IndVsEng: आर. अश्विनची अष्टपैलू कामगिरी, भारताचा इंग्लंडवर विजय

आर अश्विन

फोटो स्रोत, Getty Images

रविचंद्रन अश्विनच्या अष्टपैसू कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर विजय मिळवला आहे.

अश्विनने 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह 106 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधलं त्याचं हे पाचवं शतक आहे.

अश्विनच्या या शतकाच्या जोरावरच भारतानं या कसोटीच्या दुसऱ्या डावात सर्व बाद 286 धावांची मजल मारली आणि इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचं लक्ष्य दिलं होतं.

त्याचा पाठलाग करत असताना इंग्लंडची दमछाक झाली आणि भारताने इंग्लंडवर विजय मिळवला.

विराटचं अर्धशतक, स्पिनर्सचं वर्चस्व

चेपॉकच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील या सामन्यात तिसऱ्या दिवशीही फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. विराट कोहलीनं 62 धावांची खेळी करूनही दुसऱ्या डावात भारताची अवस्था 9 बाद 237 अशी झाली होती.

फोटो स्रोत, Morne De Klerk-ICC

अश्विनलाही तब्बल तीन जीवदानंही मिळाली, पण त्याचा फायदा उचलतं अश्विननं मोहम्मद सिराजच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली आणि भारताला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. सिराज 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच आणि ऑफस्पिनर मोईन अलीनं प्रत्येकी चार विकेट्स काढल्या.

रोहित, अजिंक्य ऋषभनं केलेली पायाभरणी

त्याआधी पहिल्या डावात भारताचा सलामीवर रोहित शर्मानं शतक ठोकलं होतं. रोहितच्या 161, अजिंक्य रहाणेच्या 67 आणि ऋषभ पंतच्या नाबाद 58 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 329 धावा करता आल्या.

पण पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिल, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि कुलदीप यादव भोपळाही न फोडता माघारी परतले होते. मग इंग्लंडचा पहिला डावही 134 धावांत गडगडला होता. पहिल्या डावात अश्विननं चार तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)