धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात चौथी तक्रार, रिझवान कुरेशींची पोलिसात धाव : #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, DHANANJAY MUNDE/FACEBOOK
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात चौथी तक्रार
धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविरुद्ध आता चौथी तक्रार नोंदवण्यात आली आहे. कृष्णा हेगडे, मनिष धुरी यांच्यानंतर जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीही तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे.
या महिलेने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची तक्रार त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. हे वृत्त सकाळने प्रसिद्ध केलं आहे.
तर या महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशीच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक असणाऱ्या महिला वकिलाचा विनयभंग केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. हे वृत्त टीव्ही9 ने दिलं आहे.
2. थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, राज्यसरकारचं परिपत्रक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव थोर व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. 15 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकात हे नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.
2021 मध्ये येणाऱ्या राष्ट्रीय दिन, थोर व्यक्तींची जयंती आदी कार्यक्रमांची माहिती देणारं हे परिपत्रक आहे. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या समावेशाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. हे वृत्त न्यूज 18 लोकमतने प्रसिद्ध केलं आहे.
3. एकनाथ खडसे यांची आज चौकशी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची आज ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. 30 डिसेंबर रोजी ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती.
फोटो स्रोत, FACEBOOK
कोरोनामुळे एकनाथ खडसे चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते, आता क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर ते चौकशीला उपस्थित राहाणार आहेत.
भोसरी येथिल जमीन व्यवहार प्रकरणी त्यांना 2016मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या वर्षी ते भाजपामधून राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
4. भविष्यातली युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकण्याचं लक्ष्य - रावत
भविष्यात होणारी युद्ध स्वदेशी शस्त्रांनी जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितलं आहे. भारतीय वायुदलासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून 83 मार्क-1 ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. त्यानंतर रावत यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP
"स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल," असं रावत यावेळेस म्हणाले.
"मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमचं एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे" असंही रावत यांनी मत व्यक्त केलं. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केलं आहे.
5. टेलिग्रामचे 2.5 कोटी युजर्स वाढले
व्हॉट्सअॅपच्या नव्या सिक्युरिटी पॉलिसीनंतर टेलिग्राम आणि इतर अॅप्स वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत असल्याचं दिसत आहे.
72 तासांमध्ये टेलिग्रामचे जगभरात अडीच कोटी युजर्स वाढल्याचे कंपनीने जाहीर केलं आहे. टेलिग्रामच्या या नव्या युजर्समध्ये आशियातील देशातील नागरिकांची संख्या जास्त आहे.
या 2.5 कोटी नव्या युजर्समध्ये 38 टक्के युजर्स आशियातील आहेत. त्यापाठोपाठ 27 टक्के युजर्स युरोपातील आहेत. 21 टक्के युजर्स लॅटिन अमेरिकन देशांमधील आहेत. हे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)