अमोल मिटकरी यांची गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका, ‘चोरासारखे धंदे बंद करा’ : #5मोठ्याबातम्या

गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, facebook

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून घरचा आहेर, शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून समज

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्यानंतर भाजपनेच आता पडळकर यांचे कान टोचले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सभ्य भाषेत बोलण्याची समज दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

ते म्हणाले, "यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समजावलं होतं. आताही आम्ही जाहीरपणे सांगत आहोत. जे बोलायचं ते नीट आणि योग्य भाषेत बोलायला हवे."

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि पडळकर यांच्यातही जोरदार वाद रंगलाय. "चोरासारखे धंदे बंद करा. शरद पवार यांची बरोबरी करण्यासाठी कित्येक जन्म घ्यावे लागतील," अशी टीका मिटकरी यांनी केली.

अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. पण त्यापूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी पहाटेच्या वेळी घटनास्थळी जाऊन पुतळ्याचे अनावरण केलं.

"या पुतळ्याचं अनावरण चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हावं अशी आमची इच्छा होती. पण शरद पवार यांचे विचार आणि वागणं हे अहिल्यादेवींच्या उलट आहे," अशी टीका पडळकर यांनी केली होती.

फोटो स्रोत, Reuters

2. 'प्रियंका गांधी दुर्गा मातेचा अवतार' - आचार्य प्रमोद कृष्णम

काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणारे आचार्य प्रमोद कृष्णम यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी दुर्गा मातेचा अवतार असून त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार, असं विधान त्यांनी केलं आहे. दैनिक प्रभातने हे वृत्त दिले आहे.

यासंदर्भात त्यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी प्रियंका गांधी सर्वांत मोठ्या हिंदू असल्याचंही म्हटलं आहे.

"प्रियंका गांधींचं प्रयागमध्ये स्थान करणं, हातात रुद्राक्ष घालणं, मंदिरात दर्शन करणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्या तरी त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा गेली आहे. त्यामुळे भाजपचा वध प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे,"असं वक्तव्य कृष्णम यांनी केलं आहे.

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse

3. एकनाथ खडसेंचा भाजपला मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 18 विद्यमान आणि 13 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

भाजपचे हे सर्व नगरसेवक भुसावळमधील असून राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद कार्यक्रमात त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, "2024 नंतर नरेंद्र मोदींची सत्ता पुन्हा आल्यास 90 टक्के कामगार कायदे मोडीत निघतील. कामगार संघटना करता येणार नाहीत. कामगारांना आपल्या सुरक्षेसाठी कायदे करता येणार नाहीत."

फोटो स्रोत, Nitin Gadkari/facebook

फोटो कॅप्शन,

नितीन गडकरी

4. गायीचं शेण 5 रुपयांनी विकलं जाणार - गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमात जनतेला गीर गायींचं महत्त्व पटवून दिलं. ब्राझीलची गीर गाय एका वेळी 62 लीटर दूध देते अशी माहिती त्यांनी दिलीय. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

लवकरच भारतातही गीर गायींच्या पशूपालनाचा व्यवसाय केला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासाठी गीर गायीचं वीर्य भारतात आणलं असल्याचंही ते म्हणाले.

तसंच गायीच्या शेणापासून पेंट तयार करण्याचीही योजना आहे. त्यामुळे शेणाला 5 रुपये किलो भाव मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "टेस्ट्यूब बेबी संकल्पनेनुसार गीर गायीचे वासरू जन्माला आलं आहे. त्यासाठी प्रयोगशाळाही तयार झाल्या आहेत."

"आम्ही दोन लीटर दूध देणाऱ्या गायीचा गर्भ बदलवला. त्यामुळे यापुढे जन्माला येणारी गाय 20-25 लीटर दूध देईल. 25 लीटर दूध मिळाल्यावर लोकांवर गाय विकायची वेळ येणार नाही. यासाठी केंद्र सरकार लवकरच एक अभियान राबवणार आहे," अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

फोटो स्रोत, Hindustan Times

5. केरळमध्ये सीएए लागू करणार नाही- मुख्यमंत्री

कोरोना लसीकरण मोहिमेनंतर देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पण केरळमध्ये हा कायदा लागू करण्यास मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्पष्ट नकार दिला आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचार रॅलीदरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले, "काहींनी सीएए लागू होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू केली आहे. पण केरळमध्ये सीएए लागू होणार नाही."

यापूर्वीही केरळने केंद्र सरकारच्या सीएएला पाठिंबा दिला नव्हता. आजही केरळचा केंद्र सरकारच्या सीएएला विरोध आहे, असंही पिनराई विजयन यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)