जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष, कमला हॅरीस उपराष्ट्राध्यक्ष

Bible

फोटो स्रोत, Reuters

जो बायडन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी त्यांना शपथ दिली. बायडन यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली.

तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांनी त्यांना शपथ दिली.

जो बायडन यांचं भाषण

"हा अमेरिकेचा दिवस आहे. हा लोकशाहीचा दिवस आहे. हा ऐतिहासिक दिवस आहे, आज कुणा एका व्यक्तीचा नाही तर लोकशाही मूल्यांचा उत्सव आहे. आज लोकशाहीचा विजय झाला आहे," असं शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी कॅपिटल हिलवरील हल्ल्याचा देखील उल्लेख केला.

"हे महान राष्ट्र आहे. आपण सर्व उत्तम नागरिक आहोत. आपल्या देशाने अनेक वादळं बघितली. आपण खूप पुढे आलो आहोत. मात्र, इथून पुढेही मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे."

"लोकशाही अमूल्य असल्याचं आपण पुन्हा शिकलो आहोत. लोकशाही नाजूक आहे आणि या क्षणी लोकशाही बळकट झाली आहे."

"या पवित्र मैदानावर काही दिवसांपूर्वी हिंसाचाराने कॅपिटलचा पाया हादरवण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण इथे शांततामय मार्गाने सत्ता हस्तांतर करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. गेल्या दोन शतकांहून अधिक काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे."

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

भविष्यातील अमेरिकेचा आत्मा पुन्हा बहाल करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला. मात्र, त्यासाठी "पोकळ शब्दांपेक्षा बरंच काही करण्याची गरज असल्याचंही" ते म्हणाले.

"आपल्यात फूट पाडणाऱ्या शक्ती मजबूत आहेत. मात्र, त्या नव्या नाहीत. ही सततची लढाई आहे आणि कायम विजय मिळेलच, याची खात्री कधीच देता येत नाही. मात्र, इतिहास, विश्वास आणि उद्देश कायमच एकतेचा मार्ग दर्शवतात."

अमेरिकन महानतेसाठी ऐक्य आवश्यक आहे, असं सांगत बायडन यांनी समाजात अधिक परस्पर आदर राखण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, "ओरडणे थांबवा आणि डोकं शांत करा. ऐक्याशिवाय शांती नाही".

संयुक्त या शब्दावर भर देत ते म्हणाले, "ऐक्य पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि आम्ही हा क्षण संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणून पाळलाच पाहिजे."

कमला हॅरिस यांचा उल्लेख करत ते म्हणाले, "108 वर्षांपूर्वी मतदानाच्या अधिकारासाठी मोर्चा काढणाऱ्या शूर महिलांना रोखण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि आज एक महिला अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे बदल होत नाही, हे सांगूच नका."

"संधी, सुरक्षा, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, सन्मान आणि सत्य", या अमेरिकी नागरिकांना आवडणाऱ्या समान गोष्टी असल्याचं ते म्हणाले.

निवडणुकीत घोटाळा झाल्याचं म्हणत डोनाल्ड ट्रंप यांनी बायडन यांचा विजय मान्य करायला नकार दिला होता. त्याचा दाखला देत बायडन म्हणाले, "गेल्या काही आठवड्यातल्या घटना बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येते की सत्यही असतं आणि खोटेपणाही असतो. सत्ता आणि फायद्यासाठी खोटं बोललं जातं."

रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्षाचा संदर्भ देत ते म्हणाले, "लाल आणि निळ्या रंगातलं असभ्य युद्ध थांबवलं पाहिजे. जे तुमच्यासारखे दिसत नाही, ज्यांची प्रार्थनेची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे अशांवर अविश्वास ठेवणे हे उत्तर नाही."

लेडी गागा यांनी गायलं राष्ट्रगीत

सर्वांत आधी फादर लिओ ओ'डोनोव्हॅन यांनी प्रार्थना म्हटली. त्यानंतर लेडी गागा यांनी अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं.

78 वर्षांचे जो बायडन पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष झाले आहेत यापूर्वी त्यांनी तीनवेळा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात बायडन यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून कामगिरी बजावली आहे

कमला हॅरिस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी आज जांभळा रंग परिधान केला होता. डेमोक्रेटिक पक्षाचा निळा आणि रिपब्लिकन पक्षाचा लाल रंग मिळून जांभळा रंग तयार होतो. त्यामुळे या रंगाला अमेरिकेत द्विपक्षीय लोकशाहीचं प्रतिक मानलं जातं.

ट्रंप यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष असलेले माईक पेन्स हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ट्रंप यांच्या अनुपस्थितीमुळे पेन्स यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरली.

शपथग्रहण सोहळा कसा असेल?

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस कॅपिटल हिलवर दाखल झाले आहेत. स्वागत अधिकाऱ्यांनी दोघांचही स्वागत केलं.

माजी राष्ट्राध्यक्षही या कार्यक्रमाला हजेरी लावतात. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वगळता वयाच्या नव्वदीत असणारे जिमी कार्टर हे माजी राष्ट्राध्यक्षही सोहळ्याला उपस्थित नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

फादर लिओ ओ'डोनोव्हॅन यांच्या प्रार्थनेनी कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर लेडी गागा अमेरिकेचं राष्ट्रगीत गाईल. त्यानंतर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यानंतर जेनिफर लोपेझ गाण्याचा कार्यक्रम सादर करेल.

त्यानंतर जो बायडन आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख करून देण्यात येईल आणि त्यानंतर बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर लगेचच बायडन राष्ट्राला संबोधन पहिलं भाषण करतील. हे भाषण जवळपास 20 मिनिटांचं असेल. त्यानंतर आफ्रिकन-अमेरिकन वंशाची कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्ती अमांडा गोरमन हिच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता होईल.

मुख्य सोहळ्याला माजी राष्ट्राध्यक्षही उपस्थित असणार आहे. सोहळ्यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज बुश सपत्निक उपस्थित आहेत.

कॅपिटल हिलच्या घटनेनंतर आजच्या सोहळ्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डचे तब्बल 25 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. कोव्हिड परिस्थितीमुळे यावेळच्या राष्ट्राध्यक्ष शपथग्रहण सोहळ्याला कमी पाहुणे आमंत्रित आहेत. त्यामुळे यावेळी कार्यक्रमस्थळी अत्यंत तुरळक गर्दी आहे.

चर्चमध्ये केली प्रार्थना

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पत्नी डॉ. जिल बायडन यांच्यासोबत कॅथेड्रल ऑफ सेंट मॅथ्यू चर्चमधल्या प्रार्थनेला उपस्थिती लावली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

जो बायडन यांनी पत्नी डॉ. जिल बायडन यांच्यासोबत वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅथेड्रल ऑफ सेंट मॅथ्यू चर्चमध्ये प्रार्थना केली.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि इतरही काही नेते यावेळी उपस्थित होते. जो बायडन अमेरिकेचे दुसरे रोमन कॅथलिक अध्यक्ष आहेत. यापूर्वी जॉन एफ केनेडी हे एकमेव रोमन कॅथलिक अध्यक्ष अमेरिकेला लाभले होते. 1963 साली जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर त्यांची प्रार्थना सभाही याच चर्चेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

ट्रंप समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीकडे पाठ फिरवली

तारा मॅकेल्व्हे

बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या राजधानीत सध्या डेमोक्रेटिक पक्षाच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थकांनी राजधानीकडे पाठ फिरवली आहे. जो बायडन यांच्याविरोधात आयोजित निदर्शनं रद्द करण्यात आली आहेत.

ट्रंप समर्थक एका गटाने 'पब्लिक अॅडव्होकेट'या नावाने आंदोलनाचं आयोजिन केलं होतं. मात्र, 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्याने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचं त्यांच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय.

वॉशिंग्टन डीसीला जाणार नसल्याचं इतरही काही ट्रंप समर्थकांचं म्हणणं आहे. त्यापैकी एकाने सांगितलं, "अमेरिकी संसदेचे सदस्य, बायडन यांचा स्टाफ आणि नॅशनल गार्डचे 60 हजार जवान वगळता कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही." लॉकडाऊनमुळेदेखील बायडन यांचे अनेक समर्थक घरूनच हा सोहळा बघणार आहेत.

बायडन यांच्यासमोर कोरोना विषाणूचं आव्हान

अँजेलिका कॅसास

बीबीसी न्यूज, टेक्सस

अमेरिकेच्या भूमीत कोरोना विषाणू संक्रमणाची पहिली केस आढळल्याला बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे.

जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेत असताना अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे तर जवळपास 4 लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडन यांनी मंगळवार श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आपण ज्यांना गमावलं त्यांच्या आठवणी जपूया."

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना विषाणूमुळे ज्यांनी आपले प्रियजन गमावले आणि ज्यांच्यावर कोरोना विषाणूमुळे आर्थिक कुऱ्हाड कोसळली अशा लोकांशी मी गेले वर्षभर बोलत आले आहे. या संकटामुळे अमेरिकेवर जी आपत्ती ओढावली त्यासाठी काहीजण ट्रंप प्रशासनाच्या कारभाराला जबाबदार धरत आहेत तर काही लोकांच्या नजरा आता बायडन प्रशासन काय करणार, याकडे लागल्या आहेत.

नव्या राष्ट्राध्यक्षांनी कोव्हिड संकटावर मात करण्यासाठी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची योजना आखली आहे. यात वेगवान लसीकरण, अधिकाधिक कोव्हिड-19 चाचण्या, 1 लाख अतिरिक्त सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती आणि अमेरिकी कुटुंबाना थेट आर्थिक मदत यांचा समावेश आहे.

शपथविधीची तयारी

शपथविधी सोहळ्याच्या तयारीविषयी माहिती देत आहेत बीबीसी न्यूजच्या प्रतिनिधी समांथा ग्रॅनव्हिले

'जानेवारीत शपथग्रहण सोहळा आयोजित करावा, ही कुणाची कल्पना होती माहिती नाही. मात्र, यावेळी कडाक्याची थंडी असते आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नीट बोलता येत नाही आणि ऐकूही येत नाहीय.

सहसा नव्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावेळी मात्र मी माझ्या संपूर्ण आयुष्यात बघितले नाही एवढे लष्करी जवान तैनात दिसत आहेत.

केवळ 20 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी आज जवळपास अडीच तास लागला. एवढंच नाही तर एखाद्या वॉर झोनमध्ये असल्याप्रमाणे आम्हाला अनेक चेकप्वाईंट्स पार करत जावं लागलं.

रस्त्याने निरव शांतता आहे आणि जागोजागी अमेरिकेचे झेंडे लावण्यात आले आहेत. बीबीसीच्या टेंटमध्ये आम्ही आठ जण आहोत आणि प्रत्येकजण पॉवर आउटलेच्या शोधात आहे. जेणेकरून मुख्य समारंभ सुरू होण्यापूर्वी ही जागा बऱ्यापैकी उबदार होईल, अशी आशा आहे.

ट्रंप यांची बायडन यांच्यासाठी नोट

कमला हॅरिस आज अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशिया-अमेरिकन महिला आहेत. सोहळ्यापूर्वी एक ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्या लिहितात, "माझ्या आधी जन्माला आलेल्या स्त्रीमुळे आज मी इथे आहे."

मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित नसले तरी त्यांनी जो बायडन यांच्यासाठी एक नोट लिहून ठेवली असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ट्रंप यांनी अगदी आता-आतापर्यंत निवडणुकीतला पराभव मान्य केला नव्हता. इतकंच नाही तर व्हाईट हाऊस सोडताना बाहेर जमलेल्या पत्रकारांशी बोलतानादेखील त्यांनी जो बायडन यांचा 'नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष' असा उल्लेख करणं टाळलं.

डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊस सोडलं

खरंतर अमेरिकेमध्ये मावळते राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांचं स्वागत करून राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र त्यांच्या हाती सुपूर्द करतात. सत्तांतराच्या या कार्यक्रमानंतरच मावळते राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊस सोडतात. मात्र, डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीप्रमाणेच राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा शेवटचा दिवसही परंपरांना छेद देणारा ठरला. डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या मावळत्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रंप यांच्यासोबत मरिन वन हेलिकॉप्टरमध्ये बसत व्हाईट हाऊस सोडलं.

फोटो स्रोत, Reuters

मरिन वन हेलिकॉप्टर डोनाल्ड ट्रंप आणि मेलेनिया ट्रंप यांना घेऊन मेरीलँडमधल्या ज्वाईंट बेस अँड्र्यूजला रवाना झालं. ज्वाईंट बेस अँड्र्यूजला शेवटचा निरोप समारंभ पार पडणार आहे. निरोप समारंभानंतर ते एअर फोर्स वनच्या विमानाने फ्लोरिडाला रवाना होतील. तिथल्या पाम बिचवरच्या Mar-a-Lago या आपल्या रिसॉर्टमध्ये ते निवृत्तीनंतरच्या नव्या आयुष्याची सुरूवात करतील.

दरम्यान मावळते उपाध्यक्ष माईक पेन्स हे ट्रंप यांच्या निरोप समारंभाराला अनुपस्थित राहतील. मात्र, जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्या शपथग्रहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

व्हाईट हाऊस सोडताना उपस्थित पत्रकारांशी बोलताना हे जगातलं सर्वोत्तम घर आहे, असं ट्रंप म्हणाले.

ते म्हणाले, "आम्ही चार वर्षं उत्तमरित्या घालवले आणि बरंच कामही केलं. आम्ही अमेरिकी जनतेवर प्रेम करतो आणि हे आमच्यासाठी खूप खास आहे."

ट्रंप मेरिलँडमधील अँड्र्यूज एअर बेसवर दाखल

थोड्याच वेळात ते मेरीलँडमधल्या ज्वाईंट बेस अँड्र्यूजवर दाखल झाले तिथं त्यांनी उपस्थित समर्थकांना संबोधित केलं.

फोटो स्रोत, Reuters

"ही चार वर्ष अद्भूत होती," असं ते म्हणाले. त्यानंतर ट्रंप यांनी मेलानिया ट्रंप यांना दोन शब्द बोलायची केली. मेलेनिया ट्रंप म्हणाल्या, "तुमची फर्स्ट लेडी होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. ईश्वर तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि आपल्या देशाचं भलं करो."

यानंतर ट्रंप यांनी गेल्या चार वर्षांत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची यादीच वाचली.

ते पुढे म्हणाले, "ते (नवे राष्ट्राध्यक्ष) कर वाढवणार नाही, अशी मी आशा करतो."

ट्रंप गेल्या काही दिवसांपासून उद्विग्न भासत असल्याचं वृत्त अमेरिकी प्रसार माध्यमांमध्ये छापून येत असलं तरी आज अँड्र्यूज एअर बेसवर ते अत्यंत उत्साही आणि सकारात्मक दिसत होते. आज आपण जे काही बोलू ते राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलं शेवटचं भाषण असणार आहे, याची जाणीव असल्यामुळे कदाचित ते उत्साही दिसत असावेत.

मी पुन्हा येईन - ट्रंप

आपल्या शेवटच्या भाषणात ट्रंप यांनी कोरोना संकटाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "आम्ही लसीच्या रुपाने वैद्यकीय चमत्कार घडवला." विषाणू 'भयंकर प्रकरण' असल्याचं ते म्हणाले. शिवाय, त्यांनी पुन्हा एकदा या विषाणूचा 'चायना व्हायरस'असा उल्लेख केला.

अमेरिकेचा अध्यक्ष होणं ही आपल्यासाठी "सर्वात अभिमानाची बाब" होती, असंही ट्रंप म्हणाले. तसंच, "तुमच्यासाठी कायम लढत राहीन", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ट्रंप यांनी आपल्या शेवटच्या भाषणात उत्तराधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. मात्र, जो बायडन किंवा कमला हॅरिस यांच्या नावांचा उल्लेख केला नाही.

"कुठल्यातरी स्वरुपात पुन्हा परत येईन", असा निर्धार व्यक्त करत ट्रंप यांनी भाषणाचा शेवट केला आणि ते फ्लोरिडाकडे रवाना झाले.

अँथोनी झुरचर, बीबीसी नॉर्थ अमेरिका रिपोर्टर

आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या सोहळ्याला अनुपस्थित राहणारे अमेरिकेचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष होते अँड्र्यू जॉनसन. अब्राहम लिंकन यांच्या हत्येनंतर आणि अमेरिकेला हादरवून टाकणाऱ्या गृहयुद्धाच्या समाप्तीनंतर अँड्र्यू जॉनसन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले होते.

जॉनसन यांच्यानंतर उत्तराधिकाऱ्याच्या पदग्रहण सोहळ्याला अनुपस्थित राहणारे डोनाल्ड ट्रंप पहिले राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकाळात अनेक प्रथा-परंपरांना छेद दिला आहे.

त्यांच्याविरोधात महाभियोगाचा खटलाही चालला. त्यांच्याच कार्यकाळात गेल्या वर्षभरात अमेरिकेतला असंतोष वाढला आणि त्याची परिणीती ट्रंप समर्थकांनी कॅपिटल हिलवर केलेल्या हल्ल्ल्यात झाली.

नव्या राष्ट्राध्यक्षाचा पदग्रहण सोहळा भव्य असतो. देशभरातले प्रमुख राजकीय नेते या कार्यक्रमाला हजेरी लावतात. मात्र, या सोहळ्याकडे पाठ फिरवत ट्रंप यांनी एकट्यानेच व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांना घेऊन जाण्यासाठी मरिन वनचं हेलिकॉप्टर हजर होतं. काही मोजक्या पत्रकारांच्या उपस्थितीत लाल कार्पेटवरून चालत ट्रंप यांनी व्हाईट हाऊसला अलविदा केलं.

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता शपथविधी

शपथविधीआधी अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. वॉशिंग्टन शहरात 25 हजारहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी कॅपिटल हिल अर्थात अमेरिकेच्या संसदेवर झालेला हल्ला आणि कोरोनाचा संसर्ग हे लक्षात घेऊन अमेरिकेच्या प्रशासनाने सावधानतेचा उपाय म्हणून मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

जो बायडन यांचा शपथविधी जीएटी प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता अमेरिकेची राजधानी वॉशिंटनमध्ये होईल.

त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार लेडी गागा या प्रसंगी अमेरिकेचं राष्ट्रगीत गाणार आहेत. जेनिफर लोपेझ आणि गार्थ ब्रुक्सही सादरीकरण करणार आहेत.

बायडन-हॅरिस यांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन अभिनेते टॉम हँक्स करणार आहेत. जॉन लेनन, जॉन बॉन जोव्ही, ब्रुस स्प्रिंग्सस्टीन, डेमी लोव्होटो आणि जस्टीन टिंबरलेक यांच्यासारखे सेलिब्रिटी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

ट्रंप यांनी दिला राष्ट्राच्या नावे संदेश

आपल्या पदावरून पायउतार होण्याआधी अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राच्या नावे व्हीडिओ संदेश दिला. त्यांनी म्हटलं, "आम्ही तेच केलं, जे करण्यासाठी आम्हाला निवडून दिलं होतं."

यूट्यूबवर प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत त्यांनी म्हटलं की, " मी अनेक कठीण लढाया लढलो कारण हे करण्यासाठी तुम्ही मला निवडून दिलं होतं,"

पुढे त्यांनी असंही म्हटलं की त्यांच्या प्रशासन काळात अमेरिका जगातली 'सगळ्यांत महान अर्थव्यवस्था' बनली आहे.

अमेरिकन शेअर बाजाराला कोरोना काळात फटका बसला होता आणि आता कुठे त्यांची गाडी रूळावर येतेय. सध्या शेअर बाजाराने उसळी मारली आहे.

पण तरीही अर्थव्यवस्था पुर्णपणे रूळावर आलेली नाही. डिसेंबरमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. रिटेल विक्री गेल्या काही महिन्यात घसरली आहे आणि बेरोजगारी वाढत आहे.

ट्रंप यांनी आपल्या व्हीडिओत बोलताना म्हटलं की, "आमची विचारसरणी किंवा कार्यपद्धती डावी किंवा उजवी नव्हती. यात रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट असा पक्षांचा भेदही नव्हता. आमचा उद्देश देशहित होता, ज्यात संपूर्ण देश आहे."

मंगळवारी लिंकन मेमोरियलमध्ये झालेल्या सभेत नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. अमेरिकेत आतापर्यंत चार लाख, एक हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

१६० वर्षांमध्ये डोनाल्ड ट्रंप असे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील जे नव्या राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसतील.

1869 साली महाभियोगाद्वारे हटवण्यात आलेले दुसरे एक राष्ट्राध्यक्ष, डेमोक्रेटिक पक्षाचे अँड्र्यू जॉन्सन यांनी रिपब्लिकन पक्षाचे युलिसस एस ग्रँट यांच्याकडे दुर्लक्ष करून शपथविधीकडे पाठ फिरवली होती. जॉन्सन यांना कार्यालयातून हटवण्याच्या प्रक्रियेला पाठिंबा दिलेल्या ग्रँट यांना याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

जो बायडन

परंतु, यावेळी स्थित्यंतरामधील कटुता आणखी लक्षणीय आहे. सर्वसाधारणतः ही प्रक्रिया निवडणुकीनंतर लगेच सुरू होते, पण ट्रंप यांनी निकाल स्वीकारायला नकार दिल्यामुळे काही आठवडे उशिराने ही प्रक्रिया सुरू झाली.

बायडन यांच्या शपथविधी समारंभाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे. शपथविधी टाळून ते बहुधा फ्लोरिडामधील त्यांच्या मालकीच्या मार-अ-लागो क्लबमध्ये जातील.

प्रचंड सुरक्षाव्यवस्था

शपथविधीच्या दिवशी सशस्त्र हल्ला होऊ शकतो अशी भीती काही माध्यमांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांच्या कार रस्त्यावर गस्त घालत आहेत तसंच हेलिकॉप्टरनेही आकाशातून पाहणी केली जातेय. रस्त्यावर जागोजागी पांढऱ्या रंगाचे तंबू दिसत आहेत ज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षकांनी तळ ठोकला आहे.

पोलिसांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की जर कुणी देखील कॅपिटल ग्राउंडचे कंपाउंड बेकायदेशीररीत्या ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला अटक करण्यात येईल. वॉशिंग्टनला इतर शहरांपासून जोडणारा व्हर्जिनिया पूलदेखील या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)