संजय राऊत: आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Ani
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान- राऊत
'होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!' आणि 'गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान', असे दोन ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटो जोडला आहे. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आपण यापूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकले होते. पण आता आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे, अशा शब्दात मोदींनी सर्व आंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
"देशात काही ठिकाणी आंदोलकांची एक टोळी निर्माण झाल्याचंही त्यांनी हसता हसता सांगितलं. काही बुद्धिजीवी असतात. काही श्रमजीवी असतात. परंतु मागच्या काही काळात आंदोलनजीवी पाहायला मिळत आहेत.
"देशात कुठेही काहीही झाले तर हे आंदोलनजीवी सर्वांत आधी तिथे असतात. कधी पडद्याच्या मागे असतात तर पडद्या पुढे असतात. अशा लोकांना ओळखून आपल्याला त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हे लोक स्वत: आंदोलन करत नाहीत. त्यांची ती क्षमताही नाही. मात्र, एखादं आंदोलन सुरू असेल तर हे लोक तिथे पोहोचतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत. ते प्रत्येक ठिकाणी मिळतात". अशी शब्दांत उपद्रव निर्माण करणाऱ्यांचा मोदींनी समाचार घेतला.
2. अमित शहा परतताच कोकणात भाजपला धक्का
अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याने वातावरण तापलं असतानाच शिवसेनेने जोरदार पलटवार केला आहे. नितेश राणे यांच्या मतदारसंघात भाजपला शिवसेनेने तगडा झटका दिला आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
देशाचे गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून दिल्लीत परतत नाहीत तोच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातच भाजपला खिंडार पाडण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे.
वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून हे सातही जण आपल्या हातावर शिवबंधन बांधणार असल्याचे वृत्त आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद वाढल्याने त्याचे सारे श्रेय नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांना दिले गेले. या यशामुळे राणे यांची भाजपमधील पतही वाढली. राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वानेही या यशाची दखल घेतली. मुख्य म्हणजे राणे यांच्या खास आग्रहावरून देशाचे गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले.
फोटो स्रोत, Getty Images
राणे यांनी कसाल पडवे येथे उभारलेल्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन रविवारी शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणात शहा यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. शहा यांच्या भाषणाने सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचेही चित्र आहे. नेमकी हीच वेळ शिवसेनेने साधली व शहा यांची पाठ फिरताच राणेंचे वर्चस्व असलेल्या वैभववाडीत भाजपला मोठा धक्का दिला आहे.
नितेश राणे यांच्या कणकवली मतदारसंघात असलेल्या वैभववाडी नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे असून यातील सात नगरसेवकांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हे सातही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. हे सात नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल व हे सातही नगरसेवक शिवबंधनात अडकतील, असे सांगण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे आमच्या सात नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची कोणतीही माहिती मला नसल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केला.
3. मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून 25 वर्षं लागतील-नवाब मलिक
मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून 25 वर्षं लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.
फोटो स्रोत, Facebook
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक
कुठले फासे फिरवणार आहेत आम्हाला माहिती नाही असाही उपरोधिक टोला त्यांनी लगावला. गेली22वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहत आहेत. परंतु फासा फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. त्यांच्या जोडीला फडणवीस आले आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि फडणवीस यांचे मी पुन्हा येईन ची स्वप्नं पूर्ण होणारं नाही. मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेवेळी सांगितलं होतं की हे सरकार पाच नव्हे 25 वर्षं टिकणार आहे.
4. केंद्र सरकार अंडरवर्ल्डप्रमाणे वागतं-पटोले
"एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात, अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे, ही बाब गंभीर आहे," असे नाना पटोले यांनी म्हटले. 'महाराष्ट्र देशा'ने ही बातमी दिली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
"मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. 75 दिवसांपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ," असे सांगून पटोले यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
"राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवू," असा निर्धार महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
5. केजरीवालांच्या मुलीला ऑनलाईन गंडा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. केजरीवाल यांची मुलगी हर्षिताने ओएलएकसवर जुनं साहित्य विकण्यासाठी माहिती दिली होती. मात्र यासंदर्भात तिची फसवणूक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
फसवणूक करणाऱ्यांनी 34हजार रुपयांना गंडा घातला आहे. जुना सोफा विकण्याबाबत हर्षिताने जाहिरात दिली होती. जाहिरात दिल्यानंतर तिच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर हर्षिताला काही पैसे पाठवण्यात आले. यावर हर्षिताने विश्वास ठेवला.
पैसे पाठवल्यानंतर हर्षिताला क्युआर कोड आला. त्यानंतर हर्षिताच्या खात्यातून 34हजार रुपये वळते झाले. सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.
हर्षिता इंजिनिअर आहे. दिल्ली आयआयटीमधून तिने बीटेक अभ्यासक्रम पूर्ण केला. गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत हर्षिताने वडिलांसाठी प्रचारही केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)