कोरोना रुग्णांची संख्या अमरावतीमध्ये अचानक का वाढली?
- नीतेश राऊत
- बीबीसी मराठी

फोटो स्रोत, Nitesh raut/bbc
अमरावती जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यात रविवारी 399 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 294 रुग्णांची नोंद झाली असून मृतांची संख्या 435 वर पोहचली आहे. अचानक वाढत्या कोरोना संक्रमनामुळं अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
10 फेब्रुवारीपासून कोरोना संक्रमितांची संख्या 350 पार गेली आहे. त्यात 14 फेब्रुवारीला सर्वाधिक 399 कोरोना रुग्ण आढळून आले आहे.
वाढता कोरोनाचा प्रसार पाहता खबरदारी म्हणून प्रशासनाकडून 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठ ठिकाणे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. यात शहरातील राजापेठ, साईनगर बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणी नगर, दस्तूर नगर रहाटगाव व ग्रामीण भागातील अचलपूर, चांदूर बाजार, नांदगाव, खंडेश्वर हे ठिकाणं प्रशासनाने रडारवर घेतलेली आहे.
या भागात प्रशासन घरोघरी जाऊन तपासणी करणार आहे. जिल्ह्यात त्रिसूत्रीच्या पालनासाठी महानगरपालिका व जिल्हा प्रशासन मिळून काम करणार आहे.
खबरदारी म्हणून अमरावती जिल्ह्यातील महाविद्यालये 2 आठवडे उशिराने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
हवामानातील बदलांमुळ कोरोना वाढतोय- जिल्हाधिकारी शैलेश नवाल
हवामानातील बदल, थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्णांची संख्या वाढली असावी असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, "संसर्ग हा एक दुसऱ्यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या काळात लागण होण्याचे प्रमाण, विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी त्याचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल.
फोटो स्रोत, Nitesh raut/bbc
"मास्क, सोशल डिस्टंन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यातून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर दंडवसुली झाली आहे.
त्याचप्रमाणे मास्क नसलेल्यांना प्रवेश न देण्याबाबत शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, मंडळे, एस. टी. व इतर महामंडळे व सर्व विभागांना सूचित करण्यात आले आहे. रिक्षा चालकांकडूनही पालन होत नसल्यास स्वतंत्र ड्राईव्ह घेतला जात आहे. नागरिकांनी दक्षता त्रिसूत्री पाळून प्रशासनाला सहकार्य करावे."
फोटो स्रोत, Nitesh raut/bbc
"कोरोनाबाबत लोकांमधली भीती संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लस आल्यामुळे आपण कोरोनावर विजय मिळवला अशी भावना सर्वसामान्य जनतेत पसरली आहे. त्यामुळे जनता कोरोनाला खूप गांभीर्याने घेत नाही हे कोरोना प्रसारासाठी मोठं कारण आहे," असं मत बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संदीप दानखेडे यांचं आहे.
ते म्हणतात, "लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणं पूर्णपणे बंद केले होते. लग्न समारंभात गर्दी वाढायला लागली, त्रिसूत्रीचं पालन कुठेच झालेलं नाही. दुसरं ज्या लोकांना कोरोना झाला आणि खूप सिरीयस न होता ते बरे झाले अशा लोकांच्या मनातून भीती निघून गेली. त्यात प्रशासनाकडूनही यापूर्वी कडक कारवाई करण्यात आलेली नाही. कोरोना रुग्णांना गृहविलगीकरण कक्षात ठेवणे याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. कोरोना रुग्ण गर्दीत मिसळल्याने हा स्फोट होतोय.
"पण अचानक लॉकडाऊन करायची गरज नाही. अनावश्यक ठिकाणी जाणे टाळलं पाहिजे. कार्यक्रमाचे आयोजन पुढे ढकललं पाहिजे. गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार होतोय. कारण या कोरोना संसर्ग असलेला जवळपासच्या गावात गेलंय, सामान्य जनतेच्या संपर्कात आलाय, लग्नात सहभागी झाला आहे त्यामुळं स्थिती गंभीर झाली आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)