे यांना गृह किंवा कृषी खातं मिळेल अशी अपेक्षा होती. पण मोठी खाती अजित पवार विरोधी गटातल्या नेत्यांना देऊन शरद पवारांनी अजित पवार समर्थकांना धक्का दिला.

धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री हे खातं मिळालं. त्यामुळे कायम माध्यमांमधून नेहमी चर्चेत असलेले धनंजय मुंडे मागे पडत गेले. महाविकास आघाडीच्या वर्षभरात खूप कमी वेळा ते माध्यमांमध्ये दिसले.

मंत्रिपद धोक्यात?

10 जानेवारी 2020 ला एका महिलेने बलात्कार केल्याच्या आरोपानंतर मुंडे यांनी त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं मान्य केलं. त्यांना आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीपासून दोन मुलं असल्याचंही त्यांनी मान्य केलं. पण कथित महिलेने केलेले बलात्काराचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, FACEBOOK / DHANANJAY MUNDE

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण हे आरोप गंभीर आहेत आणि आम्ही तातडीने याबाबत निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा आहे.

याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी सांगितलं, "गंभीर आरोपाचे परिणाम गंभीरच होत असतात. तो आरोप सिद्ध झाला तरी आणि नाही झाला तरी. बलात्काराचा आरोप गंभीर असल्याने शरद पवारांनीही प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याचाही विचार पक्ष करणार."

समर खडस यांनी पुढे म्हटलं, "पक्षाला राजीनामा मागायचा असता तर तातडीने मागितला असता. काही वर्षांपूर्वी राजकारणात असे तातडीने राजीनामे मागितले गेले आहेत. पण पक्षाने अद्याप राजीनामा मागितला नाही याचा अर्थ त्यांच्याकडे यासंदर्भात ठोस पुरावा किंवा तथ्य समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस तपास करतील आणि मग पक्ष निर्णय घेईल असंच शरद पवार यांना सांगायचं असावं असं वाटतं."

'समन्वय साधून निर्णय होईल'

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी याबद्दल बोलताना म्हटलं, "हा धनंजय मुंडेंचा हा खासगी विषय आहे. न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी होईल. समाजात या गोष्टी खूप पारंपरिक पद्धतीने पाहिलं जातं. पण व्यापक पातळीवर खूप वेगळ्या स्तरावर विचार केला जातो.

शरद पवारांचं हे आरोप गंभीर आहेत आम्ही पक्ष म्हणून विचार करू हे वक्तव्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर मला जयंत पाटील यांचंही वक्तव्य महत्त्वाचे वाटते, की आम्ही आता तातडीने राजीनाम्याचा निर्णय घेणार नाही असं ते म्हणाले. त्यामुळे पक्ष पातळीवर या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून निर्णय घेतला जाईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)