IndvsEng: इंग्लंडची चेन्नई एक्स्प्रेस; भारतीय संघावर 227 धावांनी विजय

भारत, इंग्लंड, जो रूट, जेम्स अँडरसन, जॅक लिच

फोटो स्रोत, Alex Davidson

फोटो कॅप्शन,

जॅक लिच

कर्णधार जो रूट आणि दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने चेन्नई टेस्टमध्ये भारतीय संघावर 227 रन्सने विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

विदेशी भूमीवर इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे. इंग्लंडने गेल्या आठवड्यात श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी टेस्ट सीरिजमध्ये 2-1 असं नमवून भारतीय संघाने काही आठवड्यांपूर्वी ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर त्यांनी शरणागती पत्करली.

पाचव्या दिवशी 39/1 वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासमोर 420 रन्सचं लक्ष्य होतं. मात्र जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांच्या भेदक माऱ्यासमोर एकापाठोपाठ एक भारतीय बॅट्समन बाद होत गेले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 72 रन्स केल्या. लिचने 4 तर अँडरसनने 3 विकेट्स पटकावल्या.

फोटो स्रोत, Stu Forster

फोटो कॅप्शन,

जो रूट

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शंभराव्या टेस्टमध्ये द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला. रूटने 218 रन्सची मॅरेथॉन इनिंग्ज साकारली होती. डॉम सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 रन्स केल्या होत्या. इंग्लंडने 578रन्सचा डोंगर उभारला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव 337 रन्समध्ये आटोपला. ऋषभ पंतने 91 तर चेतेश्वर पुजाराने 73 रन्सची खेळी केली. डॉम बेसने 4 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने इंग्लंडला दुसऱ्या डावात स्थिरावू दिलं नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 187 रन्समध्येच आटोपला. रवीचंद्रन अश्विनने 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने भारतीय संघासमोर 420 रन्सचं लक्ष्य ठेवलं. चौथ्या दिवशी शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय संघाने रोहित शर्माला गमावलं.

पाचव्या दिवशी इंग्लंडने जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांनी शिस्तबद्ध मारा करत भारतीय बॅट्समनला जेरीस आणले. असमान उसळी मिळणारी खेळपट्टी, टप्पा पडल्यानंतर माती उधळणाऱ्या खेळपट्टीवर अँडरसन-लिच जोडीने दिमाखदार बॉलिंग करत संघाला विजय मिळवून दिला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)