नाना पटोले यांची मुलाखत: राज्यात काँग्रेस समाधानी आहे का? या प्रश्नाला प्रदेशाध्यक्षांनी दिले हे उत्तर

  • प्राजक्ता पोळ
  • बीबीसी मराठीसाठी
नाना पटोले
फोटो कॅप्शन,

नाना पटोले

राज्यात कॉंग्रेस समाधानी आहे का? राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांवर निर्णय झाला नाही तर पुढे काय करणार? शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या मैत्रीबाबत कॉंग्रेसला काय वाटतं?

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य भाष्य केलं.

प्रश्न - महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस समाधानी आहे का?

महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहीजे ही आमची भूमिका राहिलेली आहे. शेतकरी, बेरोजगार, कामगार, छोटे व्यापारी यांच्या विकासाची कामं झाली पाहिजेत. हे सगळं झालं तर कॉंग्रेस समाधानी आहे. जर ही कामं होत नसतील तर कॉंग्रेस असमाधानीचं राहणार...!

प्रश्न - याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारमध्ये कामं होत नाहीयेत?

देशात सर्वांत चांगलं काम जे कुठे झालं असेल ते महाराष्ट्रात झालं. केंद्र सरकारने जी 144 कलम लावले त्यामुळे खूप नुकसान झालं. छोटे उद्योगधंदे बंद पडले. राज्याचे अर्थमंत्री काही दिवसांपूर्वीच सांगत होते की, 1 लाख कोटींची तूट यावर्षी कोरोनामुळे येत आहे. केंद्र सरकारने अजून जीएसटीचे 25 हजार कोटी रूपये दिले नाहीत. त्यामुळे समाधानी आणि असमाधानी हा प्रश्न नाही. जनतेच्या हितासाठी सत्तेची भागीदारी आहे.

ज्या ठिकाणी आमच्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आहेत त्या ठीकाणी ही विकास झाला पाहीजे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी झाल्या पाहिजेत असं नाही. एकंदरीत सर्वांगीण राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाला पुढे नेलं पाहिजे हे सुचवलं होतं. येत्या बजेटमध्ये राज्याच्या जनतेला न्याय मिळेल.

प्रश्न - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मैत्री खूप जुनी आहे. 15 वर्षे हे दोन पक्ष एकत्रितपणे सत्तेत होते. पण आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मैत्री खूप घट्ट होताना दिसतेय?

आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणून त्यांची मैत्री घट्ट आहे. आम्ही नसतो तर त्यांची मैत्री कुठून झाली असती. आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्यात मतभेद नाहीत.

प्रश्न - विधानसभेचं अध्यक्षपद आता रिक्त झाले आहे. विधानसभा अध्यक्ष पदाऐवजी कॉंग्रेसला इतर पद मिळणार अशी चर्चा आहे. काय खरंय?

मला असं वाटतं विधानसभा अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडे होतं तर कॉंग्रेसकडेच राहील. पण ते पद रिक्त झाल्यानंतर शरद पवार किंवा संजय राऊत यांनी काही भाष्य केलं. पण आम्हाला उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रवादीला अध्यक्षपद असं जरी द्यायचं ठरलं तरी शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे यांच्या पातळीवर निर्णय होईल.

फोटो स्रोत, Nana Patole/facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

प्रश्न - आता अधिवेशन सुरू होत आहे. राज्यपाल नियुक्त ज्या 12 जागा रिक्त आहेत त्याबाबत अजून निर्णय घेण्यात आला नाही. अजित पवार म्हणाले जर निर्णय नाही झाला तर कोर्टात जाऊ. कॉंग्रेसची काय भूमिका आहे?

विधानसभेच्या विविध विषयांवर काम करणाऱ्या काही समित्या असतात. त्या समित्यांवर विधीमंडळाचे सदस्य असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक त्या समित्यांवर असायला पाहिजेत असं संविधानात म्हटलं आहे. आम्ही स्थापन केलेल्या 16 समित्या आहेत. विधानपरिषदेच्या सदस्यांसाठी आम्ही जागा रिक्त ठेवल्या आहेत.

पण कॅबिनेटने मंजूर करूनही राज्यपाल नियुक्त्यांवर सही करत नसतील तर मग कामकाज घटनेप्रमाणे होतंय की घटनेबाह्य पद्धतीने हा प्रश्न निर्माण होतो. त्या समित्यांवर विविध क्षेत्रातील लोक नसल्याने काम करताना त्या क्षेत्रावर अन्याय होतोय. त्यामुळे राज्यपालांनी भाजपच्या इशाऱ्यावर न चालता त्यांना ते ज्या घटनात्मक पदावर आहेत त्यानुसार कामकाज केलं पाहिजे नाहीतर त्या समित्या रद्द कराव्या लागतील.

प्रश्न - मग सत्ताधारी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे?

जनहित याचिकेचा पर्याय यामध्ये आहे. पण विधिमंडळाच्या समित्या रद्द कराव्या लागतील. याचा राज्यपालांनी विचार करावा. जर त्यांना आम्ही कोर्टात जावं, विधिमंडळाचं कामकाज बंद पाडावं असं वाटत असेल तर ती सुद्धा कार्यवाही केली जाईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)